मराठी साहित्य – विविधा ☆  असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

यमुनेचे नितळ पाणी शांत होतं. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक येऊन पाण्याची लय हलकेच बदलून जात होती. राधा आणि तिचा मोहन, दुसरं कुणीच नव्हतं यमुनेवर! आज काय झालं होतं कुणास ठाऊक, नेहमी इतका बोलणारा कान्हा आज जरा गप्पच होता. शेवटी राधाच म्हणाली, “बासरी वाजव नां!” त्याने  बासरी ओठांना लावली पण आज भैरवीचे  सूर लागले होते. राधेला विचारावं वाटलं पण ती त्या सुरात इतकी हरवून गेली होती की शब्द सपडलेच नाहीत. बासरी थांबली अन् ती भानावर आली.

लगेच उठून म्हणाली, “उशीर झाला, जायला हवं.”

आर्जवी स्वरात तो राधेला म्हणाला, “इतक्या लवकर?”

“पाहिलसनं रात्र पश्चिमेला सरायला लागली.”

“तरी अजून थोडा वेळ?”

“तो थोडा वेळ संपतो का कधी? चल, निघू या.”

ती चालायला लागली, तो तिच्या मागे.

आज तिला अर्थ कळतोय, ती भैरवी, तो आर्जवी स्वर यांचा!

जेंव्हा अक्रुराचा रथ माधवाला

नेण्यासाठी आला आणि सारं गोकुळ आक्रंदत होतं, नेऊ नको माधवा, अक्रुरा! राधाही पळत होती, पण तिला काय होतंय काही कळतच नव्हतं. ना माधवानं  रथ थांबवला ना मागे वळून पाहिलं. तिचा कृष्ण गेला होता, तिचा निरोपही न घेता! परतताना यमुनेच्या काठावरच्या वाळूतून मंद पाऊले टाकत राधा निघाली. वेड्यासारखी कालची त्याची पाऊलं शोधत होती. तिच्या लक्षात आलं, कोणतीही खूण मागे न ठेवता तो गेला. तिच्या मनात आलं, “कालच त्यानं मला का नाही सांगितलं? मी काय अडवलं असतं कां? नाही! एवढं सहज त्याच्यापासून दूर जाणं जमलं असतं मला? मी ही  कदाचित असाच आकांत केला असता, पायाला घट्ट मिठी मारून बसले असते, जाऊच दिलं नसतं त्याला! हे आयुष्य तर तुलाच समर्पित आहे. तू कुठेही असलास तरी!”

कृष्ण आणि राधा यांची गोष्ट इथेच संपली. ना तो नंद-यशोदेत गुंतला होता, ना गोप-गोपिकेत आणि ना राधेत! पुन्हा तो कधीच गोकुळात परत आला नाही. त्याची बासरी पुन्हा कधीच गोकुळात घुमली नाही.

कृष्ण वेगळाच होता, सगळ्यांच्यात असूनही, कुणाचाच नव्हता. तो देव होता, कितीही खोल बुडाला तरी निर्लेप वर येणारा! त्याने जन्म घेतला तोच मुळी काही उद्दिष्ट ठेवून. त्याचे विहित कर्म करण्यासाठी त्याला जावेच लागणार होते. अर्थात त्यालाही हे देवत्व निभावणे अवघड गेलं असेल. देवाला कुठे मन मोकळं करायचं स्वातंत्र्य आहे! त्यामुळेच त्यानं ती बासरी पुन्हा कधीही वाजवली नाही.पण त्याला काही ध्येय होतं, त्यामुळं गोकुळ विसरणं  शक्य झालं असेल. राधेला मात्र त्याला विसरून जाणं शक्यच नव्हतं. ती तिच्या कृष्णात इतकी एकरूप झाली होती की तिचा कान्हा तिच्या जवळच होता. नीळं आभाळ डोळ्यात पांघरून, बासरीचे सूर कानात साठवून, सहवासाचा क्षण अन् क्षण मनात रुजवून ठेवण्याची तिला गरजच नव्हती, तिला वेगळं अस्तित्व होतंच  कुठे? यमुनेवर पाणी भरायला गेली की बासरीचे सूर अलगद कानावर यायचे, घागर तशीच पाण्यावर तरंगत असायची. पाणी भरायला आलेल्या गोपी तिला जागं करायच्या. जाताना थोडा पाचोळा वाजला की तिला कृष्णाची चाहूल लागायची. पान हललं की तिला मोरपीस दिसायचं. पक्ष्याच्या तोंडातून बी खाली पडली की माठ फुटला असं वाटून थरथरायची. ओलेत्यानं घरी कशी जाऊ? रागानं त्याच्याकडे पाहायची. अखंड त्याचीच स्वप्नं, त्याचाच ध्यास! बाकीचं विश्व तिच्यासाठी नव्हतंच. तो आणि त्याचे विचार, त्याचं अस्तित्व नाकरण्या इतके बाजूला व्हायचेच नाहीत.ती तृप्त होती अन् ही तृप्तीच तिला अतृप्ती कडे नेत होती.

या गोष्टीला तिसराही कोन आहे हे अरुणा ढेरे यांची ‘अनय ‘ ही कविता वाचल्यावर लक्षात आलं. लक्षात आलं की अनय होऊन जगणं सर्वात अवघड आहे. अनय हा राधेवर मनापासून प्रेम करणारा, तिला समजावून सांगण्यात अपयशी ठरलेला, तिची अवस्था बघून कावरा बावरा झालेला, तिच्या सुखासाठी झटणारा, तिच्याकडून कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता! अनय होऊन जगणं अवघड आहे कारण राधेच्या डोळ्यात तिची स्वप्नं पहायची, जी कधीच आपली होणार नाहीत, त्यांना आपल्या काळजात उतरवायचं, आपल्या स्वप्नांना तिच्या डोळ्यात जागा नसली तरी! राधेला कृष्णा सोबतचे कित्येक क्षण होते ज्यावर ती उर्वरित आयुष्य काढू शकत होती,  पण अनय कडे एकही असा भाबडा क्षण नव्हता, ज्यावर उरलेलं आयुष्य ओवाळून टाकावं.

अनय शेवटपर्यंत तिचा होऊन तिच्या अस्तित्वाभोवती घुटमळत, जिंकण्याची आशा मनात फुलवत राहिला.त्यानं कधी त्याबद्दल उपकाराची भाषा केली नाही की आपल्या आयुष्यातून तिला वजा केले नाही.

राधा कृष्ण एकमेकावर प्रेम करणारे पण सारं अधुरंच राहिलेले, राधा अनय लौकिकार्थानं पती पत्नी पण सारं अधुरंच राहिलेले! कृष्णाला मुक्त ठेवण्यासाठी राधेनं आपल्या प्रेमाचा त्याग केला. कृष्णानं कर्तव्य पूर्तीसाठी राधेच्या प्रेमाचा त्याग केला. अनयनं राधेच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला. सांगू शकता कोणाचा त्याग मोठा आहे?राधा – अनय असंही नातं असू शकतं?

हे लिहिताना ही मी डोळ्यांना आवरू शकले नाही. तर हे सारं सोसताना अनय चं काय झालं असेल?

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देवआनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात.

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॉ रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२४ रोजी ते ८२ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. अकरावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॉक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्‌, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठीअसलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॉलिमर रिऍक्षन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार, म्हणजे फक्त भारतरत्न बाकी!

असा क्रषितुल्य भारतीय ८३ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल

या महान वैज्ञानिकाला शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

वंदे मातरम !!

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

नऊ-दहा वर्षाचं वय..  शाळेतली तिसरी चौथी असेल..

दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.

आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..

मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.

कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं  अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..

” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..

शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..

आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..

सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..

त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून  नाकाच्या आत गाठ मारलेली..

याचं  नाव सुंकलं..

परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या  नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…

मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..

दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला  न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…

” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ” 

आईची सूचना..

” अरे व्वा ..नाक टोचलं वाटतं ” भेटणा-या प्रत्येकाकडून कौतुक..

आनंदाच्या डोहात तरंगत असताना दुस-या दिवशी मात्रं  नाक ठणकत असल्याची जाणीव व्हायची.नाकपुडी लालेलाल झालेली असायची. 

तिसरे चौथे दिवशी लाल फोडाने त्या सुंकल्यावर आक्रमण केलेलं असायचं..

प्रचंड दुखणं ..पण  आईला सांगायला  कमीपणा वाटायचा..

दोन दिवस सहन करायची ती वेदना..

कदाचित स्त्री म्हणून वाट्याला येणा-या वेदनेची नि सहनशक्तीची इथूनच सुरूवात होत असावी!

आता त्या फोडात पू भरलेला असायचा..सुंकल्यातल्या मोत्याशी साधर्म्य जोडू पहाणारा तो फोड आता मात्रं आईच्या नजरेतून सुटायचा नाही..

रात्री गरम फुलवातीनं त्याला शेकण्याच्या नावानं नाकाला दिलेले चटके पार काळजापर्यंत पोहोचायचे..

सुंकल्याच्या तारेच्या गाठीचं नाकाच्या आतल्या बाजुला सतत टोचणं , ते सुंकलं पांघरुणात अडकून नाक दुखणं, कपडा काढताना सुंकल्यात अडकणं, खेळताना मैत्रीणीकडून सुंकलं ओढलं जाणं नि नाकातून जीवघेणी कळ उमटणं , चेहरा धुताना त्या सुंकल्यात हमाम साबणं अडकून  मैत्रिणींचा शेंबूड अडकल्याचा गैरसमज होऊन चेष्टा होणं…

यांमुळे ” घी देखा लेकीन बडगा नही देखा ”  …अशी त्या सुंकल्याची अवस्था व्हायची  नि चार -सहा  महिन्यांत त्या सुंकल्याशी  काडीमोड  व्हायचा!!

” नाक बुजू देऊ  नको गं..नाहीतर लग्नात नथ घालायला अडचण यायची ” ..असे सल्ले मिळायचे नि अधूनमधून खराट्याच्या छोट्याश्या काडीनं  नाकाच्या छिद्राचं अस्तित्त्व टिकवलं जायचं!

शाळेच्या स्नेहसंमेलनात   छोट्याशा खोट्या कोळीछाप  नथणींनं नाक सजायचं

नि ” टिमक्याची चोली बाई  ” गाण्यावर  मनमुराद नाचायचं..

” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ”  अशा गुजराती मारवाडी  नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची  नि  सुरेखशा साखळीनं  ही  नथनी  केसाशी नाहीतर कानातल्याशी  संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!

या नथन्या  त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत  निपचित पडून रहायच्या!

आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं  नि  महाविद्यालयाचं शहर लागलं..

या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…

कधी  रेखाची  नाहीतर राखीची नाकातली रिंग  तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी   मनातल्या मोरपिसाला साद घालायची..

अशी  चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..

भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की  जीव शांत शांत व्हायचा..

त्या चमकीचा  प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि  अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..

एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..

चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..

नंतरचे अनेक दिवस औषधाचे  नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू  डोस गपगुमान गिळावे लागले..

चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…

आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत  गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …

कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली  ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..

त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..

घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू  नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की  तिचं  अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य  स्वर्गीय भासायचं…!!

आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …

नि  आपण कधीही  नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..

लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी  एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..

उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..

” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा  मान  आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “

आता ही नथ दागिना राहिली नव्हती..

ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …

आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी  गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!

मी  अचानक मोठी झाले..

लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!

आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!

सुंदर दिसावं ही  प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…

फक्त महाराष्ट्रातच  नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…

केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..

मंगळसुत्राखालोखाल  सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा  मोठा मान…

तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..

या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..

नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..

महिलांच्या शरीराची डावी बाजू ही  प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..

म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..

यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..

खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…

मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…

पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..

इतरवेळी  जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.

नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी 

अगदी  उंची साडीवरही  दिसू  लागलीय…!!

असतो  एकेकाचा  काळ …

कालाय  तस्मै  नम: !!

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले

सोलापूर

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “चाकोरीतल्या जगण्यामधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक सुंदर खिडकी वजा दरवाजा••• त्यातून कुतुहलाने बाहेर डोकावणारी स्त्री••• मागे स्वयंपाक घरातील दिसणारी मांडणी•••

बस एवढेच चित्र. पण त्याच्या मोहक सौंदर्याने लक्ष वेधून घेते आणि काही क्षण तरी निरिक्षण करायला भाग पाडते.

नंतर दिसते ते चित्राच्या खाली असलेले पुस्तकाचे शिर्षक••• ‘चाकोरीतल्या जगण्यामधून ‘.

मग लगेच विचारचक्र फिरू लागते आणि चित्राचा वेगळा अर्थ उमगतो की स्त्री••• जी संसाराच्या चाकोरीत अडकली आहे, तिलाही संसाराच्या पलिकडच्या जगाचे कुतूहल आहेच की! त्याच कुतुहलाने ती बाहेर डोकावून बाहेरच्या जगाचा अंदाज घेत आहे•••

नीट पाहिले तर तिचा संसार  म्हणजे तिचे स्वयंपाकघर हे मुख्य असले तरी सध्याची परिस्थिती पहाता ती चूल आणि मूल यामधेच गुरफटून न रहाता संसाराला मदत म्हणून या चौकटीतून बाहेर पडून काही करण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठी तिचे एक पाउल बाहेर पडले पण आहे .

जरी तिचे एक पाऊल बाहेर पडले असले तरी अवस्था मात्र नरसिंहासारखी द्विधा झाली आहे. ना धड घरात ना धड बाहेर••• ना मुक्त ना बांधलेले तरीही या उंबरठ्याशी जगडलेले••• 

स्त्रीने कितीही बाहेर पडून स्वर्ग हाती घेतले तरी तिला आजही घरचे सगळे बघावेच लागते. ती कोणत्याही कारणाने घराच्या चौकटीच्या बाहेर आली तरी सरड्याची धाव कुंपणार्यंत तसे काहीतरी तिच्या बाबतीत होते आणि घर , घराचा उंबरठा हे तिचे मर्मस्थानच बनते.

हे प्राधान्य असले तरी आजकालची स्त्री ही घराच्या चौकटीतून बाहेर पडू लागली आहे हे वास्तव स्पष्टपणे दिसते.

नीट पाहिले तर या चौकटीवर धावदोर्‍याची टीप दिसते आणि यातूनही बरेच अर्थ प्रेरित होतात. स्त्रीचे आयुष्य हे घरचे बाहेरचे ऑफिसचे सणवार पाहुणेरावळे यामधे धावतेच झालेले आहे .तीच तिची चाकोरी बनली आहे.

अजून विचार केला तर वाटते स्त्रीचे आयुष्य बाहेर वेगळे असले तरी तिच्या भावना या  धावदोरा घालून घराच्या चौकटीतच शिवल्या गेल्या आहेत.

अशा अनेक स्त्री समस्यांना वाचा फोडणारे हे चित्र. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरील हावभावामुळे स्त्री व्यथेतून मोकळी होऊन आपले विश्व मी निर्माण करीन. चौकटी बाहेर जाऊनही चौकटीची मर्यादा मान हे जपून संसार फुलवेन या आत्मविश्वासाचे द्योतक वाटते . 

अर्थातच या नावामुळे आणि त्यातील गर्भितार्थामुळे पुस्तकाच्या अंतरंगात डोकावायची ईच्छा होतेच.

ईतके साधे चित्र पण कल्पकतेतून त्याला विविध आयाम द्यायच्या कसबतेमुळे मनाचा ठाव घेते .त्याबद्दल मुखपृष्ठकार नयन बारहाते, संवेदना प्रकाशनचे प्रकाशक नीता,नितीन हिरवे आणि लेखिका सविता इंगळे यांचे मन:पूर्वक आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares