मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना श्यामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ‘ हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? ‘

‘श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.

‘अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? ‘

‘व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणि नाही लिहून आणलं तर त्या शिक्षा करायच्या. ‘

‘पण सोपान अजूनही भागवत बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ‘ श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.

‘हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ‘ संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. रामू लोहाराच्या भट्टीत लोखंड जसं तावून सुलाखून निघालं. ‘ श्यामराव म्हणाले.

अरे वा, एकदम बरोबर. ‘ सोपानराव म्हणाले. आणि दुसरी म्हण कोणती आठवली बाबा तुला ? ‘

‘अरे सोपान, आपण कधी सोनाराकडे गेलो तर तो आपल्या छोट्याशा हातोडीचे फटके दागिने घडवताना मारताना आपल्याला दिसतो. पण आता पाहिले ना रामू लोहाराकडे. त्याच्याकडे मोठा घण आहे. सोनाराच्या हातोडीचे शंभर फटके आणि याचा एकच दणका बरोबर नाही का ? म्हणून सौ सुनार की और एक लोहार की ही म्हण आठवली. ‘

‘बरोबर आहे मित्रा ‘ सोपानराव म्हणाले.

‘बाबा, आम्हीही या म्हणी ऐकल्या होत्या पण त्याचा अर्थ आम्हाला आता स्पष्ट झाला. ‘ पिंकी म्हणाली.

सगळे रामूच्या ओट्यावरून खाली उतरले आणि पुढे निघाले. काही अंतरावर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक फिरकी आणि आकडा घेऊन एक लांबच लांब दोरी फिरवत होते. ती मुलं साधारणपणे राजेश आणि पिंकीच्याच वयाची होती.

राजेश म्हणाला, ‘ बाबा, ही मुलं काही खेळ खेळताहेत का ? ‘

सोपानरावांना हसू आले, ‘ अरे पोरांनो, हा खेळ नाही. त्यांना बिचाऱ्यांना आपलं पोट भरण्यासाठी हा उद्योग करावा लागतो. ही मुलं दोर तयार करत आहेत. दोरी, दोरखंड असं ते तयार करतात. मग त्यांचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी विक्रीसाठी घेऊन जातात. फार मेहनत आणि चिकाटी आहे त्यामागे. ‘

‘अच्छा काका. म्हणजे अशा प्रकारे दोर तयार करतात तर ! आम्ही कधी पाहिले नव्हते. कशापासून बनवतात ते दोर ? ‘ पिंकीनं विचारलं.

‘तसं तर अनेक वस्तूंपासून दोर तयार करतात. म्हणजे गवत, ताग, कपाशी, लव्हाळे, काथ्या यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण आमच्या इथे जवळच मोठं जंगल आहे शिवाय शेती आहे. शेतीच्या बांधावर आणि जंगलात घायपात नावाची वनस्पती उगवते. तिच्यापासून दोर करतात. घायपातला घायाळ, केकती अशी पण नावं आहेत. पण आता या बिचाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. लोक त्यांच्याजवळून दोर विकत घेण्यापेक्षा शहरातील दुकानांमध्ये जाऊन माल विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे असे दोरखंड तयार करणारे कारागीर आता ग्रामीण भागात फार कमी आहेत. ‘

‘काका, किती छान आणि नवीन माहिती मिळाली आम्हाला !’ राजेश म्हणाला.

‘चला, आता आपण जरा दुसरीकडे जाऊ. मी येथील कुंभार आळीत तुम्हाला नेतो. ‘ सोपानकाका म्हणाले. जवळच्या एका बोळातून ते सगळे मग कुंभार आळीत शिरले. त्या आळीत तीनचार कुंभारांची घरे होती. काही घरांच्या बाहेर माठ रचून ठेवले होते. काही ठिकाणी पाणी भरण्याचे मोठे रांजण होते. कुठे कुठे मातीच्या चुली दिसत होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी होती. पोळ्यासाठी लागतील म्हणून मातीचे बैल तयार करून त्यांना रंग देणे काही ठिकाणी सुरु होते. एका ठिकाणी एक कुंभार बाबा एका चाकावर झाडांसाठी लागणाऱ्या मातीच्या कुंड्या तयार करताना दिसत होते. ‘

‘रामराम हरिभाऊ. पाहुण्यांना घेऊन आलो तुमच्याकडे. ‘ सोपानराव कुंभार बाबाना म्हणाले.

‘या की मग. पाव्हणं कुठलं म्हणायचं ? हरिभाऊ म्हणाले.

‘हरिभाऊ, हा माझा बालमित्र श्याम. या वहिनी आणि ही त्यांची मुलं पिंकी आणि राजेश. शहरातून आलेत आपला गाव पाहायला. ‘ सोपानराव म्हणाले. ‘ या मुलांना जरा तुमच्या कामाची माहिती सांगा. ‘

आपल्याला कोणीतरी काही विचारते आहे याचा आनंद होऊन हरिभाऊंची कळी खुलली. ते मोठ्या उत्साहाने सांगू लागले.

‘ बाळांनो, या कामासाठी आम्ही लई पारखून माती आणतो बरं का ! नदीकाठची किंवा तलावाकाठची माती लागते. त्या मातीला गाळून, वाळवून मग तिच्यात लीद, गवत, शेण, राख, धान्याची फोलपटे यासारख्या गोष्टी मिसळतो. मग ती चांगल्या प्रकारे मुरू देतो. त्यानंतर तिचे गोळे बनवून मग त्याच्या वस्तू घडवतो. हे चाक, यावर आम्ही वस्तुंना आकार देतो. आता तुम्ही ते पाहताच आहात. त्याशिवाय हा एक दगड आहे. त्याला आम्ही गंडा किंवा गुंडा म्हणतो. त्यामुळे वस्तूला गुळगुळीत आकार येतो. ही एक लाकडी थोपटणी, तिला आम्ही चोपणी म्हणतो. वस्तू तयार करताना तिला बाहेरून आम्ही याच्याने थोपटतो. तयार झालेल्या वस्तू आम्ही ज्या भट्टीत भाजतो, तिला आवा म्हणतात. ‘

‘ पोरांनो, आता आमचा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही. मातीच्या वस्तू लोक कमी विकत घेतात. पण तुम्हाला म्हणून सांगतो. पूर्वी स्वयंपाकासाठी मातीचीच भांडी वापरली जायची. गोरगरिबांच्या घरात स्वयंपाक त्यांच्यावर व्हायचा. पण आता स्टील, अल्युमिनियम यांची भांडी आली. लोकं तीच घेत्यात पण आरोग्यासाठी मातीचीच भांडी चांगली. त्यात पोषक घटक बी असत्यात आन स्वयंपाकाला लई ब्येस चव येते बघा. आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट बी लई न्यारी असतीया. ‘ हरिभाऊ उत्साहाने बोलत होते. बोलता बोलता एकीकडे त्यांचे कामही सुरु होते.

त्यांच्या हातातील ती कला पाहून राजेश आणि पिंकीला आश्चर्य वाटले. ती दोघेही बराच वेळ त्याचं निरीक्षण करत उभी राहिली. ‘ एकाच प्रकारच्या मातीतून माठ, रांजण, कुंड्या, पणत्या, चुली आदी वस्तू घडत होत्या. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून काय निर्माण करायचे ते आपण ठरवायचे असते. मग भट्टीत भाजली की ती पक्की होतात. मानवी जीवनाला सुद्धा या गोष्टी किती चपखल लागू पडतात, नाही ? ‘ असे विचार श्यामरावांच्या मनात येऊन गेले. श्यामलाताई मनातल्या मनात ‘ फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार ‘ हे गाणं गुणगुणत होत्या. या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वरही जणू एक कुंभारच ! तो तर किती वेगवेगळ्या प्रकारे या जगाला आकार देतो, किती वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, माणसे, प्राणी निर्माण करतो. असे विचार त्यांच्या मनात तरळून गेले.

पुढे गेल्यानंतर एका गल्लीत सुतार लोकांनी लाकडापासून केलेल्या काही वस्तू मुलांना बघायला मिळाल्या. अशा प्रकारे खेडेगावातील लोकांचे उद्योग प्रत्यक्ष कसे चालतात ते मुलांना बघायला मिळाले. मुले या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याने बेहद्द खुश होती. आता संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण निरोप घेण्याच्या तयारीत होते. श्यामराव सोपानला म्हणाले, ‘ सोपानराव, आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या. मुले पण थकली आहेत. घरी जाऊन विश्रांती घेऊ. ‘

परवानगी नाही अजिबात. आपण आता घरी जाऊ. निर्मलानं तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं असणार. तुमी आता मस्त जेवण करायचं. खूप दिवसांनी आलायसा. रातभर ऱ्हावा. रातीला मस्तपैकी गप्पा मारू. आराम करायचा अन मंग सकाळी न्याहारी करून निघायचं. त्याबिगर मी सोडणार नाही तुम्हाला. ‘ सोपानराव म्हणाले.

श्यामराव हसले. ‘ तू असा सोडणार थोडाच आहेस बाबा आम्हाला. चला रे बाळांनो, आज सोपानकाकांकडे जेवण अन मुक्काम. ‘ राजेश आणि पिंकीनं आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि सगळे सोपानरावांच्या घरी गेले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट…

रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.

“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिचे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्‍यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.    

‘एखाद्या माणसाच्या असं जाण्यानं, नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?’ तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती.आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आय टी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.आण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात रहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णांनीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..? 

वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.

आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं  तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णांना ‘थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला ‘ असा आग्रह केला होता. पण ते ‘पुन्हा पुढे बघू ‘ म्हणाले न् ते तसंच राहीलं.      

आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर  व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले.  थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं.  हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे? निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का?हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.

“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच  किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.

“सावू…तू..तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने  टिपत त्यांनी विचारले.त्यांचा थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणांत उजळला.

” मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

“पण असं अचानक?”

“हो.भेटावं असं तीव्रतेने वाटलं,आले.कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही..खूप थकलायत आण्णा.” तिचा आवाज भरून आला.  

तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता कांही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे.ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणे तिला प्रशस्त वाटेना.बस मधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “मी देशाला बांधिल आहे का? कसे?…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मी देशाला बांधिल आहे का? हा प्रश्न अंतर्मुख करणाराच आहे.  जेव्हां  मी माझं स्वतःचं जगणं तपासून पाहते तेव्हां या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच मला प्रश्न विचारते की देशासाठी मी नक्की काय करते?  काय करू शकते आणि आतापर्यंत काय केलं?

सीमेवर जाऊन हातात बंदूक घेऊन आपण देशाचे रक्षण तर करू शकत नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून जगताना निदान एक चांगली नागरिक म्हणून तरी जगले का? नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या मी काटेकोरपणे पाळल्या का?  अशा विविध प्रश्नांचं एक काहीसं अस्पष्ट पण सकारात्मक उत्तर मला नक्कीच मिळतं की आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील सलोख्याचे वातावरण निदान आपल्यामुळे बिघडणार नाही याची मी काळजी घेतली. घेत असते. 

देशाने माझ्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा मी देशासाठी काय करू शकते/ शकतो हा प्रश्न अधिक संयुक्तिक वाटतो आणि मग एका प्रातिनिधीक  स्वरूपामध्ये देश माझा मी देशाचा या संकल्पनेतून प्रत्येक भारतीयाची देशाप्रतीची बांधिलकी काय असायला हवी आणि कशी याचं एक व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं.

सर्वात प्रथम म्हणजे हा देश माझा आहे,  मी या देशात जन्मलो आहे आणि या देशाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी विश्वाच्या नकाशावर एक परिपूर्ण, स्वावलंबी, लोकशाहीची खरी तत्त्वं बाळगणारा  समृद्ध देश, म्हणून स्थान मिळावे ही भावना रुजली पाहिजे.  

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. का?  याची अनेक कारणे आहेत.  अगदी वैज्ञानिक, तांत्रिक,  डिजिटल क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती जरी केली असली तरी देशाच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचं निवारण किती परसेंट झालं आहे हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. भूकबळी, दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमजुती, जातीयवाद, धर्मभेद,  स्त्रियांचा अनादर,  त्यांची असुरक्षितता,  त्यातूनच होणारे बलात्कारासारखे गुन्हे, हुंडाबळी, केवळ मतांचे, सत्तेसाठीचे राजकारण,  बेकारी, महागाई,कायदेपालनाच्या बाबतीतली उदासीनता, अशा अनेक भयानक भुजंग विळख्यात आजही आपला देश आवळलेला आहे.  उंच आकाशातली  एखादी भरारी आपण नवलाईने पाहतो त्याचवेळी आपल्या जमिनीवरच्या पायांना चावे घेणार्‍या विंचवांचे काय करायचे?  हा विचार मनात नको का यायला?

ज्यावेळी आपण आपल्या देशाच्या बांधिलकीबद्दल भाष्य करतो तेव्हा जमिनीवरच्या समस्यांचे निराकरण प्रथम झाले पाहिजे असे मला वाटते.  इतर विकसित देशांशी तुलना करताना त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही.  शासनाचे नियम ते पाळतात.  नियम मोडणाऱ्याला— मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा ही होतेच.  स्थानिक प्रशासनाने नियमांची जी चौकट घातली आहे, ते बंधन न मानता कर्तव्य मानून त्याचे पालन केले जाते. आपल्याकडे मात्र येथे शांतता राखा असे लिहिले असेल तेथे हमखास कलकलाट असतो.  येथे थुंकू नका—नेमके तिथेच पिचकार्‍यांची विचकट रांगोळी दिसते.  नो पार्किंग पाटीच्या ठिकाणीच वेड्यावाकड्या गाड्या लावलेल्या दिसतात.  कृपया रांगेची शिस्त पाळा या ठिकाणीच माणसांची झुंबड उडालेली दिसते.  स्वच्छता राखा तिथेच कचऱ्याचा डोंगर असतो.  यातून एकच मानसिकता झिरपते की नियम हे मोडण्यासाठीच असतात जणूं . तेव्हा भारतीय घटनेने  दिलेले अधिकार, स्वातंत्र्य आणि सुजाण नागरिक म्हणून जगतानाची कर्तव्ये या सगळ्यांचे संतुलन, एक जबाबदार नागरिक म्हणून ठेवणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.  गरज फक्त कडक कायद्यांची नव्हे तर गरज सदसद्विवेक बुद्धीची आहे.  कायदा व सुव्यवस्था राखणे ही जरी पोलिसांची जबाबदारी असली तरी नागरिक म्हणून जगताना आपणही पोलिसांचे कान आणि डोळे बनले पाहिजे. 

पर्यावरणाचा विचार करणे, सार्वजनिक स्वच्छतेची काळजी करणे, अन्नाची नासाडी न करणे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ग्रामीण भागातील जनता, कष्टकरी बळीराजा, त्यांच्या समस्या जाणून, तळागाळातील लोकांशी संवाद साधून, एकसंध समाजाची वज्रमूठ— साखळी बांधणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हीच देशभक्ती आहे.  देशा प्रतीची आपली बांधिलकी आहे.

निसर्गाचं वावर कसं मुक्त मोकळं असतं !  त्यात पेरलेलं, उगवलेलं यावर जसा किडे, मुंग्या, कीटक, पक्षी यांचाही अधिकार असतो तसंच आपण कमावलेलं फक्त आपलंच नसतं.  त्यातलं काही समाजाचं देणं म्हणून बाजूला ठेवावं लागतं, ही भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.  मी, माझे कुटुंब, माझा समाज आणि माझा देश या स्तरांवर आपलं शांततापूर्ण जीवन अवलंबून असतं.

रस्त्यांवरचे अपघात, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भूकंप, वादळे,  अवकाळी पाऊस, पिकांची नासाडी,  शेतकऱ्यांची आत्महत्या, दहशतवाद, राजकीय आयाराम गयारामांच्या बातम्या आपण मीडियावर ऐकतो, पाहतो. आणि हळूहळू अलिप्त होतो कारण आपली वैयक्तिक गुंतवणूक त्यात नसते.  कधी रंजकता, कधी  बेचैनी अस्वस्थता जाणवते पण ते अल्पकालीन असते.  सजगपणा, डोळसपणा आणि त्या विरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता असणे म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी ठरते.  कोणीतरी करेल पेक्षा मी का नाही? ही मानसिकता तयार झाली पाहिजे. मी माझ्या देश बांधवांसाठी, उपेक्षित, वंचित घटकांसाठी काय करू शकतो /शकते हे माणुसकीचं भान जपणं म्हणजेच देशाविषयीची बांधिलकी जपणे आहे. 

देशासाठी जगतानाच्या अनेक व्याख्या आता बदलत चालल्या आहेत.  पूर्वी शाळेत तास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना होत असे. शाळा सुटताना वंदे मातरम म्हटले जायचे. यातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती, मोठ्या लोकांचा आदर याची शिकवण असायची.  या गोष्टी आता लुप्त होत चालल्यात असं जरी नसलं तरी त्यातली भावनिक, राष्ट्रीय गुंतवणूक जाणवत नाही.  १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय दिन असण्यापेक्षा सुट्टी साजरी करण्याचे, आनंदाचे, मजेचे दिवस ठरत आहेत याचं वाईट वाटतं.  देशाचा इतिहास समजून घेणे,  हुतात्म्यांचे बलिदान स्मरणं आणि त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शपथ पूर्वक आपला देश प्रगतीपथावर कसा जाईल याचं धोरण  मनाशी आखणं ही देशाशी आपली बांधिलकी आहे.

या देशात आपण राहतो तिथे फक्त स्वतःपुरता विचार करून जगण्यापेक्षा मी केलेलं कोणतही काम या देशाचं अखंडत्व भंग करणारं नसेल याचं भान जपणं म्हणजेच देशाशी बांधील राहणं  ठरेल.

एक आठ नऊ वर्षाची भारतीय मुलगी दहा-बारा राष्ट्राच्या पंतप्रधानांना आमच्या पिढीसाठी पाणी आणि प्राणवायू ठेवा अशा मजकुराची पत्र पाठवते तेव्हा जाणवतं की  उगवत्या पिढीवर सामाजिक संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीने पेलणे म्हणजेच देशाशी बांधिलकी जपणे आहे.

मला हा लेख का लिहावासा वाटला?” याचे उत्तर हे असू शकतं की देशाशी बांधिल राहताना मी देशासाठी काय करू शकते याची पुनश्च उजळणी व्हावी म्हणूनच …

🇮🇳 ।। वंदे मातरम् ।। 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-2 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 2 ☆ श्री संदीप काळे ☆

(आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’) – इथून पुढे. 

आपल्या कुटुंबाच्या आठवणी सांगत लक्ष्मण यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बाजूला बसलेली त्यांची दोन्ही मुले ही वाघासारख्या बापाला रडताना पाहून भावुक झाले होते. स्वतःला सावरत लक्ष्मण म्हणाले, ‘‘आम्हाला शिक्षा झाली, आम्ही जेलमध्ये आलो. तेव्हा आम्ही बदला घेण्याची भाषा करत होतो. जसजसे दिवस जायला लागले, तसतसे कळायला लागले की कुणाचा बदला घ्यायचा, कशासाठी, ही आपलीच माणसे. आपण लहान होऊ, मोठ्या मनाने पुढे जाऊ. 

हे सारे बळ इथल्या वातावरणाने दिले. आम्ही इथे नामस्मरणाला लागलो. ध्यान करतो, योगा करतो, ग्रंथ वाचतो, यातूनच माणसाकडे पाहण्याची नजर मिळाली.’’ गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर अष्टगंध, अबीर-बुक्का, डोक्यावर टोपी आणि सतत चांगले बोलणे अशी लक्ष्मण यांची भावमुद्रा होती. बाप तशी मुलेही.

आमच्या बाजूला असलेले संतोष शेळके, अजय गव्हाणे, प्रमोद कांबळे हे तिघेजण विनयभंगाच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते. काय तर त्यांनी एका महिलेकडे पाहिले म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली. 

सोबत जे दोन पोलिस होते त्यामधले एकजण सांगत होते, विनयभंग आणि पोक्सो या दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 

आम्ही जेलमध्ये फेरफटका मारत कैद्यांशी बोलत होतो. एक जण ज्ञानेश्वरी वाचत बसले होते. आम्ही जाताच त्यांनी त्यांचे वाचन थांबवले. मला दोन्ही हात जोडत नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘बोला माऊली, काय म्हणताय.’’ आम्ही बसलो आणि एकमेकांशी बोलत होतो.   

माझ्यासोबतचे पोलिस सहकारी जांभया देत होते. ते ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणाले, ‘‘काय माऊली, भूक लागली की काय?’’ 

ते पोलिस म्हणाले, ‘‘होय, आता जेवणाची वेळ झाली आहे ना?’’ 

जे ज्ञानेश्वरी वाचत होते. त्यांचे नाव सचिन सावंत. सचिन बीडचे, त्यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी, तिन्ही मुलींना, पत्नीला खल्लास केले. स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात ते वाचले. मुलीच्या रूपाने असलेला वंशाचा दिवा तर विझलाच होता, पण आता सचिन यांना म्हातारपणात कोणी पाणी पाजायलाही शिल्लक उरले नव्हते. बीडमधले ते सोन्यासारखे वातावरण ते जेलपर्यंतचा सचिनचा सगळा प्रवास ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते.

बोलता बोलता सचिन म्हणाले, ‘‘मी तुकाराम महाराज तेव्हाच वाचले असते, तर असा राग केला नसता.’’ सचिन आपल्या तिन्ही मुलींनी लावलेली माया, त्यांची आठवण करून हुंदके देत रडत होते.

अहंकाराला घेऊन तुकाराम महाराज काय सांगून गेले हे सचिन आम्हाला अभंगांच्या माध्यमातून सांगत होते. आता रडायचे कुणासाठी, कुणाला माया लावायची. जेलमधून बाहेर जायचे तर कुणासाठी जायचे हा प्रश्न सचिन यांच्यासमोर होता.

कोणालाही भेटा, कोणाशीही बोला, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी होती. त्या कहाणीला दोन कंगोरे होते. एक म्हणजे, मला विनाकारण आतमध्ये टाकले. माझा दोष नसताना, माझे नाव केसमध्ये घेतले. दुसरे, होय मी गुन्हा केला, पण त्यावेळी तो गुन्हा रागातून आणि द्वेषातून झाला, आता मी सुधारलोय, असे सांगणारे अनेक कैदी होते. 

आम्ही बोलत होतो, तितक्यात ‘नमस्कार साहेब, नमस्कार साहेब’ असा आवाज आला. मी मागे वळून पाहतो तर काय, जाधव आमच्या दिशेने येत होते. अनेक जेलमध्ये जाधव यांनी अधिकारी म्हणून आपल्या सामाजिक कामाची छाप पाडलीय. 

आम्ही जाधव यांच्या कार्यालयाकडे निघालो. जाताना मी जाधव यांना म्हणालो, ‘‘किती गंभीर आहे हे सर्व.’’ 

जाधव म्हणाले, ‘‘तुम्हाला सर्वांनी तसे फार वरवरचे सांगितले असेल, पण परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. रागाच्या भरात आणि द्वेषातून ही माणसे इथे आलेली आहेत. आपल्या राज्यामध्ये ५४ पेक्षा अधिक कारागृह आहेत. या कारागृहामध्ये ३२ हजारांहून अधिक कैदी आहेत. त्या प्रत्येकाची कहाणी अशीच आहे, इतकीच बिकट आहे.’’

आम्हाला सोडायला आलेले सचिन आकाशाकडे पाहत हात जोडून म्हणाले, ‘‘ही माणसे एक निमित्त आहेत. करणारा करता धरता तो वर बसला आहे.’’

कुणी आईला घेऊन भावनिक होते, तर कुणी बहिणी, मुलांना घेऊन. अनेकांनी आपल्या झालेल्या बाळाचे तोंडही पाहिले नव्हते. जाधव यांच्यासाठी हे नवीन नव्हते. माझ्यासाठी नक्कीच हे नवीन होते. 

मी जाधव यांच्यासमवेत अगदी जड पावलांनी त्यांच्या कार्यालयाकडे निघालो. मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, हे सर्व थांबणार कधी?’’

जाधव म्हणाले, ‘‘जोपर्यंत चंद्र, तारे, सूर्य आहे तोपर्यंत हे असेच राहणार आहे. फक्त यामध्ये प्रमाण कमी होऊ शकते. जर संस्कार चांगले असतील तर.”

मी जाधव यांना म्हणालो, “ज्यांचा दोष नाहीये, ते या जेलमध्ये आहेत, अनेक जणांनी पैसे भरले नाहीत, कागदपत्रे पूर्ण नाहीत म्हणून जेलमध्ये आहेत, त्यांना कोणी वाली नाही का?”

जाधव अगदी शांतपणे म्हणाले, ‘‘शासन, सामाजिक संस्था या लोकांना पाहिजे तशी मदत करतात, पण सगळ्यांपर्यंत ही मदत जाऊ शकत नाही. त्याला बराच अवधी लागेल.’’ 

मीही त्यांना प्रतिसादाची मान हलवली. मी तिथून निघालो, जेलमधल्या त्या सगळ्या घडलेल्या कहाण्या, त्या सर्व कैद्यांचे सुकलेले डोळे पाहून मीही अगदी उदास झालो होतो. काय बोलावे, कोणासमोर बोलावे आणि कशासाठी बोलावे हे प्रश्न माझे मलाच पडले होते. 

छोट्या छोट्या वादामध्ये माणसांच्या आयुष्याचा सत्यानाश कसा होतो याची अनेक उदाहरणे मी अनुभवून आलो होतो. जेव्हा एखाद्याच्या हातून चूक घडते, तेव्हा आपले कोणीही नसते. जेव्हा कुणाला मदतीची गरज लागते तेव्हा त्याला कोणीही मदत करत नाही. चूक झाल्यावर मोठ्या मनाने माफ करायलाही कोणी पुढे पुढाकार घेत नाही. अशा परिस्थितीत जगणारी माणसे जिवंत आहेत का मेलेली हेच कळत नाही. मागच्या जन्मीचे पाप, नशिबाचे भोग, आई-वडिलांनी केलेले पाप, अशा कितीतरी वेगवेगळ्या शब्दांनी या कैद्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेतले. काय माहित या कैद्यांच्या अंधाऱ्या आयुष्यामध्ये कधी प्रकाशाचे किरण दिसणार आहे की नाही?

– समाप्त – 

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य” 🇮🇳 ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “स्वातंत्र्य दिनाचे चिंतन… प्रतिज्ञा व सत्य… 🇮🇳” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

भारत माझा देश आहे

.. पण माझ्या देशात भारत आहे का ?

 

सारे भारतीय माझे बांधव आहेत

.. माझे सारे बांधव भारतीय आहेत का ?

 

माझ्या देशावर माझे प्रेम आहे।

.. माझ्या प्रेमाच्या यादीत देश कुठे आहे ?

 

माझ्या देशातल्या समृद्ध आणि .. विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।

,, देशाची समृद्धी कोणत्या चॅनलवर दाखवतात ?

.. परंपरांचा अपमान पदोपदी दिसतोच परंतू

.. अभिमानास्पद परंपरांची माहिती कुणाला आहे?

 

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।

.. पाईक होणे सोडा पण परंपरा झुगारण्यातच धन्यता मानणारी माणसेच हार घालून मिरवतात

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन

.. पालक, गुरुजन व वडिलधा-यांचा अपमान होणार नाही येवढेतरी घडते असे दिसते का ?

 

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।

.. सामान्य माणसाशी सौजन्याने कोण वागते हो ?

 

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।

.. निष्ठा या शब्दाच्या ख-या अर्थाशी किती जणांचा संबंध येतो ?

 

 त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।

.. स्वत: व्यतिरिक्त कुणाचे कल्याण अथवा समृद्धी वा सौख्य यांचा विचार करणारे किती हो ?

बोले तैसा न चाले त्याची

सध्या वंदितो आम्ही पाऊले.

कराल विचार निदान आज ?

बनवायचा भारत महान ?

…. “१५ ऑगस्ट” – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ छापा की काटा…? ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

दोघांचीही निवृत्ती झाली होती,

साठी कधीच ओलांडली होती,

अजूनही परिस्थिती ठीक होती, 

हातात हात घालून ती चालत होती —

 

तो राजा ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती —-

 

अचानक त्याची तब्बेत बिघडते,

मग मात्र पंचायत होते,

तिची खूपच धावपळ होते,

पण कशीबशी ती पार पडते,—-

 

आता तो सावध होतो,

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,

वारसाची पुन्हा खात्री करतो,

मृत्यूपत्राची तयारी करतो —- 

           

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,

पासबुक तिच्या हातात ठेवतो,

डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,

तिलाच पैसे काढायला लावतो, —-           

 

पुन्हा तिला सोबत घेतो,

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो, 

तिलाच रांगेत उभं करतो,

बिल भरायचं समजाऊन सांगतो,—- 

 

अचानक तिला सरप्राईज देतो,

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो,

वाय-फाय नेटची गंमत सांगतो,

ऑन लाईन बॅकींग समजाऊन देतो,—-

 

तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,

नवा सोबती जोडून देतो

बाहेरच्या जगात ती वावरू लागते,

प्रत्येक व्यवहार पाहू लागते,—- 

 

कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो,

निश्चिंत होत तो हळूच हसतो,     

बदल त्याच्यातला ती पहात असते,

मनातलं त्याच्या ओळखतं असते,—-

 

थोडं थोडं समजतं असते,

काळजी त्याचीच करत राहते,

एक दिवस वेगळेचं घडते,

ती थोडी गंमत करते,—-

 

आजारपणाचा बहाणा करते,

अंथरूणाला खिळून राहते,

भल्या पहाटे ती चहा मागते,

अन् किचनमध्ये धांदल उडते,—-

 

चहात साखर कमी पडते,

तरीही त्याचे ती कौतुक करते,

नाष्ट्यासाठी उपमा होतो,

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,—-

 

दिवसा मागून दिवस जातो,

अन् किचनमधला तो मास्टर होतो,

कोणीतरी आधी जाणार असतं,

कोणीतरी मागं रहाणार असतं,—-

 

पण …… 

पण मागच्याचं आता अडणार नसतं,

अन् काळजीच कारण उरणार नसतं,

सह-जीवनाचं नाणं उडत असतं,

जमीनीवर ते पडणार असतं,

 

आधी काटा बसतो की छापा दिसतो,

प्रश्न एकच छळत असतो……. 

                             प्रश्न एकच छळत असतो……. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निरागस सप्तपदी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– निरागस सप्तपदी…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

[विवाहबद्ध होणारे भारतातील पहिले गतिमंद जोडपे अनन्या आणि विघ्नेश यांना सादर प्रणाम !!!]

शहाण्यांच्या जगात,

वेडा हा आपला संसार !

कसेही असोत आपण,

एकमेकांचा होऊ आधार !

आपल्या नशीबात

बाकी सारं उणं आहे !

निरागसपणा पत्रिकेत

जमलेला  गुण आहे !

जगाच्या चष्म्यातून आपली,

गती-मती  थोडी मंद आहे !

आपल्याच विश्वात रमण्याचा

आपल्याला निखळ आनंद आहे !

भातुकलीच्या भाबड्या खेळातील

तीच निरागसता आपल्यात आहे !

तूच  माझा राजा- मीच तुझी राणी,

जीवनाची जोडी जमल्यात आहे !

सकारात्मक आयुष्य काय असते,

वेड्या जगाला कळू दे !

तुझा माझा हा मांडलेला संसार,

सुखाच्या प्रकाशात उजळू दे !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 151 – गीत – समय सर्प सा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत – समय सर्प सा…।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 151 – गीत – समय सर्प सा…  ✍

कोलाहल की गर्म शलाका, प्रतिपल दाग रही है मन को।

अविरल आवाजाही लेकिन

गलत मार्ग पर हर यात्री है

दृष्टि, दिशा के पाँव पकड़ती

दिशा कि वह तो कर पात्री है।

अश्रुसिक्त आँखों का अंकुश, साधन पाता नील गगन को।

 

हरी दूब के होंठ कुचल कर

अंगारों ने हाथ धो लिये

धीरज का भावार्थ विवशता

सुमन शूल के साथ हो लिये

आराधक की विवश चेतना, पूज रही है वृंदावन को।

 

समय सर्प सा सरक रहा है

अब तो प्राण प्रणों से ऊबे

हर अभाव हठ योग कर रहा

संशय में डूबे मनसूबे

जाने कौन कुतर जाता है, अनुशासन की रामायण को।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 151 – “बस वहीं पर थमा ठहरा…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  बस वहीं पर थमा ठहरा…)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 151 ☆।। अभिनव गीत ।। ☆
☆ “बस वहीं पर थमा ठहरा…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

जिस तरह से मौन का

सम्वाद हो जाना

उस तरह संकोच का

अनुवाद हो जाना

 

जहाँ ठहरी दृष्टियाँ

हैं जो हजारों की

सहमती अगडाइयाँ

भारी उभारों की

 

थकन से बोझिल

उबासी लिये आँखों

जिस तरह से नींद का

चुपचाप सो जाना

 

जहाँ कोहरे से ढँकी

मधु- चंद्रिका है

जहाँ तंद्रिल राग की

इक मुद्रिका है

 

जहाँ थमते ज्वार का

चिन्तन अनंतिम

वहाँ पारे का लुढ़क कर

आप बह जाना

 

जहाँ मर्यादा सलज

सम्मान के संग

घोलती शुभदा वहाँ

रोमांस का रंग

 

बस वहीं पर थमा ठहरा

चन्द्रमा चुप-

चाहता है स्वयम् का यों

सुबह हो जाना

©  श्री राघवेन्द्र तिवारी

28-07-2023 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकाक्षी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – एकाक्षी ??

एकाक्षी होना चाहता हूँ,

आवश्यक नहीं

एक आँख बंद कर लूँ,

वांछित है; दोनों में

समत्व विकसित कर लूँ!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares