सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ तसदी (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

सृजनाचा क्षण कधी कुठे उगवेल हे खरंच सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी अँजीओप्लास्टी करायची ठरल्याने मी आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. स्पेशल रूम मिळाली नाही म्हणून मला जनरल वार्ड मध्ये दाखल केले गेले. गच्च भरलेला तो मोठा हॉल….. जवळ जवळ मांडलेले बेडस, पेशंटसोबत असणाऱ्याला बसायला एक स्टूल एवढीच सोय. इतक्या लोकांसाठी फक्त २-३ नर्सेस आणि २ वॉर्ड बॉय. साहजिकच नर्सेसची धावपळ आणि जोडीला चिडचिड .. वॉर्डबॉयचा हाकांकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न…. स्वतःला नेमकं काय झालंय आणि काय करणार आहेत हे न कळल्याने घाबरलेले पेशंट, आणि डॉक्टरांशी नेमकं काय बोलायचं हे कळत नसल्याने बावरलेले, उपचारांसाठी पैसे कसे कुठून उभे करायचे ही मोठीच चिंता चेहेऱ्यावर सतत बाळगणारे नातेवाईक… भीती, चिंता, हतबलता, नैराश्य अशा-सारख्या भावनांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून टाकलं होतं…….. संध्याकाळी रूम मिळाल्याने मला तिथे शिफ्ट केलं आणि ते हॉस्पिटल म्हणजे फिरता रंगमंच आहे असं वाटलं …..७-८ खोल्यांसाठी ४-५ नर्सेस, ३ वॉर्डबॉय, वरचेवर खोलीची साफसफाई, परीट -घडीच्या चादरी, सोबत आलेल्याला वेगळा बेड …… लागूनच असलेल्या सुपर स्पेशल खोल्यांची ऐट तर आणखी कितीतरी जास्त …… परिस्थितीची ही दोन टोकं पहाताना मनात दाटलेली ही कविता……उठून बसायला परवानगी नसल्याने, गुडधा उभा करून, त्यावर कागद ठेवून अक्षरशः कशीतरी खरडलेली…

☆ तसदी ☆

भेदभाव मुळी नसतो म्हणती

कधीही त्या भगवंत कृपेला

दीन नि धनवंतांना त्याचा

न्याय एकची ठरलेला ………

 

खरे न वाटे मला कधी हे

अवतीभवती जग हे बघता

कुठे पूर पैशाचा नि कुठे

गरिबीला ती नाही तृप्तता……..

 

कुठे शिंकला श्रीमंत तरी

दहाजण पहा जाती धावत

आणि कोठे रस्त्याकाठी

कोणी मृत्यूशी त्या झुंजत ……

 

कितिकांना फसवूनही येथे

गणले जाती किती मान्यवर

घाम स्वतःचा गाळूनही पण

कितीकांना ना मिळते भाकर….

 

रंक आणखी रावामधली

खोल खोल ही दरी वाढती

तशी झुंड नि पुंडशाहीची

जरब वाढती संस्कृतीवरती……

 

मरणामध्ये जगता क्वचितच

कधी कुणाला आम्ही पहावे

जगता जगता सततच आणि

कितिकांनी ते रोज मरावे……..

 

आता वाटते एकदाच त्या

रामाने अल्लासह यावे

डोळे आपले आणखी उघडूनी

राज्य स्वतःचे पाहून जावे …….

 

अंदाधुंदी येथ माजता

राहू कसे ते शकती शांत

किती भक्त ते रंकच त्यांचे

दोन वेळची ज्यांना भ्रांत ………

 

मरणानंतर देऊ म्हणती

स्वर्ग तयांना नक्की अगदी

नंतर काय करू स्वर्गाचे

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी…….

 

आत्ता घ्यावी त्यांनी तसदी..

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments