मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.
मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.
काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.
पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी ” काळजी घे ” म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा, डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.
त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.
कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या ” काळजी घ्या ” ची सर कशाला नाही.
आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.
हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.
बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.
तिळगुळ घ्या गोड बोला
संवाद असू द्या स्नेह असू द्या !! ……
लेखक : अज्ञात
प्रस्तुती.. सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
परत परत कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मेघालय आणि इतर स्थानांची सफर वेगळ्याच विश्वात, अगदी आकाशातील मेघात घेऊन जाणारी आहे! मी तिथे आपल्या सोबत परत एकदा पर्यटन करते आहे याचा “आनंद पोटात माज्या माईना” असं होतंय! मी भरून पावले! येथील अगदी खासम-खास वैशिष्ठे म्हणजे जिवंत मूळ पूल, जिथे आपण फिरलोय आणि अजून एक (हाये की), जिथे आपण आज आश्चर्यजनक प्रवास करणार आहोत! मैत्रांनो, आता चेरापुंजीला आलोच आहोत तर, आधी इथल्या गुह्य ठिकाणांचे अन्वेषण करायला निघू या! इथे आहेत कित्येक रहस्यमयी गुंफा! चला आत, बघू या अन शोधू या काय दडलंय या अंधारात!
मावसमई गुहा (Mawsmai Cave)
मेघालयची एक खासियत म्हणजे भूमिगत गुहांचे विस्तीर्ण मायाजाल, काही तर अजून गवसलेल्या नाहीत, तर काहींमध्ये चक्रव्यूहाची रचना, आत जा, बाहेर यायचं काय खरं नाय! काहींच्या वाटा खास, फक्त खासींना ठाव्या! आत्ता म्हणे एक ३५ किलोमीटर लांब गुहा सापडलीय इथे! ऐकावे ते नवल नाहीच मैत्रांनो! मावसमाई गुहा सोहरा (चेरापुंजी) पासून दगडफेकीच्या अंतरावर (स्टोन्स थ्रो) आणि याच नांवाच्या लहान गावात आहे (शिलाँगपासून ५७ किलोमीटर). ही गुहा कधी सुंदर, आश्चर्यचकित करणारी, कधी भयंकर, कधी भयचकित करणारी, असं काही, जे मी एकदाच पाहिलं, रोमांचकारी अन रोमहर्षक! इथे आम्ही गेलो तेव्हा (माझ्या नशिबाने) प्रवास्यांचे जत्थेच होते, फायदा हा की परत जाणे कठीण, त्यातच गुहेची सफर केवळ २० मिनिटांची, आतापर्यंत साथ देणारे ट्रेकर्स शूज बाहेरच ठेवलेत. अनवाणी पायांनी अन रिकाम्या डोक्याने जायचे ठरवले. मोबाइलचा उपयोग शून्य, कारण इथे स्वतःलाच सांभाळणे जिकिरीचे! लहान मोठे पाषाण, कुठे पाणी, शेवाळे, चिखल, अत्यंत वेडीवाकडी वाट, कधी अरुंद कधी निमुळती, कधी खूप वाकून जा, नाही तर कपाळमोक्ष ठरलेला! काही ठिकाणी आतल्या दिव्यांचा उजेड, तर काही ठिकाणं आपण (विजेरीचा) थोडा तरी उजेड पाडावा म्हणून अंधारलेली! मी ट्रेकर नव्हे, पण गुहेचं हे सगळं अंतर कसं पार केलं हे ‘कळेना अजुनी माझे मला!!!’ (मंडळी या लेखाच्या शेवटी गुहेच्या सौंदर्याचा (!) कुणीतरी यू ट्यूब वर टाकलेला विडिओ जरूर बघा! कुणाला काय अन कोण सुंदर वाटेल याचा नेम नाय!)
मात्र तिथे आठवतील त्या देवांचे नाव घेत असतांनाच माझ्या मदतीला धावून आल्या दोन मुली (हैद्राबाद इथल्या). ना ओळख ना पाळख! माझी फॅमिली मागे होती. या मुली अन त्यांच्या आयांनी माझा जणू ताबाच घेतला! एखाद्या लहान मुलीला जसे हात धरून चालायला शिकवावे त्याहीपेक्षा मायेनं त्यांनी मला अक्षरशः चालवलं, उतरवलं अन चढवलं. जणू काही मीच एकटी तिथे होते! अन या अगदी राम लक्ष्मणासारख्या एक पुढती अन एक मागुती, अशा दोघी माझ्या बरोबर होत्या! मित्रांनो, बाहेर आल्यावर तर “माझे डोळे पाण्याने भरले” अशी अवस्था होती, माझ्या फॅमिलीने त्यांचे आभार मानले. आपले नेहमीचे सेलेब्रेशन खाण्याभोवती फिरते, म्हणून मी त्यांना गुहेतून बाहेर आल्याबरोबर म्हटलं “चला काही खाऊ या!” त्यांनी इतकं भारी उत्तर दिलं, “नानी, आप बस हमें blessings दीजिये!” १४-१५ वर्षांच्या त्या मुली, हे त्यांचे संस्कार बोलत होते! (ग्रुप फोटोत बसलेल्या उजवीकडील दोघी)! त्यांना कुठं माहित होतं की गुहेच्या संपूर्ण गहन, गहिऱ्या अन गर्भार कुशीत मी त्यांनाच देव समजत होते, आशीर्वाद देण्याची पत कुठून आणू? मंडळी, तुम्ही प्रवासात कधी अश्या देवांना भेटलात का? आत्ता हे लिहितांना देखील त्या दोन गोड साजऱ्या अन गोजिऱ्या अनोळखी मुलींना मी गहिवरून खूप खूप blessings देतेय!!! जियो!!!
आरवाह गुहा (Arwah Cave)
चेरापुंजी बस स्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे आरवाह गुहा, ही मोठी गुहा Khliehshnong या परिसरात आहे. यात खास बघण्यासारखे काय तर चुनखडीच्या रचना आणि जीवाश्म! अत्यंत घनदाट जंगलाने वेढलेली, साहसी ट्रेकर्स अन पुरातत्व तत्वांच्या प्रेमात असलेल्यांसाठी पर्वणीच जणू! ही गुहा मावसमई गुहेपेक्षा मोठी, पण हिचा थोडाच भाग पर्यटकांना बघायला मिळतो. ३०० मीटर बघायला २०-३० मिनिटे लागतात. मात्र यात गाईड हवाच, गुहेत गडद अंधाराचे साम्राज्य, तर कुठे कुठे अत्यंत अरुंद बोगद्यातून, कधी निसरड्या दगडांच्या वाटेतून, तर कधी पाण्याच्या प्रवाहातून सरपटत पुढे जातांना त्रेधा उडणार! भितीदायक वातावरणात अन विजेरीचा प्रकाश पाडल्यावर अनेक कक्ष दिसतात, त्यांत गुहेच्या भिंतींवर, छतावर आणि पाषाणांवर जीवाश्म (मासे, कुत्र्याची कवटी इत्यादी) आढळतात. यातील चुनखडीच्या रचना व जीवाश्म लाखों वर्षांपूर्वीचे असू शकतात. मंडळी, ही माझ्या घरच्या लोकांनी पुरवलेली माहिती बरं कां! गुहेपर्यंत ३ किलोमीटर पायऱ्यांचा रस्ता, आजूबाजूला घनदाट हिरवे वनवैभव, मी गुहेच्या द्वाराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावरच थांबले. मला गुहेचे दर्शन अप्राप्यच होते. या बाबत तिथला गाईड आणि आमचा आसामी (असा तसा नसलेला हा असामी!) ड्रायव्हर अजय, यांचे मत फार महत्वाचे! घरची मंडळी गुहेत जाऊन दर्शन घेऊन आली, तवरीक मी एका व्ह्यू पॉईंट वरून नयनाभिराम स्फटिकासम शुभ्र जलप्रपात, मलमली तलम ओढणीसम धुके, गुलाबदाणीतून शिंपडल्या जाणाऱ्या गुलाबजलाच्या नाजूक शिड्काव्यासारखी पावसाची हलकी रिमझिम अन मंद गुलबक्षी मावळत अनुभवत होते. मित्रांनो, ज्यांना शक्य आहे त्यांनी या अगम्य गुहेचे रहस्य जाणण्याचा जरूर प्रयत्न करावा!
रामकृष्ण मिशन, सोहरा
येथील टेकडीच्या माथ्यावर रामकृष्ण मिशनचे कार्यालय, मंदिर, संस्थेची शाळा आणि वसतिगृह फार देखणे आहेत. तसेच इथे उत्तरपूर्व भागातील विविध जमातींची माहिती, त्यांचे विशिष्ट पेहराव, त्यांच्या कलाकृती आणि बांबूंच्या वस्तू असलेले एक संग्रहालय अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे मेघालयातील गारो, जैंतिया आणि खासी जमातींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कलाकृती, मॉडेल्स आणि त्यांची सखोल माहिती असलेली खोली देखील फार प्रेक्षणीय आहे. रामकृष्ण मिशनच्या कार्यालयात इथल्या खास वस्तूंचे तसेच रामकृष्ण परमहंस, शारदा माता व स्वामी विवेकानंद यांचे फोटो अणि अन्य वस्तू, तथा परंपरागत वस्तूंची विक्री देखील होते. आम्ही येथे बऱ्याच सुंदर वस्तू खरेदी केल्या.
सायंकाळी रामकृष्ण परमहंस मंदिरात झालेली आरती सर्वांना एका वेगळ्याच भक्तिपूर्ण वातावरणात घेऊन गेली. आरतीची परमपावन वेळ जणू कांही आमच्यासाठीच दैवयोगाने जुळून आली व अत्यंत आनंदाची गोष्ट ही की, आम्हाला या पवित्र वास्तूचे दर्शन झाले! एकंदरीत हे अतिशय रम्य, भावस्पर्शी आणि भक्तिरसाने परिपूर्ण स्थान पर्यटकांनी नक्की बघावे असे मला वाटते. (संग्रहालयाच्या वेळांची माहिती काढणे गरजेचे आहे.)
मेघालय दर्शनच्या पुढच्या भागात, मी तुम्हाला मावफ्लांग, पवित्र ग्रोव्ह्स/ सेक्रेड वूड्स/ पवित्र जंगलात आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या अद्भुत स्थळांकडे घेऊन जाईन. मंडळी, आहात ना तयार?
सध्यातरी खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
टीप- लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!
मेघालय, मेघों की मातृभूमि! “सुवर्ण जयंती उत्सव गीत”
(Meghalaya Homeland of the Clouds, “Golden Jubilee Celebration Song”)
मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.
छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही. हसणं तर जाऊदेच पण त्या कायम चिडलेल्या असत. काही बोलायला गेलं की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत. आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही. न बोलता त्या कामाला लागत. मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.
मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.
मला वाटलं की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं. ती म्हणाली, “हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे.”
“अगं ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.
आई म्हणाली, ”नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”
एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती. मला काही उलगडत नव्हतं.
मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते. मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की गं आत!” म्हणाल्या. मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.
आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.
आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं. मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा “गुण” त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.
त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको.”
“आई तुझी भारी हूशार बघ. मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची गरज आहे.” आजीने डोळे पुसले.
मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती पण आजी ऐकेनात. त्या म्हणाल्या, ”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”
मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”
मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे नोकरी लावून दिली व डॅाक्टरांना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.
आई, तू किती चांगली आहेस ग!” म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, ”तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं… कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते, पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं. अपराध्याला काही न बोलता माफ करणं ही पण एक प्रकारची शिक्षाच आहे बघ.” मी चमकून आईकडे बघितले.
“आजी सतत चिडचिड का करायच्या? कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतंय. एखादी सवय अशी असते की आपलं चुकतंय हे माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं.” आई म्हणाली.
“मग आई, या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.
आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “ त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद मिळू दे. डॅाक्टर म्हणाले आहेत की behavior therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे. एकदा त्यांची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”
मी आईकडे अभिमानाने बघितलं. १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं तेवढंच आजींना माफ करणं महत्वाचं होतं. त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही. माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.
मी आईला घट्ट मिठी मारली! “आई गं, तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”
आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे. बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असतं. आत लपलेले बरंच काही आपल्याला सहजी दिसत नाही..
“Before you judge someone, at least walk a mile in his shoes “ असं म्हणतात ते उगीच नाही !
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संग्राहिका – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
वैद्यकीय
रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे उपचार देण्यात आले.
ज्यांना अजिबातच ऐकायला येत नाही अशी अनेक वृद्ध मंडळी मला रस्त्यात भेटतात. रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना किंवा इतर अनेक वेळी ऐकूच न आल्यामुळे अपघात होतात त्यात बऱ्याच वेळा हात पाय मोडले जातात.
अशा सर्वांना एक एक करून मांडके हियरिंग सर्विसेस या प्रथितयश संस्थेतून कानाची तपासणी करून घेत आहोत आणि योग्य त्या व्यक्तींना कानाची मशीन देत आहोत.
ऐकू यायला लागल्यानंतर ही माणसं छोटे छोटे आवाज सुद्धा कौतुकाने ऐकत राहतात. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा गोंगाट… हॉर्नचा कर्ण कर्कश्श आवाज… स्पीकरवर जोरजोरात लागलेली गाणी… एरव्ही कोणालाही या सर्वाचा त्रास होईल, परंतु त्यांना हे आवाज ऐकताना खूप आनंद होतो…!
ज्यांना दिसत नाही अशा अनेक वृद्धांना रासकर डोळ्यांचे हॉस्पिटल किंवा लेले हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करत आहोत, चष्मे देत आहोत आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करून घेत आहोत.
दिसायला लागल्यानंतर यांना काय पाहू आणि काय नको असं होतं…
भिंतींचे रंग, गाड्यांचे रंग, आकाशाचा रंग, घातलेल्या कपड्याचे रंग… एरव्ही या गोष्टी सुध्दा कोणी इतक्या बारकाईने पाहत नाही परंतु याच गोष्टींचं त्यांना किती अप्रूप…!
बरोबर आहे, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याला त्याची किंमत नसते…
उपाशी असलेल्यालाच चतकोर भाकरीची किंमत जास्त कळते…
शेवटी काय, आनंद आणि सुख याची खरी अनुभूती त्यालाच येते ज्याने या अगोदर दुःख पचवली आहेत…!
कुंडीतीलं झाड अतिशय सुरक्षित वातावरणात जगत असतं, पण ते कुणीतरी पाणी घालण्याची वाट पाहत असतं, परंतु जमिनीवर उगवलेलं झाड मात्र जमिनीतला ओलावा शोषून जगतं…!
अशीच जमिनीतला ओलावा घेवुन जगणारी… रस्त्यावर राहणारी वृद्ध माणसं… माझे मित्र श्री नितीन पाटील यांच्या सहकार्याने, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अतिशय उत्तम क्वालिटीची ब्लॅंकेट या सर्वांना देऊन त्यांच्या अंगावर मायेचं पांघरुण घालता आलं…
अन्नपूर्णा प्रकल्प
आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत.
आयुष्याच्या वाटेवर भेटलेले, श्री अमोल शेरेकर, हे फक्त शरीरानेच दिव्यांग आहेत. बाकी आत्मविश्वास एखाद्या धडधाकट माणसाला सुद्धा लाजवेल.
अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण व्यवसाय सुरू करून दिला आहे.
अमोल यांची पत्नी घरात जेवण तयार करते आणि श्री अमोल शेरेकर पॅकिंग करून रुग्णालयातील भुकेल्या गरिबांच्या हातात हे डबे नेवुन देतात.
It’s our win-win situation
इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.
खरंच जेवणाच्या एका घासाने किती जणांना जगवले…. !
खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे.
आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत.
या संपूर्ण वर्षात कधी भंगारवाला झालो आणि उकिरड्यात टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यांना जोडत गेलो… कधी पोस्टमन होऊन आपली मदत योग्य त्या पत्त्यावर पोहोचवली…. आणि वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत गेलो…!
उजाले मे मिल जाते हैं लाखों यहाँ…
अहसान उनका मानो जिन्होने अंधेरे मे साथ दिया…
आमच्या या धडपडीला तुमची साथ मिळाली… विनाअट विना अपेक्षा आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आम्हाला मदत करत गेलात, ऋण कसं फेडावं तुमचं…???
काही वेळा मला असं वाटतं, की आपण एकाच घड्याळाचे काटे आहोत…. प्रत्येक काट्याची उंची वेगळी, गती वेगळी, रुप वेगळे, रंग वेगळा….
तरीही घड्याळाच्या मध्यबिंदूवर आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत…. हा मध्यबिंदू आहे माणुसकीचा…!!!
आणि उंची, गती, रूप, रंग वेगळा असेलही परंतु, घड्याळाच्या या एका परिघात आपण एकत्र राहून एकाच दिशेने चाललो आहोत…
वर्षभरात नकळतपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत… मोठ्या मनानं माफ करावं…. !
सरत्या वर्षाचे धन्यवाद, येणाऱ्या वर्षाला अभिवादन आणि आपणा सर्वांना प्रणाम.
☆ “वस्त्र” – लेखिका : सुश्री अश्विनी मुळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
त्या वैभवशाली, भव्य दरबारात ती एखाद्या भिंगरीसारखी गरगरत होती. हात जोडत होती, विनवण्या करत होती. ती तेजस्वी बुद्धीमती युक्तिवाद करत होती. पण सर्वांच्याच माना खाली होत्या. अखेर दु:शासनाने तिच्या केसांना पकडून तिला थांबवलं आणि तिच्या वस्त्राला हात घातला. एकच जळजळीत नजर आपल्या महापराक्रमी पतींकडे टाकून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. कृष्णाचा धावा सुरु केला. “तुझं बोट कापल्यावर मी बांधलेल्या चिंधीएवढं वस्त्रसुद्धा माझ्या अंगावर उरणार नाहीये आता. तू तरी काही करणार आहेस कां? की तूही बसणार आहेस मान खाली घालून?” पण हे काय? संपूर्ण शरीराला वस्त्राचा स्पर्श अजूनही कसा काय जाणवतोय? दुर्योधनाचं मन बदललं कां? तिने हलकेच डोळे उघडले. दु:शासन दात ओठ खात दरादरा वस्त्र ओढत होता आणि ते संपतच नव्हतं. एकाला जोडून दुसरं. दुसऱ्यात गुरफटलेलं तिसरं. शालू, शेले, अंशुकं, किंशुकं, पटाव. रेशमी, कशिदाकारीची, जरीबुट्टयांची वसनं. ओघ संपतच नव्हता. संपूर्ण राजसभा पुतळ्यासारखी स्तब्ध होऊन ते आश्चर्य बघत होती. दुर्योधनाचा मदोन्मत्त चेहरा भयचकित झाला होता. बलदंड दु:शासन घामाने नाहून निघाला होता. आणि एका क्षणी ते पृथ्वीमोलाचे पाटव प्रकटलं. त्याच्या सुवर्ण झळाळीने सर्वांचे डोळे दिपले. त्या वस्त्राला मात्र हात घालण्याची हिंमत दु:शासनात नव्हती. ते तेज असह्य होऊन तो खाली कोसळला. पितामह भीष्मांनी हात उंचावून इशारा केला आणि नि:शब्दपणे दरबार रिकामा झाला. उरले फक्त अग्निकुंडातल्या ज्वालेसारखी दिसणारी द्रौपदी आणि तिच्या पायाशी कोसळलेला दु:शासन. त्याच क्षणी अठरा दिवस चालणाऱ्या सर्वसंहारी महायुद्धाचं बीज रोवलं गेलं.
वस्त्राच्या हरणामुळे महाभारत झालं आणि हरणाच्या वस्त्रामुळे रामायण घडलं. एक पळही विचार न करता, राजवस्त्रांचा त्याग करून, वल्कलं लेऊन रामा पाठोपाठ वनाची वाट धरणाऱ्या राजसबाळी सीतेला सुवर्णमृगाच्या काचोळीचा मोह कसा काय पडला असेल? तो मोह इतका प्रभावी होता की रामाने परोपरीने सांगूनही तिने आपला हट्ट मागे घेऊ नये? तिची फक्त पाऊले पहिलेल्या लक्ष्मणावर तिने संशय घ्यावा? त्याने संरक्षणासाठी आखून दिलेली मर्यादा तिने ओलांडावी?
आपल्या तीन प्राथमिक गरजांमधे दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वस्त्रांची ही ताकद. ज्यांनी दोन अजरामर युद्धं घडवून आणली. समरभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्णाला वस्त्रच आठवलं. ‘वासांसी जीर्णानी यथा विहाय’.
गेले तेरा दिवस एक वस्त्र लाखो लोकांना जोडून घेत होतं. रेशमी धाग्यांबरोबर अतूट श्रद्धा गुंफली जात होती. लाखो हात ते विणत होते. लाखो पाय त्या वस्त्रापर्यंत पोचण्यासाठी आनंदाने तिष्ठत होते. प्रेम, श्रद्धा, भक्तीचा कशिदा त्यावर उमटत होता. राजवस्त्र हा शब्दसुद्धा अपुरा ठरेल त्या महावस्त्राला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी विणल्या जाणाऱ्या वसनात आपले दोन धागे सोडताना लाखो मनं उचंबळत होती. अनघाताई घैसास, तुमचं कौतुक तरी किती करू? आपण मांडलेल्या या खेळात किती सहजपणे तुम्ही सर्वांना सामावून घेतलंत. रोज बारा बारा तास चालणारे पंधरा हातमाग आणि त्यात आम्ही दिलेलं दोन धाग्यांचं अर्घ्य. त्या दोन धाग्यांत तुम्ही आम्हाला श्रीरामापर्यंत पोचवलंत. अयोध्येला कधी जाणं होईल, माहित नाही. कधी ते रामदर्शन होईल, माहित नाही. पण माझ्या हातचे दोन धागे आज ना उद्या रामचंद्राच्या पोशाखात असतील, ही भावनाच किती तोषवणारी आहे. रामाची मूर्ती घडवण्यासाठी आणलेल्या शिळेला स्पर्श करताना जे समाधान मिळालं, त्याच तोडीचं धागे विणतानाचं समाधान होतं. त्या दोन धाग्यांनी प्रत्येकाचा सहभाग राममंदिराच्या उभारणीत नोंदला गेला. पुणे ते अयोध्या हे अंतर एका नाजुकशा धाग्यावर स्वार होऊन, आम्ही सहज पार केलं. जेव्हा प्रभू रामांचं प्रत्यक्ष दर्शन घेऊ तेव्हा आम्ही विणलेले धागे त्यांच्या वस्त्रातून आम्हाला ओळख देतील. हे भाग्य अनघाताई, तुम्ही आम्हाला दिलंत.
लेखिका : अश्विनी मुळे
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.
रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.
परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”
मी त्याला विनंती केली, “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”
क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”
माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”
क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.
मी त्याच्या समोरच्या बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”
नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.
मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.
मी त्याला म्हणालो,
” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”
तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं म्हणू शकता ?”
मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.
बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.
बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’
अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.
आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.
पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.
मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.
काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”
माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”
मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”
तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.
मध्ये कित्येक वर्षे गेली….
अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…
“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “
“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”
खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’
ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.
साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.
साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”
तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.
मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.
लेखक – अज्ञात
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – यह कसक पुरानी है…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 36 – यह कसक पुरानी है… ☆ आचार्य भगवत दुबे
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈