(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी विचारणीय कविता एक-दूजे का ध्यान रखें)
☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 215 ☆
☆ कविता – एक-दूजे का ध्यान रखें☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆
☆ क्षण सृजनाचा – एक नवा अंकुर ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆कविता — एक नवा अंकूर ☆
☆
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर
*
नसेल तेथे हिरवी भूमी
नसेल जिरले कधीही पाणी
घाम गाळिता पिकतील मोती
ध्यास हाच मनी, लाभ यशाचा असो कितीही दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर १
*
रखरखणा-या उन्हात न्हाऊ
श्रमदेवीची गीते गाऊ
भाग्य आपुले आपण उजळू
भीति कशाला मग कष्टाची घामाचा वाहो पूर २
*
भगीरथाचे वंशज आपण
गगनालाही घालू गवसण
अशक्य ते ही करुया आपण
चैतन्याने उजळून जाता, अंधाराचा फाटे ऊर ३
*
स्फुरोत आता बाहू तुमचे
तुम्हीच त्राते नव्या जगाचे
भविष्य भीषण पहा हासते
वेध घेऊया त्याचा आपण गतकालाला सारून दूर
उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ४
☆
एका बॅन्केच्या ग्रामीण शाखेत नुकतीच नोकरी लागलेली. नामांकित बॅन्केत नोकरी मिळाल्यामुळे मनापासून आनंद झालेला. त्यामुळे नवीन शिकावे, यश मिळवावे ही इच्छा आपोआपच मनात जागृत झालेली. अशातच त्या ग्रामीण शाखेतून दुस-या एका ग्रामीण शाखेत काही महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती झालेली. तिथे जाणे येणे सुरु झाले. या संपूर्ण प्रवासात शहरी भाग फारच थोडा होता. बराचसा भाग हा कोरडवाहू किंवा दुष्काळी म्हणावा असाच होता. जाताना खूप लहान लहान खेडी लागत होती. अशा खेड्यातही आमच्या बॅन्केची शाखा दिसत होती. हा सगळा अनुभव नवीन होता. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाशी सामना करुन उभा असणारा शेतकरी, शेतमजूर आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असणारी आपली बॅन्क पाहून उर अभिमानाने भरुन यायचा. स्वतःचे भविष्य स्वतःच घडवायचे असते या विचाराचे स्मरण व्हायचे. कष्टातून नंदनवन उभे राहते. घाम गाळणा-याला यश मिळणारच. अशा सकारात्मक विचारांनी मन भरुन गेले आणि शब्द सुचत गेले… ‘ उजाड माळावरती जगवू एक नवा अंकूर ‘….
सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे असं काही गारुड करून बसली आहे, की त्याची पुढची ओळ माझ्या हातून आपोआपच लिहिली गेली हे मी मान्य करतो आणि त्यासाठी मी तुमची माफी मागितली मंडळी ! चला, म्हणजे एका अर्थाने लेखाच्या सुरवातीलाच, एखाद्या गाण्याची अनेक तपानंतर सुद्धा आपल्यावर कशी “जादू” शिल्लक असते, हा एक मुद्दा निकालात निघाला ! अर्थात ते गाणं त्यातील शब्दांमुळे, संगीतामुळे, का ते ज्या कलाकारांवर चित्रित झालं आहे त्यांच्यामुळे, कां अजून कोणत्या गोष्टींमुळे रसिकांच्या मनावर आज तागायत जादू करून आहे हा वादाचा विषय होऊ शकतो, यात वादच नाही मंडळी. असं जरी असलं, तरी त्या गाण्याच्या जादूची मोहिनी आजच्या घडीपर्यंत टिकून आहे, हे आपण या लेखाद्वारे मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची शब्दांची जादू न करता सुद्धा मान्य कराल ! असो !
मंडळी, आपली माफी मागितल्या मागितल्या, मला एका गोष्टीची मनांत मात्र नक्की खात्री वाटत्ये आणि ती म्हणजे, आपण सुद्धा वरील गाण्याची पाहिली ओळ वाचताच, लगेच दुसरी ओळ मनांत नक्कीच गुणगुणली असेल, हॊ का नाही ? खरं सांगा ! बघा, मी जादूगार नसलो तरी “माझ्या” वाचकांच्या मनांत नक्की काय चाललं असेल ते ओळखण्या इतका मनकवडा जादूगार नक्कीच झालोय, असं लगेच माझं मीच म्हणून घेतो. दुसरं असं, की माझ्या मनावर अजून जरी जुन्या अनेकानेक अजरामर हिंदी गाण्यांची कितीही जादू असली आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा असली तरी, राष्ट्रभाषेत लेख लिहिण्याइतकी काही त्या भाषेची माझ्यावर जादू झालेली नाही, हे मी मान्य करतो ! त्यामुळे आता या वयात अंगात नसलेली एखादी कला, कोणा जादूगाराच्या जादूने अंगी बाणेल, मग मी आपल्या राष्ट्र भाषेत एखादा लेख लिहीन यावर माझा 101% विश्वास नाही ! पण हां, स्टेजवरचे जादूचे प्रयोग पहात असतांना, हे सगळं खोटं आहे हे मनांला ठामपणे माहित असतांना देखील, माझे डोळे (चष्मा लावून सुद्धा) मात्र त्यावर विश्वास ठेवतात हे मात्र तितकंच खरं. म्हणजे असं बघा, रिकाम्या नळकांड्यातून फुलांचा गुच्छ काढणे, तर कधी पांढरे धोप कबुतर ! तर कधी टेबलावर झोपलेल्या माणसाच्या शरीरारचे तीन तुकडे करणे, ते परत जोडणे, असे नाना खेळ करून तो जादूगार लोकांचे मनोरंजन करत असतो. मला असं वाटतं की “जादू” या शब्दातच एक प्रकारची अशी “जादू” आहे जी सानथोरांना तो खेळ बघताना, अक्षरशः देहभान विसरायला लावून खिळवून ठेवते. एवढच नाही, तर ज्या व्यक्तीला जादूगाराने एखाद्या खेळात आपल्या इंद्रजालाने वश केले आहे, त्या व्यक्तीला तर ती इतकी कह्यात ठेवते, की त्या जादूगाराने “आज्ञा” करताच, ती व्यक्ती सफरचंद समजून, कच्चा बटाटा पण साऱ्या प्रेक्षकांसमोर मिटक्या मारीत आनंदाने खाते, हे आपण सुद्धा कधीतरी बघितलं असेल !
या दुनियेत जादूचा उगम कधी झाला, जगात पाहिली जादू कोणी, कोणाला आणि कोठे दाखवली असे साधे सोपे प्रश्न घेवून, त्या प्रश्नांची मी उत्तर देईन अशी अपेक्षा हा लेख वाचतांना कोणा वाचकाने कृपया ठेवू नये. कारण त्याची उत्तर द्यायला सध्याच्या विज्ञानयुगातला जागतिक कीर्तीचा “गुगल” नामक विश्व विख्यात जादूगार आपल्या खिशातच तर आहे मंडळी ! पण हां, माझ्या आयुष्यात मी पाहिलेल्या पाहिल्या दोन जादू कोणत्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मी तुम्हांला नक्कीच सांगू शकतो. किंबहुना मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेल्या दोन जादू, आपल्या पैकी माझ्या पिढीतील लोकांनी पाहिलेल्या त्यांच्या आयुष्यातल्या सुद्धा त्यांनी पाहिलेल्या पहिल्या दोन जादू असू शकतात, (आधीच वाक्य वाचून तुम्हांला थोडं गोंधळायला झालं असेल, तर बहुतेक तो माझ्या लिखाणावर झालेला आजच्या विषयाचा परिणाम असू शकतो) यावर माझा ठाम विश्वास आहे !
मंडळी, त्यातील पाहिली जादू म्हणजे, आपल्या दादाने किंवा ताईने मुठीत राहणारी लहान वस्तू उजव्या हाताने दूर फेकल्याचा अभिनय करून, ती वस्तू आपण सांगताच आपल्याला लगेच दाखवणे आणि दुसरी जादू म्हणजे डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने कापणे ! काय, बरोबर नां मंडळी ?
लहानपणी डेव्हिड कॉपरफिल्ड नामक एका विदेशी जादूगाराचे एका पेक्षा एक विलक्षण जादूच्या प्रयोगाचे विडिओ बघून डोळे आणि डोकं अक्षरशः गरगरायला लागायचं! त्याच पाण्यावर चालणं काय, हवेत उडणं काय किंवा नायगाऱ्याच्या प्रचंड धबधब्यात पिंपात बसून उडी मारून परत काठावर प्रकट होणं काय ! बापरे, ते त्याचे सारे जादूचे खेळ आज नुसते आठवले तरी अंगावर काटा येतो मंडळी !
आपल्या देशातसुद्धा तसे अनेक छोटे मोठे जादूगार होऊन गेले, पण डेव्हिडशी तुलना करायची झाल्यास, पी सी सरकार, सिनियर आणि पी सी सरकार, ज्युनियर ही कलकत्याच्या पिता पुत्रांची नांव या संदर्भात प्रकर्षाने लगेच आठवतात.
माझे जन्मापासूनचे आजतागायतचे आयुष्य शहरात गेल्यामुळे, “काळी जादू” किंवा “चेटुक” या विषयात एखाद्या “गाववाल्याचे” जेवढे “ज्ञान” (का अज्ञान ?) आहे, त्याच्या ते 0. 001% सुद्धा नाही. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे अथवा लिहिणे, हा या विषयात स्वतःला तज्ञ समजणाऱ्या एखाद्या “गाववाल्याचा” अपमान होऊ शकतो. म्हणून उगाच त्या तथाकथीत जादूच्या उप शाखेला कोणत्याही तऱ्हेनं स्पर्श नं केलेलाच बरा. शिवाय माझा हा लेख अशा एखाद्या तज्ञ गाववाल्याने “चुकून” वाचलाच, तर त्याला आलेल्या रागापोटी तो माझ्यावर एखादं “लिंबू” फिरवायचा ! उगाच नको ती रिस्क आता या वयात कशाला घ्या ?
मंडळी, शेवटी एकच सांगतो, माझा सुद्धा जादूवर विश्वास आहे. पण ती जादू करणारा सर्वशक्तिमान जादूगार हा वर बसलेला आहे, असं माझं मत आहे ! आपल्या आयुष्यात वेळोवेळी निरनिराळे खेळ करून “तो” आपल्याला दाखवत असतो ! त्यातील त्याच्या कुठल्या खेळाला आपण टाळी वाजवायची, कुठला खेळ दाखवल्या बद्दल त्याचे मनापासून आभार मानायचे किंवा कुठल्या खेळातून काय बोध घेवून पुढे जायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचे !
तर अशा त्या सर्व शक्तिमान जादूगाराने आपल्याला दाखवलेल्या नानाविध खेळांचे वेळोवेळी अन्वयार्थ लावायची शक्ती, तो जादूगारच आपल्या सगळ्यांना देवो हीच सदिच्छा !
☆ दोन आणि दोन बावीस… – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील☆
डॉ हंसा दीप
शेजारी आलेल्या पोलिसांच्या गाडीने मला पुरतं सावध केलं. दोन पोलिस बाहेर आले, इकडे -तिकडे त्यांनी पाहिलं आणि निघून गेले. ते निघून जाताच सहजच ते क्षण डोळ्यासमोर तरळले जेव्हा माझा पोलिसांशी प्रत्यक्ष सामना झाला होता. दोन आणि दोन बावीस ह्या अंकानी पुर्ण एक दिवस माझ्या आयुष्यातील भुतकाळात कायमचा लिहून ठेवला होता. त्या दिवशी माझ्या दोन पुस्तकांचं एक पॅकेज भारतातून टोरंटोला येणार होतं. मी सकाळपासून आॅनलाईन ट्रैक करत होते. आता इथे पोचलं, मग तिथे पोचलं. आॅनलाईनचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान पण कमी नाही. कुरिअर तिथेच आहे की पुढे निघाले आहे हे पाहण्यासाठी, दर अर्ध्या तासांनी मी चेक करायची. आणि शेवटी वेब सर्च केल्यानंतर माहित पडलं की ते पॅकेज घरामध्ये डिलीवर झालं आहे. कोणत्या घरात ! मी तर इथे आहे, इथे तर कोणीच आलं नाही !
सुशीमचा टोमणा मला जिव्हारी लागला…. ” तुझं आणि कुठे दुसरं घर आहे काय?”
मी आधीच डोळ्यात तेल घालून वाट पहात असताना या टोमण्याने माझं अंतर्मन खूपच दुखावलं गेलं. मी अशा काही नजरेने सुशीमकडे बघितलं की त्याने गप्प बसण्यातच आपलं भलं आहे हे तो समजून गेला. पुन्हा पुन्हा ट्रैकींग नंबर चेक केला. कदाचित मी चुकीचा नंबर दिला असेल आणि नवीन सुधारणा केल्यानंतर रिझल्टचा हा मार्ग नक्की बदलेल. मी सतत क्लिक करत राहिले. ट्रैकींगचा रिझल्ट तोच येत होता. कोणताच बदल नाही. हिरव्या रंगाचा टिकमार्क ओरडून ओरडून सांगत होता की पॅकेज तुमच्या घरी पोहचले आहे.
“नसत्या उपद्रवाला मी स्वतः हून आमंत्रण देते” हा आरोप घरातल्यांनी कित्येक वेळा माझ्यावर. लावलेला आहे, परंतु माझा काही दोष नसताना येणाऱ्या संकटाकडे मी कधी लक्ष दिलं नाही. आज पण हेच झालं. म्हणूनच ह्या समस्येतून निघणे माझीच जबाबदारी होती.
बाहेरचा व्हरांडा तर बर्फाने भरून गेला होता. असं वाटत होतं की कुणीतरी पोती भरभरून बर्फ आमच्या घरासमोर ओतला आहे. ह्या बर्फाच्या ढिगाऱ्यावर जरी पुस्तकांचे पॅकेज ठेवले असते तरी वरच्यावर दिसून आले असते. परंतु सहा नंबरचा चष्मा असूनही डोळ्यावर विश्वास न ठेवता मी त्याचं शोधकार्य चालू ठेवलं. दरवाजातून बाहेर जाईपर्यंतच कित्येक अडचणी आल्या. खोऱ्याने बर्फ काढून काढून आधी रस्ता बनवला. दरवाजा मोर साचलेल्या बर्फात उकरून -उकरून पाहिलं की कुठे ताज्या, बर्फाच्या थरांमध्ये पॅकेज दबून तर गेलं नसेल.
परंतु पॅकेज कुठे नव्हतंच, तर ते मिळणार कसं ! बर्फाचे इवलेसे कण इकडून तिकडे पडत असताना माझ्या हातावर पडून जणू हसत होते. असं ग्लोव्हज न घालता बर्फात हात घालण्याची कधी मी हिम्मतही करू शकत नव्हते. पण आता पॅकेज शोधण्याचं असं काही भूत माझ्या डोक्यात शिरलं होतं की माझे नाजूक हात बर्फाच्या ढिगाऱ्यात वारंवार जाताना जराही कचरत नव्हते. डोक्यातील उष्णता सरळ हातापर्यंत पोहचून थंडीलाही मात देत होती. का कोण जाणे राहून राहून मनात हीच शंका येत होती की कदाचित पॅकेज पाठवलंच नसेल.
तरीही तात्काळ ह्या शंकेचं खंडनही झालं कारण.. जर पॅकेज पाठवलंच नसतं तर आॅनलाईन ट्रैक कसं झालं असतं ! आता, जर ट्रैक होत आहे तर हयाचा अर्थ सरळ आहे की पॅकेज पाठवलं गेलं आहे आणि डिलीवर पण केलं गेलं आहे.
माझ्या रागाने आणि चिंतेने घरात भूक हरताळची वेळ आली होती. किचनमध्ये जाऊन खाना बनवण्याचे तर लांबच.. मी त्याबाबत विचार देखील करत नव्हते. आता एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे, कंपनीच्या १- ८०० नंबर वर फोन करून विचारावं.
गडबडीत फोन डायल केला. साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा फोन उचलला. तो अर्धा तास माझा ब्लडप्रेशर न जाणे कुठुन कुठे घेऊन गेला होता. माझ्या रक्तवाहिन्या फुटण्याच्या मार्गावर होत्या. पायात एवढं बळ आलं होतं की पॅकेजच्या सर्व मार्गावर चालत, भटकत भटकत पुन्हा फोनच्या जवळ आले होते. काही वेळ रेकॉर्डेड मेसेज वाजत राहिला आणि पुन्हा म्युझिक.. नंतर कोणीतरी खूपच सुसभ्य आवाजात बोललं -” माझं नाव स्टीव आहे, मी आपली काय मदत करु शकतो?”
घाईगडबडीत मी त्याला भारतातून टोरंटोला पोहचणाऱ्या पॅकेजबद्दल सविस्तर सांगितले आणि अगदी शब्दांना जोर देऊन सांगितले की, ” सर, माझं पॅकेज माझ्यापर्यंत अजून पोहोचले नाही. मी घरातच होते. आपल्या आँनलाईन साईटवर ट्रैकिंगची पुर्ण माहिती नाही आहे. “
“असं होऊच शकत नाही मॅडम, तुमच्या पत्यावर, २ एवेन्यू रोडवर पॅकेज डिलीवर केलं गेलं आहे. “
“२ एवेन्यू रोड? परंतु सर, मी २२ एवेन्यू रोडवर राहते. ”
“तुम्ही जो पत्ता दिला आम्ही तिथेच डिलीवर केलं आहे मॅडम. फोन करण्यासाठी आपले धन्यवाद. “
म्हणजे, हे चुकीच्या पत्त्यावर गेले आहे! २ एवेन्यू रोड इथेच आहे काॅर्नरवर. मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता मात्र मला २ एवेन्यू रोडवर लगेचच जायला हवं आणि पॅकेज त्यांच्याकडून परत आणायला हवं. बाहेरच्या सर्दीपासून सुरक्षित राहण्यासाठी जॅकेट, ग्लोव्हज, टोपी, आणि गमबूट घालून मी निघाले. फार दूर नव्हते ते घर, परंतु बर्फाच्या घसरगुंडीवरून चालता चालता खूप वेळ लागला तिथे पोहचायला. गल्लीच्या काॅर्नरवर, २ एवेन्यू रोडवर पोहचल्यावर बघितलं.. घराच्या आजूबाजूला सगळीकडे शांतता होती. कशीबशी बर्फाचे ढिगारे पार करून मी दरवाजा जवळ पोहचले. घंटी वाजवली, दरवाजा थोपटला. चारी बाजूला पांढऱ्याशुभ्र बर्फा व्यतिरिक्त तिथे काहीच दिसल नाही. कोणताज आवाज नाही.. असं वाटत होतं की तिथे कोणीच रहात नाही, कोणी का नसेना मला फक्त पॅकेजशी मतलब आहे.
हे भगवंता, जर इथे कोणी रहातच नाही आहे तर पॅकेज घेतलं कोणी असेल! आता मात्र माझ्या पुस्तकांविरूद्ध कोणतं तरी हे षडयंत्र दिसून येत होतं… असा विचार करणे मुळात मुर्खपणाचे होते. परंतु अशा भयानक परिस्थितीत एखादा मनुष्य आणखीन काय विचार करू शकतो बरं ! डोकं अगदी वाऱ्याच्या वेगाने विचार करत होतं, आतल्या लोकांपर्यंत हा मेसेज कसा पोहचवायचा. कदाचित ह्या घरातील सगळी लोकं कामावर गेली असतील. पण जर असं असतं तर पॅकेज इथे दरवाजाजवळ असतं. आता मी माझ्या घरासारखा कोण्या दुसऱ्याच्या घराबाहेरचा बर्फ उकरून -उकरून पाहू लागले. अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू समजलं तर नवल नाही. मी जरा भानावर आले.
– क्रमशः भाग पहिला.
मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस
मूळ हिंदी लेखिका : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आजपर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत…
जीव वाचला; परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत… !
मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत, मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो… !
परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत…
डाव्या हातात मुंग्या येतात…. मानेपासून डावा हात इतका दुखतो; की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही…. ! या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही…. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते…. !
मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या… तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ… आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ… दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो.
आज मात्र गेलो… मला काय त्रास होतो आहे, याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती…. ! खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो…. मला बघितल्यावर मग, हातवारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या… !
‘ आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? ‘ वगैरे वगैरे… शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या… !
माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही…. तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो…. !
उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं … ‘माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चिमटल्या हायेत… माजा डावा हात नीट काम करत न्हायी… तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो… फकस्त तुमच्यासाटी… ! आणि तुमि माज्याशी भांडायला लागला… ‘ मी काकुळतीने बोललो… !
ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला…
श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात…
…. माझ्या बोलण्यानंतर, रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता…
क्षणात मोसम बदलला होता… !
श्रावणाचा महिना नसताना सुद्धा, भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला… !
…. मग लगेच एकीने खांदा चोळला… एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले… एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली… !
…. साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी… पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला…. !
मी आपला सहज बोलून गेलो, “ एक महिना नाही आलो तर इतकं बोलता… मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ? “
…. या वाक्याने त्यांचा बांध फुटला…
श्रावणाने पुन्हा मौसम बदलला… !
… एक रडायला लागली, डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला…
… एकीने रडत देवाला कौल लावला…
… एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, “डाक्टरच्या” मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती…. !
…… मी भारावून गेलो… माझ्या डोळ्यात पाणी आलं… !
मला खूप पूर्वी वाटायचं, आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ?
आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ?
…. आता, हा प्रसंग पाहिल्यानंतर, माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती… !
मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं, आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली…. !
…. पण जाणीव झाली, आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं, असं आपल्याला वाटत असेल, त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं… !
It’s a damn reality…. !!!
असो…
मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो…. आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपतं त्यावेळी आपल्याला वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं….
…. परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं… त्याला संवेदना म्हणतात… समवेदना म्हणतात…. !
या माझ्या आज्या – मावश्या आज माझ्यासाठी रडल्या… यात मला आनंद नाही…
माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली… यात आनंद आहे !
वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे…. !
… आता मी कधीही गेलो तरी सुद्धा, आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन; याची मला जाणीव आहे….
…. आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही…. !
माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला… !!!
रात्र दिवसाच्या हातावर टाळी देऊन अंधाराच्या आणखीन नजीक येत असते. तसेच काहीसे पहाटे सुद्धा होत असते. रात्र निवृत्ती घेऊन निजावयास निघायच्या तयारीत असते जणू!
दिवसा झोपी जाण्याचा अपराध आणि तो सुद्धा दिवस सायंकाळशी मैत्र साधत असल्याच्या वेळी, जो करील तो आयुष्यात एकदा तरी ह्या चकव्यात सपडतोच.
आपल्याला आज अगदी पहाटे उजडण्याच्या वेळी कशी जाग आली याच्या विचारात माणूस पडतो… आणि दिवस उगवायचा जागी रात्र आणखीन गडद होत जाते! मग लोकांनी सांगितल्यावर समजते… तुम्ही दुपारी उशिरा झोपी गेला होतात… आणि सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास जागे झाला आहात!
असा अनुभव किती तरी जणांना आलेला असेल ना?
त्यादिवशी शनिवार होता. अर्धा दिवस शाळा. साडेतीन चारच्या सुमारास घरी आलो, थोडे खाल्ले आणि बिछान्यावर सहज अंग टाकले… डोळा लागला!
रविवारी सकाळी साडे सहा वाजता वर्गशिक्षक आणि क्रीडा शिक्षकही असलेल्या शिक्षकांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या छोट्या मैदानावर शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस बोलावले होते! ते शिक्षक अगदी एकवचनी. जे म्हणतील ते करून दाखवायचे म्हणजे दाखवायचे! गैर हजर राहाल तर सहामाहीत नापास.. असे त्यांनी सांगून ठेवले होते! (त्यावेळी काही पोरं गैरहजर ऐवजी गयहजर म्हणत…. त्यांची तर हे शिक्षक अजिबात गय करीत नसत!)
आणि नापास म्हणजे चक्क नापास.. आणि असे अपराध पुन्हा केले की एक वर्ष पुन्हा त्याच तुकडीत दिवस काढावे लागणार याची निश्चिती!
त्यामुळे मुलं नापास होत नाहीत तर शिक्षक त्यांना नापास करतात… असा (गैर) समज मनात पक्का झाला होता!
बरं… ते शिकवीत असलेल्या विषयाचा तसा पास नापासशी अजिबात संबंध नव्हता हो! पण त्यांच्या विषयात नापास होणे सोडा, पण एखादी कविता पाठ न करण्याचा अपराधही कधी कुणी केलेला… मेरे स्मरण में नहीं!
कल यह कविता मुखोदगत कर के आना! असा शुद्ध हिंदीत त्यांनी दिलेला आदेश सर्वच विद्यार्थी पाळत ! अन्यथा विद्यार्थ्याच्या मुखाची गत काही धड रहात नसे! याला मराठीत पाठ करणे असे म्हणतात. म्हणून आमच्या पाठी सुद्धा हे शिक्षक हिशेबात धरायचे! त्यांच्या हिंदी विषयाने आमची पाठ सोडली नाही. पण आमच्या त्या तुकडीतील विद्यार्थी राष्ट्रभाषेत उत्तम बोलत.
तसेच…. हमारे जमाने में अध्यापक वर्ग से कोई बहस करते नहीं थे… उलट शिक्षकांनी शिक्षा केली असे घरी समजल्यास घरी पुन्हा त्याची पुनरावृत्ती होई!
तर त्या दिवशी मी सायंकाळी सहा वीस वाजता जागा झालो… दहा मिनिटांत सरांच्या घरी पोहोचणे केवळ अशक्य होते… वर्ष वाया जाणार हे निश्चित! त्यावेळेस रडणे एवढं एकच जमणार होतं. मग.. आईने ‘आपल्याला वेळेत जागे केले नाही’ असा आरोप करायला सुद्धा धजावलो… ! त्यावर आई स्मित हास्य करत राहिली!
घराबाहेर आलो… अंधार होता. पण लोक घराकडे परतत होते… पिंपळाच्या झाडावर कावळे जमा झाले होते… आणि शांत होते!
सहा वीस नंतर उजेड वाढायला पाहिजे होता… पण अंधार वाढू लागला. आणि मग खात्री पटली… रात तो अभी बाकी है मेरे दोस्त !
रविवारी सकाळी पावणे सहा वाजता मी शारीरिक शिक्षणाच्या परीक्षेस तयारीनिशी उपस्थित होतो !
कृपया उपरोक्त विषय पर आधारित दस से पंधरह वाक्यों में निबंध लिख कर लायें !
☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
स्व विंदा करंदीकर
श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’
(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)
मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.
श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.
एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “
मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.
कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.
संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “
आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”
पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”
संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “
आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.
दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “
भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “
एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.
त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.
मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”
अधिकार्याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.
आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”
भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “
भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..
विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.
स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.
पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.
परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….
एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.
राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “
…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “
चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”
….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.
चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “
५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !”
लेखक : प्रा. हरी नरके
प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.
त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.
डोंबिवलीला एम्. आय्. डी. सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, “बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है. ” नंतर दुसर्या कोपर्यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!
आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, ‘आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?’ सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, “तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?” मी आत्मविश्वासानं, “हो, मी ओळखतो आणि तो येईल. ” सर थोडे वैतागले, “अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है. ” मी सरांना म्हणालो, “तो माझ्या काकाचा मित्र आहे. ” सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, “२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ. ” तो रविवार होता. सरांना विचारलं, “सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, “अरे, आओ उस्ताद आओ. ” विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, “कोणाकडे शिकतोस” असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, “त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ” पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.
मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्या चेहर्याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, “अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?” तो उत्तरला, “लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु. लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही. ” मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्या दिवशी पु. ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, ‘कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला. ‘ मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु. लं. चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, “P. L. says Zakir is the definition of Tabla. ” त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.
कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, “आजोबा. किती थापा मारता. ” मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, “बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं. “