ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ मार्च – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  ८ मार्च -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

आंतरराष्ट्रीय महिला दिन

एखादा विशिष्ट दिवस जेव्हा एखाद्या विशिष्ट नावाने ओळखला जातो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी इतिहास घडलेला असतो.आज आठ मार्च रोजी साज-या होणा-या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचेही तसेच आहे.

08/03/1908 या दिवशी अमेरिकेत  न्यूयॉर्क येथे पंधरा हजार महिलांनी मोर्चा काढला. त्यांनी  कामाचे नियमित तास, चांगला पगार तसेच मतदानाचा हक्क या आपल्या मागण्या मांडल्या व त्या मान्य करून घेण्यासाठी लढा दिला.

रशियामध्ये 1917च्या शेवटच्या फेब्रुवारी महिलांनी असाच लढा दिला. ज्युलियन कॅलेंडर प्रमाणे तो फेब्रुवारीचा शेवट चा रविवार होता. पण ग्रेगेरीयन कॅलेंडरप्रमाणे ती तारीख 08 मार्च होती.

त्यामुळे आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

जगातील अनेक देशांत 1921 पासून हा दिवस साजरा केला जातो. मात्र संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केल्यानंतर म्हणजे 1975 पासून भारतात हा दिवस साजरा होतो.

महिलांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेणे, महिलांचा सन्मान आणि प्रशंसा करणे, त्यांच्या कर्तबगारीचे कौतुक करणे, लिंगभेदाला विरोध करणे आणि महिलांना आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्ट्या जागृत व स्वयंपूर्ण करणे असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दिनाचे आयोजन केले आहे.

महिलांनी महिलांना व पुरूषांनी महिलांना समजून घेऊन सहकार्य केले तरच हे उद्देश सफल होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त महिला वर्गास हार्दिक शुभेच्छा!?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – गीतांजली भावार्थ – प्रस्तुती – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? निवेदन – गीतांजली भावार्थ ?

आजपासून आम्ही वाचताना वेचलेले या सदरात, कविवर्य र. टागोर यांच्या गीतांजलीतील गीतांचा भावार्थ “गीतांजली भावार्थ” घेऊन येत आहोत. दर सोमवारी काही गीतांचा भावार्था प्रकाशित होईल. हा  भावार्थ लिहिला आहे, कै. मा. ना. कुलकर्णी यांनी आणि प्रस्तुती आहे, प्रेमा कुलकर्णी यांची.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रवास स्त्री – जीवनाचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रवास स्त्री – जीवनाचा … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शतकानुशतकांचा होता स्त्रीस बंदिवास !

स्त्री मुक्तीचा तिने घेतला सतत ध्यास !

घेऊ लागली आता जरा मोकळा श्वास !

उपभोगीत आहे स्त्री म्हणून मुक्त वास!

 

स्त्री आणि पुरुष निर्मिले त्या ब्रह्माने !

विभागून दिली कामे  त्यास अनुरूपतेने!

जनन संगोपन यांचे दायित्व दिले स्त्री ला!

आधार पोषणाचे कार्य मिळे पुरुषाला !

 

काळ बदलला अन् पुरुषी अहंकार वाढला!

पुरुष सत्तेचा जुलूम जगी दिसू लागला !

स्त्री अबला म्हणून जनी मान्य झाली!

अगतिक  दासी म्हणून संसारी ती जगली !

. . . . . . . . . . . 

 

स्त्री शिक्षणाचा ओघ जगी या आला!

स्त्री चा चौफेर वावर जनी वाढला!

चिकाटी, संयम जन्मजात लेणे तिचे !

चहू अंगाने बहरले व्यक्तिमत्व स्त्रीचे !

 

सर्व क्षेत्रात मान्य झाली स्त्री पुरुष बरोबरी !

दोन पावले पुढेच गेली पण नारी!

न करी कधी ती कर्तव्यात कसूर !

जीवन जगण्याचा मिळाला तिलाच सूर!

 

स्त्री आणि पुरुष दोन चाके संसाराची !

समान असता वेगेची धाव घेती !

एकमेकास पूरक राहुनी आज संसारी!

दोघेही प्रयत्ने उंच नभी घेती भरारी !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || महिला दिन || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ || महिला दिन || ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

फक्त तिच्या संसाराला

सारे आयुष्य देतसे

एक दिसाचा सन्मान

तिच्या वाट्याला येतसे ||

 

तिने कुठे मागितली

संसारातून ही मुक्ती

तिला कशाला कोंडता

तीच आहे दैवी शक्ती ||

 

तिच्या वाचूनी अपुरा

आहे विश्वाचा पसारा

तिला सृजनाचा वसा

जन्म येतसे आकारा ||

 

रोज नवे नवे छळ

रोज नवा अत्याचार

मुक्ती मिळावी यातून

हाच सुयोग्य सन्मान ||

 

तिच्या माणूसपणाची

जाणीव जागी राहावी

तिच्या आत्मसन्मानास

ठेच ना पोहोचवावी ||

 

संसाराचे उध्दरण

शिव शक्तीचे मिलन

तिला अभय देणे हा

खराच महिलादिन ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 128 ☆ लाख दिव्यांचा प्रकाश ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 128 ?

☆ लाख दिव्यांचा प्रकाश ☆

कुठून येते रोज वावटळ मनात माझ्या

गरळ मिसळते रोज रोज ती सुखात माझ्या

 

आज दुधाचा चहा करूनी प्यावा म्हटले

आणि नेमके विरजण पडले दुधात माझ्या

 

शिरा पाहिजे म्हणून रडती घरी लेकरे

कधी न पडली साखर येथे रव्यात माझ्या

 

अंधारावर राज्य करावे मला लागते

कधीच नसते तेल इथे रे दिव्यात माझ्या

 

निसर्ग नाही जरी कोपला शेत आडवे

शेजाऱ्याने गुरे सोडली पिकात माझ्या

 

उघड्यावर मी लाख दिव्यांचा प्रकाश मिळतो

दिडकी नाही आज जरी ह्या खिशात माझ्या

 

रोज लावते फेअर लव्हली मी नेमाने

काही नाही फरक तरीही रुपात माझ्या

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर☆

स्री म्हणजे देवाने निर्माण केलेली एक अद्भुत चमत्कृती आहे…

अनेक दैवी तेजापासून उत्पन्न झालेली स्त्री म्हणजे दिव्य शक्तीचाच साक्षात्कार आहे..

निसर्गानेच स्त्रीला निर्मीतीचे वरदान दिले आहे.

म्हणूनच स्त्री ही सृष्टीची सर्वश्रेष्ठ अपूर्व कलाकृती आहे..

जीवनातला प्रमुख रंग आहे…

तरीही स्त्री पुरुषांच्या एकत्रित जीवनाचा विचार केला तर ती दुय्यम स्थानावर असते.. तिला अबलाच मानले जाते. तिची जीवनपद्धती, तिच्या वर्तणुकीचे नियम तिच्या चारित्र्याविषयीचे आराखडे हे पुरुषप्रधान संस्कृतीने बांधल्यामुळे ही महान स्त्रीशक्ती दडपल्यासारखी वाटते मात्र… पण जेव्हा या परंपरेच्या साखळ्या तोडून ती लखलखत्या रंगात अवतरते तेव्हांच घडते तिच्यातले दिव्यत्वाचे तेज….!! मग हीच गौरी दुर्गा बनते… दुष्ट वृत्तीची, असत्याची, अनैतिकतेची संहारक बनते… ही नम्र, शालीन, शांत सात्विक, त्यागमूर्ती तेजमूर्ती संभवते… आणि एका वेगळ्याच रंगाने नटते…

माझे काका मला नेहमी सांगायचे, तुझी काकु अशक्त वाटते ंना.. दुर्बल वाटते ना… गरीब वाटते ना.. परावलंबी वाटते ना…

नाही बरं.. जेव्हा संसारात काही समस्या. संकट निर्माण होते तेव्हा हीच काकु बलदंड बनते. मी पार ढेपाळून  गेलेला असतो तेव्हा ही शक्ती बनून रणरागिणी बनते…

बहु शस्त्रधारिणी बनते… संकट पार होई पर्यंत तिची ताकद संपत नाही. श्रद्धेचं विलक्षण बळ तिच्या पाठी असते.. तेव्हा जाणवते, मीच सगळा वेळ एक अबला स्त्री होतो. आणि ती योध्याच्या भूमिकेतील पुरुष असते… स्त्री म्हणून तिचे हे रंग जेव्हा मी अननुभवतो तेव्हांच तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे….. हे  तीव्रतेने जाणवते…

माता भगिनी पत्नी या नात्यांत तिचे मूलभूत रंग असतातच, पण तिच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त रंग असतात, जे जीवनात रंग भरतात… ओळखणारे ओळखतात आणि त्यांच्या जीवनाची सफर सुखदायी करतात…. माझे आजोबा नेहमी म्हणायचे,

“ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो…..”

म्हणून स्री शक्तीची पूजा फक्त गाभार्‍यात नको ती घराघरात हवी…

स्त्री …जीवनाचे रंग निरनिराळे…

जीवन  अनेकांगाने रंगवणारे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूप्या…भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 1 ☆ मेहबूब जमादार ☆

शामूतात्यानं सकाळी अकरा वाजता जसा गवताचा भारा गोट्याम्होरं टाकला तसा सारा गोटा जागा झाला. दोन म्हसरं टूणदिशी उभी राहीली. सोन्या रूप्यातला एक बैल चटदिशी उभा राहीला. पण रूप्याला काय लवकर ऊटता आलं नाय. त्यांचं वय झालवतं. बरीच वर्ष त्यानं तात्याबरोबर काढलीवती. शेतात घालीवलीवती. पेरायला तर ही जोडी एका लायनीत पेरायची. जाणारा येणारा नुस्ता बघतच रहायचा. एखादा तात्याला सजागती म्हणायचा,

“आरं तात्या पेरतानां रानांत दोरी- बीरी मारलीवती का रं?”

“का बरं आबा?”

“एका लायनीत कुरी दिसत्या.कुठं इकडं नाय की तिकडं नाय”

“खरं सांगू ही सारी सोन्या रूप्याची किरामत,मी काय नुस्ती दावं धरतो अन बापू आमचा पेरतो.”

रूप्याचं वय झालंवतं. तात्यानं त्याच्या तोंडावरून हात फिरवला तसा तो चटदिशी ऊटला.

तात्यानं जनांवरामागचं शेणाचं पू उचलून उकिरड्यात टाकलं.खराट्यानं गोटा झाडला.गोटा साफ झाल्यावर त्यानं आडावरनं दोन चार घागरी पाणी आणलं.पहिल्यांदा बैलानां पाजलं. पुन्हा म्हसरानां पाजलं. बैलानां कोवळं लुसलुशीत गवत टाकलं. म्हसरानां गवत टाकलं. तात्याचं एक गणित होतं ‘मला काय कमी पडलं तर चालंल पण माझ्या बैलानां काय कमी पडू नये’.

बैलं औत ओढायची. गाडी ओढायची. प्रसंगी मोटपण ओढायची. तात्याला बैलाला चाबकाने मारलेलं खपायचं नाय. तो निस्ता बैलाच्या अंगावर मायेने हात फिरवायचा, बैलं आपोआप चालू लागायची़. एवढी माया‌ तात्याची‌ बैलावर होती.बैलांचीपण माया तात्या वर होती. अगदी मुलांसारख़ं त्यानं बैलानां सांभाळ होतं. एकवेळ तो म्हसरानां हिडीसफिडीस करायचा, बैलापुढची शिल्लक वैरण म्हसरानां टाकायचा.

तात्या चा दिवस जेवणापुरताच घरी जायचा. नायतर सारा वेळ तो एकतर सका़ळी वैरण का़ढायचा. उरलेल्या वेळांत तो गोटा साफ करायचा,पाणी पाजायचा. जनांवर खातील तशी वैरण‌ टाकायचा. कवा काम असलं तरच बैलं शेतात असायची.तात्या ची मशागत बैलानां हात न लावता चालू असायची. एवढं बैलानांही तात्या ला काय हवं, काय नको ते कळत होतं.तात्याच्या शेतात औत चालू हाय का नाही ते शेजारच्या शेतमालकाला ही कळून येत नसे.

शेजारचा राघूआबा तर तात्याला नेहमी म्हणायचा,

“आर!तात्या घरात कवा जातूस का नाय,पाहील तवा गोट्यातच‌ दिसतूस?”

“आर!घरांत बसून काय करायचं,जनावरांची सेवा केली तर तेवढंच पुण्य लागलं”

“तूझं  बेस हाय बाबा,तूझी बैलं तू जाशील तिथं मागणं येत्यात.तू दावं नाही धरलस तरी चालतंय.आमचा चित्र्या बघितलास का?घरातल्या सगळ्यांच्या अंगावर येतोय.काय करावं ते कळतच नाही बघ.”

“हे बघ त्येला मारू तेवढा नगस.बघ आपोआप त्येचा राग थंड होतोय का नाय ते”

“तात्या तुझ्याकडं काय तरी जादू हाय बघ.तुला कुठलंही जनावर लई लबूद”

असं बरचं बोलण व्हायचं.पण तात्या नं कुठल्याच जनांवरावर केंव्हा चाबूक उगारला नाय.उलट एखादा बैलाला मारत असेल तर तो सोडवायला जायचा.

त्यामूळं गोटा अन तात्यातं एक प्रेमाचा धागा तयार झालावता.हे सारं पाहून त्याचा मोठा भाऊ बापू म्हणायचा,

“तूला भूक तरी लागते का नाय?का रोज घरातनं माणूस पाटवून द्यायचा तुला जेवायला बोलवायला?”

तात्याची गोट्याशी मैत्रीच होती तशी. तात्या भूक लागली तरच जेवायला घरी जायचा नायतर त्या मचाणावर पडून असायचा.

सकाळी वैरण आणायची. विहीरीवर आंघोळ करायची की परत गोट्यात. भूक लागली की तात्या घरांकडं जायचा. एखादवेळी तेभी विसरायचा. मग तात्याची बायकू धडप्यातनं जेवाण घेवून याची. तात्याचं घर अन गोटा फार लांब नव्हता. सारं काम झालं तरी तात्या उगाच गोट्यात बसून असायचा हे बायकोला ठावं होतं.

आज नेहमीप्रमाणेच तात्याची बायको जेवाण घेवून आली.

“न्हवं!”

“काय गं?”

“आता तूमाला काय बोलायची सोय राहीली नाय.लगीन माझ्याबरं लावलयं का त्या गोट्याबरं?”

ह्या प्रश्नानं तात्या खरंच हसला.

“अगं!मी आलो नाय म्हणून रूसलीस व्हय! बरं झालं आल्यास ते.ये दोघं भी जेवू”

“जेवा तुमी,पण एक सांगाया आलेवते?”

तात्यानं कान टवकारले.

“बोल की?”

“आवं बापूसाब म्हणत्यात त्यो रूप्या आता म्हातारा झालाय.त्येला विकून टाकूया.”

हे ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत पाणी आलं.त्यानं पुढली भाकरी बाजूला सारली.

क्रमश: …..

  – मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

  1. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं – “जगलास किती दिवस?”
  2. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं – “माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?” लाकडं म्हणाली, “मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?”
  3. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,”बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
  4. माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ? – देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
  5. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे? – दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
  6. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, “माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?” त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. “माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?”

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

 

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-२ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

३) मध्ययुगीन काल~ इ.स. ८०० ते १८००.

या कालखंडांत रागसंगीताचा उगम व प्रसार झाला.साधारण १५०० ते २००० वर्षापूर्वीचा हा काळ.जयदेवाचे गीतगोविंद याच कालखंडांतील असून त्यांतील अष्टपदींवर मालवी, वराटी,वसंत,बिभास,   भैरव अशी रागांची नावे आढळतात.विलक्षण कल्पनाशक्तीचे व बुद्धीचातूर्याचे लक्षण असणारी ही रागपद्धती नेमकी केव्हा,कोणी,कशी आणली या संबंधीचा कोणताही पुरावा अस्तित्त्वांत नाही. परंतु परकीय स्वार्‍या, राज्यांची उलथापालथ ह्यामुळे समाजजीवन फार अस्थिर स्वरूपाचे होते.अशावेळी अनेक संगीत जाणकारांनी आपल्या बुद्धीचातूर्याने लोकसंगीतांतून रागपद्धतीस जन्म दिला आणि पुढे शेकडो वर्षांच्या कालखंडांत सतत नवनव्या रागांची भर पडत गेली.मुसलमान व इंग्रज यांनी दीर्घकाळ एकछत्री साम्राज्य चालविले,भारतीय मनावर परकीयांचे अनेक संस्कार झाले,मात्र भारतीय रागसंगीत हे पूर्णपणे भारतीयच राहीले.जातिगायन पूर्णपणे लुप्त झाले आणि धृपद गायकी अस्तित्वात आली.अकबराच्या दरबारांतील नवरत्नांपैकी मिया तानसेन(रामतनू)हा धृपदिया म्हणून प्रसिद्ध होता.मियाकी तोडी,मिया मल्हार वगैरे आजचे लोकप्रिय राग हे तानसेनाने निर्माण केले आहेत.ह्या संबंथी अशी कथा सांगतात की,तानसेनाने दीपक राग गावून दीप प्रज्वलन केले पण हा राग गात असताना त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला तेव्हा तानसेनाच्या बायकोने व मुलीने मल्हार गाऊन होणारा दाह शांत केला.

मुघल साम्राज्यांत त्यांनी आणलेल्या पर्शियन संगीताने भारतीय संगीतावर थोडा परिणाम केला.तेराव्या शतकांत अमीर खुश्रो या संगीतकाराने भारतीय संगीतावर पर्शियन संगीताची कलमे केली आणि त्यातून एक नवीन गायनशैली अस्तित्त्वांत येऊ लागली.हीच ती आजची लोकप्रिय ख्याल गायन पद्धति. ठुमरी,गझल,कव्वाली हे गायनप्रकारही यावनी कालखंडांतच प्रसार पावले.परिणामी धृपद गायकी मागे पडून ख्याल गायकीने पूर्णपणे मैफीली व्यापून टाकल्या.आजही भारतीय संगीताची मैफल ख्याल गायकीनेच व्याप्त आहे.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं – मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस? आता इथून पुढे )

उज्ज्वला – अगदी योगायोगाने. साधारण मी निवृत्त होण्याचा तो काळ होता. लायब्ररीतून एकदा  एक हिन्दी कथासंग्रह वाचायला आणला. ‘कविता सागर.’ हा तारीक असलम तस्नीम या बिहारी लेखकाचा विशेषांक होता. विचार असा, हिन्दी लेखकांचे आस्थेचे विषय कोणते? काय, कसं लिहितात, बघावं. या वेळेपर्यंत माझ्या कथांचे फास्ट फूड, कृष्णस्पर्श, धुक्यातील वाट आणि झाले मोकळे आकाश ही ४ पुस्तके प्रकाशित झाली होती. 

पुस्तिकेच्या आकाराचे हे त्रैमासिक होते. वाचायला लागले, आणि चकीतच झाले. अर्धं, पाऊण, एक पानी कथा. कुठेही वर्णनाचा फापट पसारा नाही॰ थेट विषयाशी भिडणं आणि सत्य, तथ्य मांडणं. मराठीत आशा प्रकारच्या कथा लिहीलेल्या माझ्या पहाण्यात तरी नव्हत्या. याचा अनुवाद केला, तर मराठी वाचकाला एका वेगळ्या साहित्य प्रकाराची ओळख होईल, असं वाटलं. म्हणून मग मी काही कथांचे अनुवाद केले आणि तेव्हाचे लोकमतचे संपादक दशरथ पारेकर यांना दाखवले. त्यांनीही आस्था दाखवली. आणि या कथा सदर स्वरूप लोकमतमध्ये येऊ लागल्या. या दरम्यान ‘बेळगाव तरुण भारत’ च्या ‘खजाना’ पुरवणीसाठीही  कथांचा अनुवाद पाठवू लागले. ‘कथासागर’ची वर्गणी भरली. त्यामुळे मला अनुवादासाठी कथा उपलब्ध झाल्या. मी त्या त्या  लेखकांना त्यांच्या कथांचे मराठी अनुवाद पाठवत असे. मग ते आणि त्यांच्या परिचयाचे इतर लेखक आपापले लघुकथा संग्रह अनुवादासाठी पाठवत. त्यामुळे मला अनुवादासाठी कथांची कमतरता कधी भासली नाही. बारा वर्षे होऊन गेली. ‘खजाना’ मधील माझे हे सदर अजून चालू आहे.

या लेखनातून माझी लघुतम कथांची ६ पुस्तके झाली. यातील कथांचा आकृतिबंध वेगळा असल्याने सुरूवातीला पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊसने’ स्पॉट लाईट- तारीक असलम तस्नीम व सवेदना – डॉ. कमल चोपडा ही पुस्तके प्रकाशित केली. यापैकी ‘स्पॉट लाईट’ला बुलढाण्याचा ‘तुका म्हणे’ हा अनुवादाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘आवाज: आतला… बाहेरचा …हे घनश्याम अग्रवाल यांच्या लघुतम कथांचे पुस्तक निघाले. पुढे प्रत्येकी दहा लघुतम कथाकारांच्या प्रत्येकी १० कथांचे मिळून ‘थेंब थेंब सागर’ व कण कण जीवन’ आसे दोन संग्रह निघाले. अगदी अलीकडे ‘प्रातिनिधिक पंजाबी कथां’चा संग्रह निघाला. हा पंजाबीच्या हिन्दी अंनुवादावरून केलेला होता इतक्या कथांचा अनुवाद करता करता मीही काही लघुतम कथा लिहिल्या. त्या हिन्दी मासिके व पुस्तक संकलने यातून प्रकाशित झाल्या.

मी – तू केवळ लघुतम कथाच नव्हेत, तर मोठ्या कथाही केल्या आहेसं.

उज्ज्वला – हो. त्यावेळीही असंच झालं. लायब्ररीतून वाचायला आणलेल्या एका पुस्तकात मोहनलाल गुप्ता यांची ‘आशीर्वाद’ ही ऐतिहासिक कथा वाचली. ती मला खूप आवडली. मनात आलं, हा इतिहास मराठी वाचकांना कळावा, म्हणून मग त्यांच्या परवानगीने मी तिचा अनुवाद केला. परवानगी देताना त्यांनी लिहिलं होतं, ‘त्यांचं जे साहित्य मला आवडेल, त्याचा अनुवाद करून मला हव्या त्या ठिकाणी प्रसिद्ध करायला मी स्वतंत्र आहे.’  या सोबत त्यांनी तोपर्यंत त्यांची प्रकाशित झालेली सगळी पुस्तके मला पाठवली. त्यात ४ कथासंग्रह होते. कथा छानच होत्या. मी इतरही कथांचे अनुवाद केले. ते मासिकातून, दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले. पुढे त्याचं पुस्तक निघालं ‘सांजधून’. हे माझं पहिलं अनुवादीत पुस्तक. त्यानंतर इतर अनेक निघाली. कथांचा अनुवाद करताना एक विचार मनात असे, तेच तेच घिसं-पीटं लिहिण्यापेक्षा आशय, रचना या सगळ्या दृष्टीने वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असेल, ते वाचकांपर्यंत पोचवावं. त्याचप्रमाणे कथा अनुवादीत वाटू नयेत. मूळ मराठीत लिहिलेल्या वाटाव्या. त्यानंतर मी मोहनलाल गुप्ता, सरला अग्रवाल, आणि डॉ. कमल चोपडा या ३ लेखकांच्या प्रत्येकी ८ कथांचा अनुवाद ‘त्रिधारा’ म्हणून केला. हेही पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले. या पुस्तकाला शिरगावचा  (जि. धुळे)  ‘स्मिता पाटील’ पुरस्कार अनुवादासाठी मिळाला.

त्यानंतर मी प्रतिमा वर्मा (बनारस), सूर्यबाला ( मुंबई),  मधू कांकरीया ( मुंबई),  डॉ. कमल चोपडा ( दिल्ली ) इ.च्या कथासंग्रहांचा अनुवाद केला. याशिवाय अनेक लेखकांच्या कथांच्या अनुवादाची संकलित पुस्तकेही आली. हे सारं करत असताना आणखीही एक महत्वाची गोष्ट घडली. माझ्या एका मराठी कथेचा अनुवाद ( लीडर) साहित्य अॅहकॅदमीच्या मुखपत्रात ‘समकालीन भारतीय साहित्य’ यात आला म्हणून ते द्वैमासिक माझ्याकडे आले. तोपर्यंत त्या नियतकालिकाबद्दल मला काहीच माहीत नव्हते. त्यानंतर मी त्याची वर्गणी भरली. या नियतकालिकाचे वैशिष्ट्य असे की इथे हिन्दी साहित्याबरोबरच अन्य भाषातील दर्जेदार साहित्याचा हिन्दी अनुवाद प्रकाशित होत असे.  यातून मला अन्य भाषेतील चांगल्या कथा अनुवाद करण्यासाठी मिळाल्या. आवर्जून उल्लेख करावा आशा कथा म्हणजे- राक्षस – सुकान्त गंगोपाध्याय ( बंगाली), उत्तराधिकारी  केशुभाई देसाई -(गुजराती), मुडीवसंतम्-  व्होल्गा (तेलुगू)  मागच्या दाराने – ममतामयी चौधुरी ( आसामी). या सगळ्या कथा माझ्या ‘विविधा या कथासंग्रहात संग्रहित आहेत.

त्यानंतर माझ्या धुक्यातील वाट, गणवेश, मीच माझ्याशी या कथांचे हिदी अनुवादही यात प्रकाशित झाले. पुढे गणवेशचा तर कन्नड आणि तेलुगूमध्येही अनुवाद झाला.

मी – तुझी हिंदीतील अनुवादाची एकूण किती पुस्तके झाली?

उज्ज्वला – लघुतम कथासंग्रह -६, लघुकथासंग्रह ( हिंदीत याला कहानी म्हणतात.) – १३ , कादंबर्या -६, , तत्वज्ञान – ५ अशी माझी अनुवादाची पुस्तके प्रकाशित आहेत. कथासंग्रहांच्या अनुवादाच्या २-३ आवृत्याही निघाल्या आहेत. यातील काही पुस्तके मला प्रकाशकांनी सांगितली, म्हणून मी ती केली.

मी – तुझ्याही कथांचा हिन्दी अनुवाद झालाय.

उज्ज्वला – होय. मानसी काणे, सुशीला दुबे, प्रकाश भातंब्रेकर यांनी तो केलाय. तो हिंदीतल्या दर्जेदार मासिकातून प्रकाशित झालाय.

मी – तू आत्तापर्यंत तुझा झालेला लेखनप्रवास मांडलास. तुला असं नाही का वाटलं, की या क्षेत्रात आपल्या अजून काही गोष्टी करायच्या राहिल्या ?

उज्ज्वला – नाही. माझ्या कुवतीप्रमाणे, जे आणि जेवढं करावसं वाटलं. तेवढं मी मनापासून केलं. मी जेवढं करू शकले, त्याबद्दल मी तृप्त आहे. समाधानी आहे. वाचकांना माझ्या लेखनाबरोबरच अनुवादीत साहित्यही आवडलं. त्याबद्दल ते फोन करतात. मला म्हणतात, ‘पुस्तकात लिहिलं आहे, अनुवादित म्हणून आम्हाला तो अनुवाद आहे, हे कळलं. एरवी आम्हाला हे लेखन मूळ मराठीतीलच वाटतं. मी ऐकते आणि मला कृतार्थ वाटतं. एकूणच माझ्या लेखनाच्या बाबतीत मी तृप्त आहे. कृतार्थ आहे. जे मिळालं, त्यात मी समाधानी आहे.

समाप्त

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares