श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ पु. ल. देशपांडे जन्मदिवस विशेष – पु.ल………एक शब्दगुंफण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

जन्म – 8 नोवेम्बर 1919, मुंबई

सुसह्य व्हावे जगणे म्हणूनी विनोद केला तुम्ही

विनोद म्हणजे टवाळ खोरी,अर्थ काढला आम्ही.

 

विदुषी आणि विद्वानांनी इथे नसे  कमतरता

उपदेशाच्या नित्य वाहती  अमृतमय सरिता.

 

थकली काया,थकला मेंदू,कोण तया खुलवेल

नित्य ‘उद्या’ चे स्वागत करण्या कोण मना फुलवेल.

 

यंत्रामध्ये, शास्त्रामध्ये  पिचून  जाता  जीव

कुणा न आली दया आमुची,कुणा न आली कीव.

 

अशाप्रसंगी हास्यदूत तुम्ही बनून आला जगती

विनोद अस्त्रा सहज उचलले लढण्या अवतीभवती.

 

खिल्ली उडवून, उपरोधाने,कधी काढले चिमटे

तव शब्दांच्या दर्पणी बघता,खूण मनाला पटे.

 

प्रवासातले अनुभव केले  कथन विनोदातून

जीवन यात्रा पार होतसे  सहज तया ऐकून.

 

जगत्पटावर बहुरूप्याचे  पात्र तुम्ही हो झाला

विनोद आणिक मार्मिकतेचा संगम तुम्ही केला.

 

सप्तसुरांचा साज चढवूनी कधी गाईली कवने

मुक्त कराने मुक्तांगणी तुम्ही पेरीत गेला दाणे.

 

कधी न चुकला जागा कोठे जे जे होते तुजपाशी

माझे माझे कधी न म्हटले,उधळीत गेला सर्वांपाशी.

 

हास्यरसाच्या वर्षावाने अक्षर अक्षर झाले ताजे

पैलू बघता व्यक्तित्वाचे जो तो म्हणतो ‘पुलं माझे.’

 

‘पु.ल.’म्हणता पुलकित होती अजून अमुची मने

पुन्हा न होणे, तुम्हासारखे,  सरस्वतीचे लेणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुजाता बोधनकर

पु. ल. वरची कविता खूप छान