मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पावसाची कविता”… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “पावसाची कविता”… ☆ सौ राधिका भांडारकर 

(शुभं करोती  साहित्य परिवार – २ जुलै २०२३)

असा झिम्माड पाऊस

येतो घेऊन वादळ

भेट पहिली आपली

भरे स्मृतींची ओंजळ ..

 

तुला थेंबांची शपथ

नको  विसरूस मला

धाड निरोप सरींना

सखा पाऊस आपला..

 

 पावसाचे थेंब वेडे

मखमली देहावर

 बरसले मुक्तपणे

झाले मन अनावर..

 

 पावसाच्या आठवणी

 कितीतरी मनातल्या

 जेव्हां गळली पागोळ्या

वाट पहात थांबल्या..

 

 असा झिम्माड पाऊस

वय मागे मागे जाते

मन हिरवे होऊन

पुन्हां प्रेम गाणे गाते

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #197 ☆ ‘खिन्न रोपटे…’ ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 197 ?

☆ खिन्न रोपटे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तुला वाटले तसेच माझ्या मनात होते

दोघांचेही गाणे अपुले सुरात होते

किती दिवस मी खिन्न रोपटे पहात होतो 

वसंत येतो अन् आंदोलन फुलात होते

भरून दुथडी वहात होते डोळे माझे

वाहुन गेले सारे मोती पुरात होते

डोळ्यांमधल्या पावसासही चिंता आहे

त्याचे डोळे पाणी शोधत ढगात होते

संस्काराची ऐसी तैसी केली त्याने

भ्रष्ट वागला भोग वाढले पुढ्यात होते

लाठ्या काठ्या घेउन सारे जसे धावलो

नाग विषारी बसले जाउन बिळात होते

यश कीर्तिच्या शिखरावरती मजेत तारे

चंद्रासोबत जीवन माझे सुखात होते

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “केवळ माझा सह्यकडा…” ☆ कांचन कुलकर्णी ☆

? विविधा ?

☆ “केवळ माझा सह्यकडा…” ☆ कांचन कुलकर्णी ☆

अर्धवट झोपेत जाणवले की गाडी थांबली आहे. रात्री ११ वाजता नाशिक फाट्याला गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरने दोन तीन वेळा चहापाण्यासाठी गाडी थांबवली होती. तशीच थांबली असेल असे वाटले. खिडकीतून बाहेर नजर टाकली अन दिसला एक डोंगर आणि वरपर्यंत गेलेली दिव्यांची रांग. पहाटेचे चार वाजत होते. शेजारी झोपेत असलेल्या मिनीला उठवलं आणि सांगितलं, “मिने, आलं कळसूबाई”. कळसूबाईच्या पायथ्याशी असणारं नगर जिल्ह्यातलं अकोला तालुक्यातलं बारी नावाचं गाव होतं ते. तिथून २०-२५ मिनिटं थोड्या चढाच्या रस्त्याने चालत निघालो.

मागे घर पुढे मोकळी जागा अशा बर्‍याच गडांवर टिपिकल रूपात दिसणार्‍या एका हाॅटेलमध्ये गेलो, हाॅटेल सह्याद्री त्याचं नाव. तिथे पोहे चहा घेऊन अंधारातच साडे तीनला चालायला सुरवात केली. पायथ्यापासून दिसणारी डोंगरावरची दिव्यांची रांग पाहून असं वाटलं होतं की तेवढंच चढायचं आहे, पण नंतर लक्षात आलं की तो पूर्ण डोंगराचा अगदी छोटासा टप्पा आहे. ओबडधोबड पायर्‍या होत्या, काहीची उंची फुटापेक्षा जास्त होती. बारीक बारीक दगडगोट्यांवरून पाय घसरत होते. मी तीन चार वेळा सह्याद्रीला लोटांगण घातलं. अफाट दम लागत होता. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. पण महाराष्ट्राच्या सर्वोच्य ठिकाणी पोहचायचे आहे या जिद्दीने फक्त एकएक पावलावर लक्ष देऊन मार्गक्रमणा चालू होती. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंच असलेल्या कळसूबाई शिखराचं वैशिष्ठ म्हणजे अगदी टोकाला पोहचल्याशिवाय खालून कुठूनही तिथला पिकपाॅईंट, कळसूबाईचं मंदिर दिसत नाही. आता बर्‍याच ठिकाणी रेलिंग बसवली आहेत. एकुण चार ठिकाणी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. त्यामुळे चढाई बरीच सोपी झाली आहे. पण इतक्या उंचीवर देवळाचे बांधकाम कसे केले असेल, पूर्वी लोकं देवीच्या दर्शनाला कशी जात असतील याचं आश्चर्य वाटतं.डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या गावात शुभकार्याची सुरवात देवीच्या दर्शनाने होते. त्यामुळे स्थानिक लोकांची तिथे बर्‍यापैकी ये जा असते. चालत असताना वर एक टप्पा दिसायचा आणि वाटायचे की तिथेपर्यंत पोहोचलो की झाले. पण तिथे पोहोचलो की कळायचे की अजून वर चढायचे आहे. असे भ्रमनिरास दूर करत एकएक टप्पा पूर्ण करत शेवटी त्या सर्वोच्य ठिकाणावर पोहोचलो. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी मनातल्या मनात गाऊ लागले “आज मैं उपर,महाराष्ट्र नीचे”. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहचल्याचा आनंद, तिथून चारी बाजूने खाली दिसणारे विहंगम दृष्य याचे वर्णन मला पामराला अशक्यच आहे. थोड्यावेळाने खाली उतरायला सुरुवात केली. चढण्यापेक्षाही उतरणे अवघड असणार याची कल्पना होती,  आणि तसेच झाले.काही ठिकाणी तर बसून उतरावे लागले. उन्हाचे चटके बसत होते. लोखंडी शिड्या व रेलिंग  तापले होते, पण त्यांचे चटके सहन करणे अनिवार्य होते. माझा थकला भागला जीव शेवटी हाॅटेल सह्याद्री पर्यंत पोहोचला. तांदळाची भाकरी, पिठंल, वांग बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वरण भात असा फक्कड बेत होता. जेवण खरंच चवदार होते. त्या हाॅटेलचे मालक तानाजी खाडे दादांनी कळसूबाई देवीची माहिती सांगितली. छानच बोलले ते. तृप्त मनाने, अभिमानाने परतीचा प्रवास सुरू झाला. आॅगस्ट महिन्यात परत तुला भेटायला रायगडावर येईन असे सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन वचन दिले. परतीचा प्रवास जोरदार अंताक्षरीने अगदी मजेचा झाला.गंमत म्हणजे ११ जून म्हणजे किरण ईशानच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात आल्यापासून मी इथे आहे तर तुम्ही दोघे ११ जूनला कुठेतरी बाहेर जा असे मी म्हणत होते, पण झाले उलटेच. अचानक ध्यानीमनी नसताना माझेच ट्रेकला जायचे ठरले. अर्थात याचे श्रेय नक्की मिनीचेच. ११ जूनला श्रीराम ट्रेकर्स या ग्रुपतर्फे केलेला हा ट्रेक म्हणजे किरण ईशानला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी मी दिलेली गिफ्ट आहे असे मला वाटते.

“भव्य हिमालय तुमचा आमचा,केवळ माझा सह्यकडा”

© कांचन कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘बासरी…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

( मागील भागात आपण पहिले – बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचा पण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या. आता इथून पुढे)

‘‘कांबळी, सातवीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता त्याचा दाखला कोणी नेला काय?’’‘‘हो बाई, कृष्णाचा बाबा आला होता स्वतः’’

‘‘कुठल्या शाळेत कृष्णाचे नाव घालणार, काही म्हणत होते ?’’

‘‘नाही, निश्चित सांगितले नाही. पण कराडच्या बाजूला त्यांच गाव आहे लहानस, तेथे तो शाळेत जाईल असं ते म्हणत होते.’’

‘‘हो का ? अहो मी नेमकी पुण्याला गेलेली दिड महिना पुण्यात होते. अविचे बाबा तिकडे असतात ना, बर मग येते मग, त्याच्याबद्दल काही कळलं, पत्र वगैरे काही आलं तर कळवा मला.’’

‘‘हो बाई’’ 

बाईंना कृष्णा नेमका कुठे गेला काही कळेना. त्यांनी नारायण मंदिराकडील शाखेच्या दादाकडे चौकशी केली. त्याला पण काहीच माहित नव्हत. कृष्णा त्यालापण न सांगता गेला होता.

मालवणात जोरदार पाऊस सुरु झाला आणि शाळा सुरु झाल्या. बापट बाई अविसमवेत शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरु होण्यापूर्वी त्या अविसाठी नाश्ता आणत तशा अजून एक कृष्णासाठीपण. मग त्यांच्या लक्षात यायचं कृष्णा नाही येणार आता. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहत जायची सवय. उजव्या बाजूला अवि असायचा डाव्या बाजूला कृष्णा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नसायचं. फोकांड्याच्या पिंपळाकडे त्यांच लक्ष जायचं. येथेच तो बासरीवाला बासर्‍या विकायला आलेला आणि कृष्णाची नजर बासरीवर पडलेली. त्या आठवीच्या वर्गात जायच्या तेव्हा पुढील दुसर्‍या बेंचवर त्यांच लक्ष जायचं. तिथे दुसराच मुलगा बसलेला असायचा.

कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल म्हणून बाई वाट पाहत असायच्या. पण कृष्णाचं कार्ड, पाकिट काही आलचं नाही. बाईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. मधुमेह कमी अधिक होणे, ब्लडप्रेशर सतत वर, चिडचीड सुरु झाली. शेवटी अविच्या बाबांनी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि दिवाळीच्या सुमारास बापट बाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अवि आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमधून तपासणी करुन बाईंना थोड बरं वाटलं. आता बापट बाई सकाळीची योगासनं, हास्यक्लब, चालणं, दुपारचा आराम, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याचा कार्यक्रम, महिला मंडळ यात रमू लागल्या.

वीस वर्षानंतर…. 

अविचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. अविने अमेरिकेत एम.एस. केलं आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा तो भारतात येतो. बापट बाई त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या पण तो हसण्यावरी नेतो. बापट बाईंची तब्येत मात्र फारशी चांगली नाही. तरुणपणी मधुमेह जडल्याने त्या एवढ्यात थकल्या. ब्लड प्रेशर सतत वर खाली होण, धाप लागणं, झोप न लागणं अशा सतत तक्रारी सुरु झाल्या. दिवसाला १५-१६ गोळ्या, श्वासासाठी इनहेलर सुरु होतं. त्यात त्यांना नैराश्याने पकडलं होतं. कशातही लक्ष लागत नव्हतं. अधून मधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत. आयुष्यात मनापासून रमेल ते मालवणातच असे त्यांना वाटे. असच एका संध्याकाळी बापट आणि बापट बाई बागेत फेर्‍या मारत होते. फेर्‍या मारता मारता बापट बाई खाली बसल्या आणि धापा घालू लागल्या. बापट बाईंना उठताच येईना. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घातले आणि हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरनी एन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जीओग्राफी नंतर लक्षात आले हृदयात नव्वद टक्के ब्लॉकेजीस आहेत त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.

बापट काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत पण बापटांची बहिण पुण्यातच होती. भाचा भाची म्हणाले – मामा घाबरु नको. आम्ही येथेच आहोत, ऑपरेशन करुन घेऊया. हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सर्व तयारी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरना बाईंचे सर्व रिपोर्ट पाठवले गेले. एन्जीओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरनी ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली.

पंधरा ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला. सकाळी सात वाजता ऑपरेशन सुरु होणार होते. आदल्या दिवशी पुन्हा एकदा बापट बाईंची सर्व तपासणी करुन रिपोर्ट ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरना पाठविले गेले. सकाळी सहा वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आल्या आल्या डॉ. रानडे यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या बॅगमधून डॉक्टरनी एक लहानसा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉ. रानडेंना माहित होते की, हे डॉक्टर जेव्हा जेव्हा ऑपरेशन करायला येतात तेव्हा हा फोटो नेहमी काढून टेबलावर ठेवतात, त्याला नमस्कार करता आणि मगच ऑपरेशन सुरु करतात.

सर्व तयारी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर, डॉ. रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरु करण्याआधी डॉक्टरनी सहज बेशुध्द पेशन्टच्या चेहर्‍याकडे पाहिले आणि ते दचकले. त्यांनी पेशंटच्या रिपोर्टवरचे नाव पाहिले. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव भराभर बदलत गेले. डॉक्टरनी एक मिनिट डोळे मिटले. कसलेचे ध्यान केले आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉ. रानडे सोबत होत्याच. त्यांनी पाहिले आज या डॉक्टरांचे हात थरथरत आहेत. डॉ. रानडेंनी या डॉक्टरांच्या हाताला हळूच टोचले. सावध केले. डॉ. रानडे विचार करायला लागल्या नेहमी सफाईने ऑपरेशनची सुरुवात करणारे हे डॉक्टर आज असे नर्व्हस का झाले ? पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सफाईदार ऑपरेशन केले.

सुमारे पाच तासानंतर सर्व ऑपरेशन मनासारखे झाले. आणि अत्यंत समाधानाने सर्व डॉक्टर्स बाहेर आले. डॉ. रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरनी छोटा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉ. रानडे पाहत होत्या. हे डॉक्टर स्वतः पेशन्टच्या नातेवाईकांना कधी भेटत नाहीत पण आज कसे काय? याचे आश्चर्य वाटत असताना डॉक्टर बापट काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर थोपटत थोपटत ऑपरेशन छान झाले कसलीच काळजी करु नका, पंधरा दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असे सांगून त्यांची काळजी कमी केली.

आय.सी.यु.मधील उत्तम उपचार, फिजीओ उपचार, औषधे यांनी बापट बाईंना बरं वाटायला लागलं. आठ दिवसांनी आय.सी.यु. मधून बाहेर काढून त्यांना स्पेशल रुममध्ये घेतले. आता स्वतः बापट किंवा बापटांची बहिण, भाचरे सर्वजण बाईंना भेटू लागले. अमेरिकेहून अविचा रोज व्हिडीओ कॉल येत होता. ऑपरेशनला जवळ जवळ पंधरा दिवस झाले आणि बापट बाईंची तब्येत व्यवस्थित दिसू लागली. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. श्वासोश्वास व्यवस्थित चालू झाला. शुगर कंट्रोलमध्ये आली. ब्लडप्रेशर नॉर्मल झाले. बापट बाईंनी थोडा थोडा चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि शेवटी बापट बाईंच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. सोमवार ८ सप्टेंबर रोजी बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला.

बासरी क्रमश: ४

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.  पण फारच थोड्या व्यक्तींना माहीत असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले ८८५ वर्षे जतन करून ठेवलेले आहे. 

जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते…. परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते.  

श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील “श्रीरंगनाथस्वामी मंदिर”, ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ – ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८८५ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या “श्री रामानुज मंदिराच्या” दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले… सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात.  या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही.  वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्तसारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे आपण अजूनही आत बघू शकता.

संदर्भ :  मिलिंद चिंचोळकर यांचा चेपू भिंतीवरील लेख. 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पसारा आवरू या…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “पसारा आवरू या…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्‍याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्‍याच गोष्टी.

कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.

सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?

आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…

आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.

माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.

 पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.

ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.

खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.

एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.

पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.

गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.

एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.

जी बाई जाईपर्यंत  त्यांची सेवा सुश्रुषा  करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.

साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.

देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.

नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.

तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.

चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.

असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.

खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.

घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.

पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.

 कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला  आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.

पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.

असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.

एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.

पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.

रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.

दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.

खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …

पण मन ऐकत नाही..

ये मोह मोह के धागे…….

मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.

निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.

पण आम्ही नाही शिकत .

थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.

जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दीप अमावस्या…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?दीप अमावस्या– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

दीप अमावस्या ! दिव्यांचे पूजन !

करती सुजन ! आवडीने !!१!!

तिमीराचे भय ! दूर सारूनिया !

मार्ग धरूनिया !  प्रकाशाचा !!२!!

शंकर पार्वती! आणि कार्तिकेय !

आज पूजनीय ! भक्तीभावे !!३!!

लहान मुलांचे ! करावे औक्षण!

वंशदीप गण ! कुटुंबाचे !!४!!

आषाढ सांगता ! अधिक  श्रावण !

शुद्ध आचरण ! हिंदूधर्म  !!५!!

मत्स्य मास  वर्ज  ! सात्विक आहार !

करावा स्विकार ! अरोग्यास !!६!!

अग्नीप्रती करे ! कृतज्ञता व्यक्त!

तेजोमय भक्त ! बिब्बा म्हणे !!७!!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निसर्गरुपे : पहाट… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ निसर्गरुपे : पहाट…  ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 

‘प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती… ‘ ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ‘ पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ‘ असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्यावर शिंपडले जाते. मरगळलेल्या मनाला हे अमृतस्वर संजीवनी देऊन ताजेतवाने करतात. या भूपाळीमध्ये अप्रतिम असे निसर्गाचे वर्णन आले आहे. 

सकाळी आपण जशी परमेश्वराची पूजा करतो, तशीच पूजा निसर्गही पहाटेच्या रूपाने त्या परमात्म्याची बांधत असतो. त्याच्या पूजेसाठी विविध रंगांची, गंधांची फुले निसर्ग तयार ठेवतो. नदीचं, झऱ्याचं खळाळणारं संगीत असतं, वाऱ्याची बासरी आसमंतात लहरत असते, पक्ष्यांचं कूजन म्हणजे जणू मंत्रघोष ! अशी सगळी स्वागताला तयार असतात. त्यातच पूर्वेचं आकाश स्वागतासाठी गुलाबी वस्त्र परिधान करून तयार असतं. अशाच वेळी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन या निर्गुण निराकाराच्या आरतीला जणू प्रकाशाची निरांजन घेऊन हजर होतात. पाहता पाहता या निरांजनाच्या ज्योती अधिकाधिक प्रकाशमान होऊन अवघे विश्व उजळून टाकतात. पूर्वेचा गुलाबी रंग आता सोनेरी रंगात बदलतो. रात्रभर प्रकाशाच्या प्रतीक्षेत असलेली झाडं, वृक्षवेली आपले हात पसरून या प्रकाशाचं स्वागत करतात. अशा वेळी भा रा तांब्यांच्या कवितेतील ओळी सहजच ओठांवर येतात. ‘ पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर…’ या कवितेतलं वर्णन कवीनं जरी सायंकाळचं केलेलं असलं तरी सकाळच्या वेळेलाही ते चपखल लागू पडतच. ‘ फिटे अंधाराचे जाळे…’ या गीतात म्हटल्याप्रमाणे अंधाराचे जाळे नाहीसे होऊन स्वच्छ दिवस उजाडलेला असतो. अशा वेळी परमेश्वर म्हणा की निसर्ग म्हणा मानवाला, पशुपक्ष्याना आणि अवघ्या सृष्टीला जणू म्हणतो, ‘ बघ, तुझ्यासाठी एक अख्खा सुंदर दिवस घेऊन आलो आहे. आता त्याचा कसा वापर करायचा ते तू ठरव. ‘

पहाटेच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भासतात. पण मला सगळ्यात जास्त आवडते ती जंगलातील पहाट. या पहाटेसारखी सुंदर वेळच नाही. रात्र संपून दिवस उगवण्याच्या सीमारेषेवर ही पहाट उभी असते. अशा वेळी निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं. रात्र संपून पहाट होतानाची वेळ इतकी सुंदर असते की अशा वेळी शहरातले भगभगीत दिवे नकोसे वाटतात. पहाटेला तिच्या नैसर्गिक रूपातच पाहावं, फुलू द्यावं, खुलू द्यावं. आकाशातल्या रात्रीच्या मुक्कामाला असणाऱ्या तारे आणि तारका आपल्या घरी हळूहळू परत जायला निघालेल्या असतात. हळूहळू त्या दृष्टीआड होतात. त्यांना अदृश्य होताना आणि पहाटवेळा उमलताना पाहण्यात एक वेगळाच अनोखा आनंद आहे. तो अनुभवावा. 

पहाट मला एखाद्या अल्लड तरुणीसारखी भासते. कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ती आपल्या नैसर्गिक रूपातच येते. तिचं हे नैसर्गिक रूपच मनाला जास्त भावतं. जातीच्या सुंदराला जसं सगळंच शोभून दिसतं, तशीच ही पहाट असते. रम्य, देखणी. अशा वेळी जंगलातून एखादा फेरफटका मारावा. निसर्गाची भूपाळी अनुभवावी. रंग, रूप, रस, गंध सगळं सगळं असतं त्यात. फक्त ती अनुभवता आली पाहिजे. निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपल्याशी बोलत असतो पण ते ऐकता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही साधना आवश्यक असते. सगळ्या कवींना, महाकवींना, लेखकांना या पहाटेनं स्फूर्ती दिली आहे. अनेक सुंदर काव्य पहाटेच्या मंगल वेळेनं प्रसवली आहेत. अनेक ऋषी मुनी, लेखक, कवी यांना प्रतिभेचं देणं या पहाटेनच दिलं आहे. 

आपल्या घराजवळ एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी असेल तर पहाटे जरूर जावं. नसेल तर कधीतरी मुद्दाम वेळ काढून अशा ठिकाणी जावं. ही पहाट अनुभवावी. ही पहाट अनुभवण्यासाठी सध्या तरी कोणतंच शुल्क आकारलं जात नाही. काही चांगल्या गोष्टी अजूनही मोफत मिळतात. त्यातील पहाट, पहाटेचा गार वारा, नयनरम्य निसर्ग आपल्याकडून काही घेत नाही. देतो मात्र भरभरून ! ‘ आपल्याला ते घेता आलं पाहिजे. नाहीतर ‘ देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था व्हायची ! ‘ 

या पहाटेच्या प्रसंगी रानवाटा जाग्या होऊ लागतात. झाडे, वेली जाग्या होतात. आपण जंगलातून तर फेरफटका मारणार असू तर झाडांचा एक अनोखा गंध आपलं स्वागत करतो. अशा वेळी खोल श्वास घेऊन हा गंध, ही शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यावी. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानावर पडत असतात. त्यांच्यातली विविधता, माधुर्य अनुभवावे. पूर्वेकडून होणाऱ्या सुवर्णप्रकाशाची उधळण अनुभवावी. तो प्रकाश अंगावर माखून घ्यावा. तळ्यात फुलणारी कमळे,उमलणारी फुले आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर जणू हजर होतात. त्यांचं निरीक्षण करावं. त्यांचं रूप नेत्रांनी प्राशन करावं, श्वासावाटे गंध मनात साठवावा. पाण्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. तो दिवसभरात नंतर पुन्हा दिसत नाही. नदीचा, झऱ्याचा खळखळाट ऐकू येतो. आपण समुद्रकिनारी असू तर, समुद्राची गाज ऐकू येते. त्याच्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर येऊन जणू आपल्याला पवित्र करत असतात. तुम्ही पहाटेला कुठेही असा. नदीकिनारी,समुद्रावर,डोंगरावर किंवा जंगलात. पहाट आणि तिचं मोहक रूप तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणारच नाही. ही पहाटवेळा तुम्हाला दिवसभराची ऊर्जा प्रदान करेल. 

पहाटेनंतरची वेळ म्हणजे सकाळ. आता दशदिशा उजळलेल्या असतात. साऱ्या सृष्टीत चैतन्य भरून राहिलेलं असतं. माणसाचा, पशु पक्ष्यांचा दिवस सुरु होतो. जो तो आपापल्या कामाला लागलेला असतो. अवघ्या सृष्टीत लगबग सुरु असते. मंदिरातली आरती, धूप दीप आदी सारे सोपस्कार होऊन मंदिरातील मूर्ती प्रसन्न वाटतात. बच्चे कंपनी तयार होऊन शाळेला निघण्याची गडबड असते. गृहिणीची घरातली आणि कामावर जाणाऱ्यांची  वेगळी धांदल सुरु असते. सकाळचे हे रूप वेगळेच असते. पहाट कोणताही मेकअप न करता नैसर्गिक रूपात आपल्यासमोर येते तर नंतर येणारी सकाळ मात्र छानपैकी सुस्नात आणि वेणीफणी करून आलेल्या तरुणीसारखी प्रसन्न भासते. ती जणू आपल्याला सांगते, ‘ चला, आता आपल्या कामांना सुरुवात करू या. दिवस सुरु झालाय. ‘ मग प्रभात समयीचे हे सूर हे हळूहळू मंद होत जातात. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 147 – गीत – कुछ भी नहीं कहूँगा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण गीत – कुछ भी नहीं कहूँगा।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 147 – गीत – कुछ भी नहीं कहूँगा…  ✍

कुछ भी नहीं कहूँगा।

बस चुपचाप रहूँगा।

जो कहना था कहा, सुना

सपना अपनी आँख बुना

मेरी रही हैसियत जो

चाहा उससे लाख गुना।

अब अपने आप दहूँगा

बस चुपचाप रहूँगा।

देवल की प्रतिमा प्यारी

देख रही दुनिया सारी

दृष्टि सभी की दूध धुली

केवल मैं ही संसारी।

अब अपने पाप गहूँगा

बस चुपचाप रहूँगा।

इच्छाओं का अंत नहीं

होता सभी तुरन्त नहीं

केवल दोष यही मेरा

मैं मानव हूँ संत नहीं।

अब अपने शाप सहूँगा

बस चुपचाप रहूँगा।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 147 – “पूछ रही हर दिशा यहाँ…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  पूछ रही हर दिशा यहाँ)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 147 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “पूछ रही हर दिशा यहाँ…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

आज नही बरसेंगे बादल

शपथ उठा लौटे

कहते हम भी थक जाते हैं

कारण,  इकलौते

 

धुंध छँटी अब तक कुछ –

कुछ है इनकी आँखों से

संध्या के सपनो के टूटे

हुये सुराखों से

 

परछाईं उड़ती दिखती

है नभ की कोरों से

लगता श्याम-घटा ने

खोले जैसे कजरौटे

 

पूछ रही हर दिशा यहाँ

बिनबरसे मत जाना

वृष्टि-छाँव का यही

इलाका वरन हरजाना

 

मेरी बहने हंसी खुशी

करने को अगवानी

खडी हुई हैं अगरुगंध

ले बाहर परकोटे

 

छुटपुट बारदात सी बूँदे

यहाँ वहाँ गिर कर

चलीं गई ले संग घटा को

सिर्फ यहाँ घिर कर

 

सूख-सूख सरिताओं

की भी नब्ज लगी डूबी

रोयें भी तो कैसे

ले आँसू मोटे-मोटे

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

18-06-2023 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares