श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ गोष्ट आहे हीच खरी ☆
काळजाच्या पोळ्यामध्ये, मकरंद साठवला
रान पेटवले कुणी, होता धूर दाटलेला
मधमाशा ह्या चौफेर, पहा कशा उधळल्या
आग पाहुनी भोवती, होत्या खूप संतापल्या
मध घेऊन पारधी, होता फारार झालेला
फूलबाग माझी होती, तरी डंख मी सोसला
मध पोळ्यातला तुझ्या, कोणी कसा हा चाखतो
एक कप्पा हृदयाचा, दृश्य पाहून फाटतो
काळजाने पहा कसा, होता टाहो फोडलेला
सुख स्वप्नांचा चुराडा, आणि कणा मोडलेला
मला पाहून बागेत, होते गुलाब हसले
साखरेच्या बरणीत, पाकळ्यांना मी ठोसले
आले माधुर्य त्यांच्यात, जरी देह तापविला
नाही सडले कुजले, त्याचा गुलकंद झाला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈