श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ गावचे शहाणपण ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

गावात होतो तेंव्हा खरी मजा होती

अडाणी होतो पण……

शहाणपणाची झाक होती

 

सर्दी खोकला झाला की आले तुळशीचा काढा असायचा

पोट दुखलं की ओवा चावायला मिळायचा

ताप आला की कपाळावर पाण्याची पट्टी असायची

जखमेवर बिब्ब्याच्या चटक्याची पुष्टी व्हायची

व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी ची कमतरता नव्हती

लिंबू, ऊना द्वारे त्याची मुबलकता होती

नको त्या टेस्ट आणि नको ते डॉक्टर

आजीचा बटवाच असे सगळ्याचे उत्तर

गावात होतो तेंव्हा खरी मजा होती

अडाणी होतो पण……

शहाणपणाची झाक होती

 

मोकळ्या ऎसपैस जागेत एकत्र नांदत होते

दीड दोन एकरात सगळ्यांचे भागत होते

न्याहरीला दूध भाकरी दुपारी ठेचा भाकरी

रात्रीला फक्कड डाळ भाताचा बेत असे

ना टीव्ही ना वेब सिरीज, ना बातम्या ना सास बहू

मोकळ्या अंगणात गप्पांचा फड बसे

भांडणे व्हायची ….. हेवेदावे असायचे…..

पण विषय गावाच्या वेशीबाहेर जात नसायचे

गावात होतो तेंव्हा खरी मजा होती

अडाणी होतो पण……

शहाणपणाची झाक होती

 

गावात वाद भांडण चव्हाट्यावर येत असत

रात्री मंदिरात गाव पंच मिटवत बसत

ना पोलिसांची भीती ना लाचेची गरज

ना मानहानीचा दावा ना कोर्टाचा धावा

सलोख्याने एकत्र नांदून गावकी सांभाळायचे

एकाद्या गावजेवणाला सगळे मदतीला यायचे

पाहुण्यांचा पाहुणचार अक्खा गाव करत असे

नवरीला निरोप द्यायला गाव वेशीवर जमत असे

गावात होतो तेंव्हा खरी मजा होती

अडाणी होतो पण……

शहाणपणाची झाक होती

 

गावाला असताना शहराची आस लागायची

सप्तरंगी इंद्रधनुषी स्वप्न पडायची

काऊ चिऊ सारखी छोटी घरटी वसायची

हम दो हमारे दो ची चौकट बसायची

एटीकेट्स मॅनर्सच्या बंदिवासात वावरायचे

सुशिक्षितचे कपाळावर लेबल असायचे

ढोंगी फसव्या दुनियेत वावरायला लागायचे

चेहऱ्यावर खोटेपणाचे मुखवटे चढायचे

चकव्यागत शहरात घुसमटत रहायचे

गाव परतीचे रस्तेच हरवले जायचे

आणि परत एकदा वाटू लागले ………

गावात होतो तेंव्हाच खरी मजा होती

अडाणी होतो पण……

शहाणपणाची झाक होती

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

२३ – ०१ – २०२२

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments