मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

दर पंधरा दिवसातल्या एका वारी मी इथं येत असतो… आंबा खाऊन  कोय फेकून द्यावी तशी कोयी सारखी पडलेली अनेक माणसं मला इथे दिसतात…

या कोयीचं भवितव्य काय ? … तरीही मी त्यांना स्वच्छ करून जमिनीत पुन्हा रुजवून झाड लावण्याचा  प्रयत्न करत आहे ! 

… या इथे हे मंदिर दिसतंय… त्या तिकडे मस्जिद आहे आणि पलीकडे चर्च आहे… या तीन कोनाच्या ” पायाशी ” बसलेला मी फक्त एक माणूस !

याचक मंडळींना गोळ्या औषधं देणं हा फक्त एक बहाणा असतो. मी त्यांच्याशी यानिमित्ताने चर्चा करून ते काही काम करतील का ? त्यांच्या अंगात काही स्किल आहे का  ? या गोष्टींची चाचपणी करून त्यांना व्यवसाय मांडून देत असतो. 

तर, या ठिकाणी मला ठरलेल्या वेळी एक आजोबा नक्की भेटतात. ते पूर्वी काम करायचे, घरातल्या लोकांना पैसे द्यायचे, त्यांना मदत करायचे… घरातले लोक सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायचे…

एके दिवशी, त्यांना पॅरालिसिसचा झटका आला… नोकरी गेली… घरात पैसे द्यायचे बंद झालं आणि याचबरोबर मग घरातल्या लोकांनी प्रेम करणं सुद्धा बंद केल…. ! बाबांना वाटलं, माझ्याच तर घरचे लोक आहेत, मला सांभाळतीलच… परंतु त्यांचा हा विश्वास फोल ठरला…. घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या अडचणी सांगून, आम्ही तुम्हाला सांभाळण्यास असमर्थ आहोत, असं सांगितलं आणि तेव्हापासून बाबा रस्त्यावर आले …

बाबा फक्त सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कारित सुद्धा आहेत….!  सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो, सुशिक्षित असेल ती व्यक्ती सुसंस्कारित असेलच याची खात्री नसते ! 

बाबांना दम्याचा त्रास आहे, ते काहीतरी करून मी जिथे आहे तिथे येतात आणि मला म्हणतात, Hey Sir, give me pump….! दम्याचा अटॅक आल्यानंतर एका छोट्या पंपमधून श्वासाद्वारे औषध घेतलं की हा अटॅक कमी होतो… त्यांना दरवेळी तो पंप लागतो. मी नेहमी त्यांना पंप देतो… मला भेटल्यानंतर, दरवेळी माझ्या शेजारी बसून माझ्याशी ते वैचारिक चर्चा करायचे…. ! नीट बोलता येत नसतानाही बाबा बोलून व्यक्त व्हायचे, परंतु त्यांच्या मनात प्रचंड विचारांची खळबळ सुरू आहे हे मला नेहमी जाणवायचं…! 

खरंच आहे…. बोलून व्यक्त होतात ते शब्द….!

न बोलताही व्यक्त होते ती भावना….!!

आणि मनात नुसतेच रेंगाळतात ते विचार !!!

एके दिवशी अचानक बाबा यायचे बंद झाले, आज या गोष्टीला जवळपास आठ महिने लोटले….

बाबा का येत नाहीत ? याची चौकशी मी अनेकांकडे केली, परंतु कोणालाच काहीही माहित नव्हतं. मला वाटलं, कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला असावा ! आणि या विचारांमुळे सुखावून मी त्यांची चौकशी करणे सोडून दिले….

यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर म्हणजे  शनिवारी १७ डिसेंबर २०२२ रोजी, याचकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोटरसायकलवर सर्व साहित्य घेऊन मी निघालो असता, एका रस्त्यात ट्रॅफिक जाममुळे मी अडकलो…. मग वैतागून दुसरा रस्ता घेतला, हा सुद्धा रस्ता पुढे ब्लॉक होता, मला या ट्रॅफिक मध्ये सुद्धा अडकावं लागलं… मग गुपचूप थांबुन राहिलो…

मोटर सायकल बंद करून मी उगीच इकडे तिकडे निरीक्षण करत राहिलो… ट्रॅफिकमध्ये निर्जीव गाड्या अक्षरशः एकमेकांना चिकटून उभ्या होत्या… मला कळत नाही, मग सोबत जगताना  जिवंत माणसांत इतकं अंतर का पडतं ? 

हल्ली चार माणसं एकाच दिशेने, एकाच विचाराने, तेव्हाच चालतात, जेव्हा पाचव्याला खांद्यावरून पोचवायचं असतं…. ! No Entry मधून Right घेऊन चुकण्यापेक्षा, योग्य रस्त्याने Left घेवून बरोबर राहणं हे केव्हाही चांगलं…मात्र हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो ! …. 

डोक्यात हे असं काही चालू असताना, अचानक विचारांची मालिका खुंटली….

मी थांबलो होतो, त्याच्या बाजूच्या फुटपाथवरून एक दाढी वाढलेले आजोबा, सरपटत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. अंगावर जे काही कळकट्ट होतं त्याला कपडे का म्हणायचं ? हा मोठा प्रश्न…! 

दोन-चार इंच पुढे सरकतानासुद्धा त्यांना वेदना होत असाव्यात, हे दाढी आडून चेहरा स्पष्ट सांगत होता. 

दोन-चार इंच पुढे सरकताना सुद्धा त्यांना भयानक दम लागत होता…. आकाशाकडे तोंड करून ते एक मोठा श्वास घ्यायचे आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते… सरपटत चालताना बऱ्याच वेळा त्यांचा तोल जात होता, ते पडत होते… पुन्हा उठून बसत होते आणि पुढे सरकत होते…. 

ट्रॅफिक मध्ये ताटकळत थांबलेले सर्वजण हा ” तमाशा ” बघत होते….. त्यांचा ” टाईमपास ” होत होता…! 

या आजोबांकडे पाहून मला पटलं… पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पुन्हा उठून उभं न राहणं म्हणजे हरणं ! हरणं ही फक्त एक मानसिक अवस्था आहे…. जोपर्यंत आपली हार आपण मनाने कबूल करत नाही, तोपर्यंत आपण जिंकलेलोच असतो…! … यश म्हणजे हापूस आंबा असेल तर अपयश म्हणजे हापूस आंब्याची कैरी ! प्रत्येक आंबा कधीतरी कैरी असतोच…. कैरी असण्यात गैर काय… ? कैरी परिपक्व होते तेव्हाच तर ती आंबा होते… कैरीपासून आंबा होणे ही फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया असते….! 

… अपयश जेव्हा परिपक्व होतं, प्रयत्न करून आपण या अपयशावर काहीतरी प्रक्रिया करतो, आणि यानंतर जे मिळतं, त्याला यश म्हणतात…! 

मी या बाबांकडे एकटक पाहत होतो…. डोक्यात वरील विचार सुरू होते आणि एका क्षणी, माझ्या या विचारांची शृंखला तुटली…. मला जाणवलं, ‘ अरेरे हेच ते बाबा…. जे माझ्याकडून पंप मागून घ्यायचे ! बापरे… यांची अशी कशी अवस्था झाली ? इतके दिवस मी समजत होतो त्यांच्या घरातल्यांनी यांचा स्वीकार केला आहे….’

मोटर सायकल स्टॅंडवर लावून, मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नावाने हाक मारली… डोळे किलकिले करत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मला ओळखलं…. मला ते हसत म्हणाले, ‘How are you doc?’

मी म्हणालो, “ मी बरा आहे बाबा, तुम्ही कसे आहात ?”

ते याही अवस्थेत, हसण्याचा प्रयत्न करत, दम लागलेल्या आवाजात म्हणाले, “I am perfectly fine sir, no problem… “ 

त्यांना दम लागला होता…. वरील चार शब्द बोलण्यासाठी त्यांना चार मिनिट लागले आणि तरीही ते म्हणत होते ‘ मी 

“परफेक्टली फाईन” आहे… No Problem!’

आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा, आपण आयुष्यात कधीही I am perfectly fine असं म्हणत नाही…. मला कोणताही Problem नाही असं कधी म्हणत नाही…. आणि आज आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर रस्त्यावर उभे राहून हे बाबा म्हणत होते, I am perfectly fine! No problem…

… खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ शहीद पांडुरंग साळुंखे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

जय हिंद !!

पुण्यातील साळुंके विहार सर्वांना माहीतच असेल पण हे साळुंखे कोण आहेत ? हे कित्येकांना माहीत नाही.

पुण्यातीलच नाही तर साळुंखे विहारमधील देखील कित्येकांना याची माहिती नाही ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे.

तर चला जाणून घेऊया —

सांगलीमधील मणेराजुरीचा आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीचा महावीर चक्र विजेता पांडुरंग साळुंखे यांनी बुर्ज जिंकून दिले आणि पंधरा मराठा लाईट इन्फंट्रीला पंजाब थिएटर अवॉर्डसह बरेच काही मिळवून दिले.

सन १९७१ च्या युद्धामध्ये भारताच्या पश्चिमेकडील भागामध्ये, पंजाब सेक्टरच्या उत्तरेकडच्या भागू कमानपासून ते दक्षिणेकडील पुंगापर्यंतच्या महत्वाच्या पट्टयातील भिंडी, अवलक, बेहलाल, तेबूर, मेहरा, छागकला, गोगा, दुसीबंद, फतेहपूर या अत्यंत महत्वाच्या चौक्यांवर पाकिस्तानी फौजांनी अचानक हल्ला केला.

३ डिसेंबर १९७१ रात्री ११.०० वाजता पाकिस्तानी सेनेतील अत्यंत कडवी समजली जाणारी बलुची पठाण रेजिमेंटच्या ४३ व्या बटालियनने प्रचंड संख्याबळाच्या ताकतीने आणि अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रॉकेट लॉंचर, मशीन गन्स, तोफांनी भारतीय चौक्यांवर बेछूट हल्ला चढविला. त्या तुफानी हल्ल्यासमोर चौक्यांवर तैनात असलेले एइ चे जवान टिकाव धरू शकले नाहीत. आणि पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय चौक्यांवर कब्जा मिळवला. पाकिस्तानी सैन्यांचा कब्जा असलेल्या उंचावरील चौक्या परत मिळविणे मोठे आव्हान होते. त्याठिकाणी डेरेदाखल असलेल्या पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनने आव्हान स्वीकारले. चौक्या सोडून आलेल्या “एइ” जवानांच्या मदतीने पंधरा मराठा लाइट इन्फंट्री बटालियनच्या जांबाज सैनिकांनी क्षणाचाही विलंब न करता, कडव्या बलुच पठाणांच्या बलाढ्य सेनेवर मराठा सैनिक तुटून पडले. पंधरा मराठा बटालियनच्या वीरांनी केलेला प्रतिहल्ला (Counter Attack) यशस्वी करुन अनेक चौक्या परत मिळवल्या. आता दोन्हीकडील फौजा समोरासमोर होत्या दुसीबंद, बेहलोक, गोगा, उंचावरील चौक्यांवरून पकिस्तानी फौजांना खदेडणे कठीण काम होते. १५ मराठा खाली मैदानी भागात होती. मदतीला वैजंता  (विजयंता) रणगाड्यांचा ताफा होता. परंतु उपयोग नव्हता. कारण शत्रू उंचावर होता. त्यांचे रणगाडाभेदक रॉकेट लाँचर तैनात होते. भारतीय सेनेसाठी नैसर्गिक वरदान असलेल्या या चौक्या आता पाकी सैन्यांना वरदान ठरत होत्या.

१५ मराठा सैन्यांची नामुश्की पाहून पाकिस्तानी सैन्य जणू जशन साजरा करीत होते. हवेत गोळीबार करुन मराठा सैन्यांना हिणवत होते. आव्हान देत होते. नाचत होते. खाली तैनात असलेल्या १५ मराठा जवानांचे रक्त खवळत होते. पण आदेश मिळत नव्हता. माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. डिसेंबरची सहा तारीख उजाडली. मोहीम प्रमुख मेजर रणवीरसिंग यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. तेव्हा माघार घेण्याचे संकेत मिळाले. परंतु अंतिम निर्णय मेजरसाहेबांवर सोडण्यात आला. मैदानातून माघार घेतील ते मराठे कसले ? दुसीबंद चौकीवर तैनात असलेले पाकिस्तानचे रॉकेट लाँचरचा मोठा धोका होता. अखेर एकवीस वर्षाचा जवान पांडुरंग साळूंखे याने पुढकार घेतला. मेजर साहेबांना म्हणाला, ‘ सर शत्रूच्या रॉकेट लॉंचरचा मी बंदोबस्त करतो. तुम्ही रणगाडेसह चाल करुन दुसीबंदवर ताबा मिळवा.’ त्याचा हा आत्मघातकी निर्णय कोणालाच पटला नव्हता. माघारही घ्यायची नाही. दुसरा पर्याय नाही.

शेकडो तानाजी, संभाजी अंगात संचारलेला पांडुरंग क्रॉलिंग करत, सापासारखा सरपटत खाचखळग्यातून मार्ग काढत दुसीबुंदच्या दिशेने निघाला होता. शत्रूच्या रॉकेट लाँचरवर कब्जा करायचा एकच ध्यास होता. शत्रूची नजर चुकवत चुकवत पांडुरंग उंचावरील अंतर कापत होता. क्रॉलिंगमुळे पोटावर हातापायावर जखमा झालेल्या. भारतीय सेना एवढ्या उंचावर येऊ शकत नाही अशी खात्री असल्यामुळे बलोची गाफील होते. खाली मराठा सैनिक माघार घेण्याच्या हालचाली शत्रूला जाणवत होत्या. पांडुरंग सरपटत सरपटत वरती पोहोचला. संध्याकाळी पावणेसातची वेळ, थकव्यामुळे डोळ्यावर अंधारी येत होती. थंडीतही घशाला कोरड पडलेली. पाण्याचा घोट घ्यायला वेळ नव्हता. एक एक क्षण महत्वाचा होता. पांडुरंगने संध्याकाळच्या संधीप्रकाशातही शत्रूचे रॉकेट लॉंचरची पोस्ट हेरली. शत्रू काही प्रमाणात गाफील असला तरी रॉकेट लाँचरचा ऑपरेटर सावध होता. अंगात होते नव्हते तेवढे बळ एकवटून पांडुरंगने रॉकेट लाँचरधारी बलोची आडदांड पठाण सैनिकावर प्रहार केला. अचानक झालेल्या प्रहाराने बलोच कोसळला. एक क्षणही वाया न घालवता पांडूरंगने रॉकेट लाँचरचा ताबा घेतला. आणि शत्रुच्याच दिशेने बार उडवला. (धडाम धूम) खाली मेजर साहेबांना हा इशारा होता. वर दुसीबुँद चौकीवर एकच खळबळ माजली. दुसीबुद चौकीवर पाक सैन्यानी पांडुरंगला घेरला. जास्त लोकांनी चौकीवर चढाई केली असावी असा त्यांचा समज झाला. म्हणून बलोची पठाणांची धावपळ चालूच होती. याच संधीचा फायदा घेऊन विजयंता रणगाड्यांचा ताफा दुतर्फा धुरळा उडवत, आग ओकत आगेकुच करीत सुसाट निघाला. पांडुरंगने रॉकेट लाँचर खाली फेकले होते. दुसीबुंद चौकीवर पांडुरंगला पाकिस्तानी सैन्यांनी चारही बाजूने घेरले. एकटा पांडुरंग आणि अनेक पाकिस्तानी सैन्य तुंबळ युद्ध चालू होते. इतक्यात छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी दुसीबुद चौकी हादरुन गेली. १५ मराठा बटालियनचे मावळे दुसीबुंदच्या गडावर पोहोचले. दोन्ही सैन्य समोरासमोर, गुत्तम गुत्तीच्या या लढाईत मराठ्यांच्या प्रतिहल्ल्यासमोर कडव्या बलोची पठाणांनी नांगी टाकली. हत्यारे टाकून पाकिस्तानी सैनिक पळाले. कित्येकांना मराठ्यांनी ठार केले. कित्येक पळता पळता रावी नदीत बुडाले. तर सुमारे दोनशे बलोची पठाणांच्या प्रेतांना वीर मराठ्यांनी रावीच्या पात्रात जलसमाधी दिली. शिवाय दोन ट्रक पाकिस्तानी सैन्यांची हत्यारे, दोन RCL गन माऊंट असलेल्या जीप गाड्या ताब्यात घेऊन, पंधरा मराठा जवानांनी एक विक्रमच केला. इकडे पांडुरंग बाळकृष्ण साळुंखे या अवघ्या एकवीस वर्षीय योध्याच्या शरीराची चाळण झाली होती. अखेरची घटका मोजताना मोहिम फत्ते झाल्याच्या आनंदात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून पांडुरंग वीरगतीस प्राप्त झाला.

शहीद पांडुरंग साळूंखे यांच्या शौर्याला महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सन्माननीय महामहिम राष्ट्रपती यांचे हस्ते हा शौर्य पुरस्कार वीरमाता श्रीमती सुंदराबाई बाळकृष्ण साळुंखे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्कालिन प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी यांनी मणेराजुरी गावात महावीरचक्र विजेता शहिद पांडुरंग साळूंखे यांच्या घरी जाऊन वीरमाता सुंदराबाई यांच्या गळ्यात पडून त्यांचे सांत्वन केले. आज मणेराजुरीच्या चौकात शहीद पांडुरंग साळूंखे यांचा पुतळा बसविला असून दरवर्षी सहा डिसेंबरला मराठा रेजिमेंटचे अधिकारी मिलीटरी बँडसह संचलनाद्वारे शहीद पांडूरंग साळुंखे यांच्या पुतळ्याला महावीर चक्र घालून मानवंदना दिली जाते.

बेळगावला मराठा रेजिमेंटच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरसुद्धा त्यांचा पुतळा आहे. मणेराजुरी येथील शाळा कॉलेजला सुद्धा शहीद पांडुरंग साळूंखे यांचे नाव दिले आहे. या धनघोर युद्धात पंधरा मराठा बटालियनला बुर्ज बटालियन हा किताब मिळाला, तर बेस्ट बटालियन म्हणून सन्मान ट्रॉफीने पंधरा मराठा लाइट इंफन्ट्रीला गौरविण्यात आले. या लढाईत बटालियनचे अकरा जवान शहीद झाले. मेजर रणवीरसिंगसह पाच जवान जखमी झाले.

एक महावीर चक्र, चार वीरचक्र, तीन सेना मेडल, दोन मेशन इन डिस्पॅच, असा पंधरा मराठा बटालियनचा शौर्याचा इतिहास आहे. पाकिस्तानची सर्वात कडवी समजली जाणारी ४३ बलोच रेजिमेंटचा असा दारुण पराभव मराठ्यांनी केला. त्यामुळे पाकिस्तानने ४३ बलोच रेजिमेंट रद्द केली.

जय हिंद !

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ग्रुपची गंमत… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

कोणीतरी त्यादिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर ‘हॅपी बर्थडे अनिल ‘ अशा शुभेच्छा दिल्या. तेव्हा ‘आज अनिल चा वाढदिवस आहे’ हे ग्रृपमधील इतरांना समजले. लगेचच ग्रृपवर शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला.

प्रत्येकाने त्वरित आपापले कर्तव्य पूर्ण केले. काहींनी मराठीत, काहींनी हिंदीत, काहींनी इंग्रजीत, काहींनी संस्कृतमध्ये तर काहींनी स्टिकर, GIF इत्यादी टाकून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. काही क्षणातच ग्रुप ला उत्सवाचे वातावरण आले. यापैकी अनेक जणांना तर अनिल तो काळा की गोरा हे ही माहीत नव्हते.

दुपारी त्याच ग्रुपवर बातमी आली की ‘सदानंदच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. लगेच ग्रुपवर दुःखाचा महापूर आला. ‘आर आय पी’ पासून ‘आम्ही सदानंदच्या  दुःखात कसे सहभागी आहोत’ याचे मेसेज येऊन आदळू लागले.

आता मध्येच अनिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात की नाही या संभ्रमात काही सदस्य पडले. पण यातूनही मार्ग निघाला.

जरा वेळाने वाढदिवस असलेल्या अनिलला शुभेच्छा आणि सदानंदच्या वडिलांना श्रद्धांजली असा ऊन – पावसाचा दुहेरी खेळ चालू झाला.

बघता बघता संध्याकाळ झाली आणि अनेकांच्या ‘दिवे लागणीची’ वेळ झाली.

त्यामुळे त्यातल्या एका दिवट्याने चुकून आज दुःखात असलेल्या सदानंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनिलच्या (हयात असलेल्या) वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

पुढे ज्यांनी नुकताच ग्रुप उघडला होता त्यांनी (नेहमीप्रमाणे मागचे मेसेज न वाचता) आपापली अलौकिक प्रतिभा वापरून वाढदिवस असलेल्या अनिलचे (हयात असलेल्या) वडिलांच्या मृत्यूबद्दल मनापासून सांत्वन केले तर सदानंदला (आजच ज्याचे वडील मयत झाले होते त्याला) ‘हा अतीव आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात अनेक वर्षे येवो’ असे म्हणत अभिष्टचिंतन आणि निरोगी दीर्घायुष्य चिंतिले.

भरीस भर म्हणून एका महाभागाने अनिलच्या वडिलांच्या मृत्यू करता दुखवट्याचे दोन मिनिटांचे शब्द रेकॉर्ड करून पाठवले, आणि सदस्यांना दोन मिनिटे मौन पाळायची विनंती ही केली.

काहींनी तर सदानंद कडून ‘भावा.. आज पार्टी पाहिजे’ अशी मागणी देखील केली.

सरतेशेवटी त्या संध्याकाळी ‘अनिल’ आणि ‘सदानंद’ दोघेही अचानक ग्रुपमधून लेफ्ट का झाले हे मात्र बऱ्याच जणांना आजतागायत समजलेले नाही. 😂

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मातृत्व – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मातृत्व – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गाय जेंव्हा माय होते

कासेला वासरू लुचते

त्या ओठांच्या स्पर्शाने

ती आपसूक पान्हावते

मातृत्वाचा शिरी तूरा

मुखी पडती अमृत धारा

ढूशा देऊनी पिते वासरू

जिव्हास्पर्शी  स्नेह झरा

आई भोवती जग बाळाचे

बाळासाठी जगणे आईचे

पशुपक्षी कटक वा मानव

बदलून  जाते विश्व बाईचे

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

29/12/22

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares