सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ भासमय ☆ सौ राधिका भांडारकर ☆
वाळवंटी हरीण
तहानलेलं धावतं
भासतो जलाशय
परी ना कधी पोहचतं…..
तद्वत धाव धावतो
टाकीत धापा जीवनी
नसुन जे भासते
वेध त्याचा मनोमनी……
मनी नसे संतुष्ट
असुनही वाटे नसे
आटापीटा किती
धाव आभासी असे…..
आपुले आपल्यापाशी
परी नजर पल्याडी
उन पाण्याचाच खेळ
वाट खोटी वाकडी….,…
जाती घरंगळुनि
कण वाळुचे ते
मृगजळामागे धावलो
नंतर जाणवते….
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈