सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  कुमार गंधर्व ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

कॅलिडोस्कोप डोळ्याला लावल्यावर जसजसं ते नळकांडं आपण गोल फिरवतो तसं असलेल्याच काचतुकड्यांतून वेगवेगळी  नक्षी तयार होत राहाते आणि प्रत्येकच वेळी त्या एकेका नक्षीच्या स्वत:च्या अशा सौंदर्यानं आपलं मन मोहून जातं. त्या विविध नक्षींपैकी कोणती नक्षी सर्वात जास्त सुंदर हे काही केल्या आपण ठरवू शकत नाही कारण प्रत्येकच नक्षी स्वत:च्या आकार-उकारात आणि रंग-रुपात तितकीच देखणी वाटते. ते इवलेइवलेसे चिमुकले म्हणावेत असे आकार  आपल्याला अक्षरश: अपरिमित आनंद देतात आणि आपण त्यात हरवून जातो. अगदी असंच कुमारजींचं गाणं! कुमारजी… कुमार गंधर्व ही उपाधी लाभलेले… शिवपुत्र सिद्धरामैया कोमकली!

एका कन्नडभाषिक परिवारात ८ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेल्या कुमारजींमधला सुरासक्त कलाकार अगदी बालवयातच आपली चुणूक दाखवू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच संगीताच्या मैफिलीत आपल्या प्रभावशाली गायनानं कुमारजी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले होते. प्रोफेसर बी. आर. देवधर आणि अंजनीबाई मालपेकर हे त्यांचे संगीतातील गुरू! जन्मजात सुराची ‘जाण’, प्रतिभा, संगीतप्रेम, गुरूंचं नेमक्या मार्गदर्शनासहित एक ‘नजर’ प्रदान करणं आणि कुमारजींचंही गुरूंनी प्रदाण केलेलं नेमकेपणी पकडणं आणि पुढं ते विशालत्वाकडं नेणं ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला ‘गंधर्व’ अनुभवता आला.   

वयाच्या एका टप्प्यावर दुर्धर आजाराशी सामना करताना पुन्हा गाता यायला हवं असेल तर पाच वर्षं तानपुऱ्यासोबत गायचं नाही हा डॉक्टरांचा सल्ला कुमारजींनी व्रतासारखा आचरला. मात्र अंथरुणावर पडल्यापडल्या त्यांचं मन गातच राहिलं, सुरांतील बारकावे, सुराच्या अनंत छटा शोधत राहिलं. आयुष्यात सूर परतून यावा ह्या विलक्षण इच्छाशक्तीमुळंच आजाराशी  धैर्यानं सामना करून कुमारजींनी त्यावर मात केली. मात्र आजार जाताजाता आपल्या कायमच्या पाऊलखुणा कुमारजींच्या आयुष्यावर उमटवून गेलाच. एक फुप्फुस कायमचं निकामी झालं आणि उरलेल्या एका फुप्फुसावर सगळी जबाबदारी आली. ह्या मोठ्या कमतरतेचं कुमारजींनी ना रडगाणं गायलं ना सहानुभूती लाटण्यासाठी जगासमोर त्याचं भांडवल केलं. उलट गायनासारख्या दमछास हीच मुख्य बाब असणाऱ्या विषयात ‘तुटपुंजा श्वास’ चांगल्या अर्थानं भांडवल म्हणून वापरला.

एका फुप्फुसाचा आधार घेत, त्याला जपत पण रियाजाने ताकदवानही करत आपली गायनशैली इवल्याइवल्या स्वराकृतींनी सजवून अपार देखणी केली. त्याच त्यांच्या आणखी देखण्या झालेल्या गायनशैलीनं कुमारजींना असामान्यत्वाच्या रांगेत आणून उभं केलं. कुमारजींचं गायन नजाकतपूर्ण अशा  बारीकबारीक स्वराकृतींनी नटलेलं! एकाचा आनंद अजून घेतोय तोवर दुसरं देखणेपण पुढ्यात यावं इतक्या सहजी जणू सौंदर्यलडी त्यांच्या गायनातून उलगडत राहायच्या.

रागसंगीताची त्यांची नजाकतपूर्ण गायनशैली हा एक भाग झालाच मात्र त्याखेरीजही कुमारजींनी संगीतक्षेत्राला अपार संपत्ती प्रदान केली. आजारपणातून बाहेर येण्यासाठी त्यांना मानवेल अशा हवेत राहाण्याचा डॉक्टरांचा सल्ला मानून माळवा प्रांतात देवास इथे वास्तव्याला आलेल्या कुमारजींच्या कानांवर तिथलं संपन्न लोकसंगीत, लोकधुनी पडू लागल्या. त्या सुंदर स्वरसंगती कलासक्त, सुरासक्त, संगीतासक्त कुमारजींच्या मनात घोळू लागल्या. त्यातूनच पुढं कुमारजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली. त्या रागांची माहिती आणि कुमारजींनी रचलेल्या बंदिशी आपल्याला त्यांच्या ‘अनूपरागविलास’ ह्या पुस्तकाच्या एका खंडात एकत्रित स्वरूपात आढळतात.

‘कुमारजींनी गायलेली निर्गुणी भजनं’ ह्या गोष्टीची भक्ती करणारे, ती ऐकताऐकता ध्यान लागल्याची अनुभुती घेणारे लोक त्यांच्यापासून पुढच्याही प्रत्येक पिढीत आढळतात. आपल्या खास पद्धतीनं त्यांनी गायलेली कबीरभजनं मनाचा ठाव घेतात. त्यातील कबीराची शब्दसुमनं आणि त्यांतील अलौकिक अर्थाचा दरवळ कुमारजींच्या स्वरांतून रसिकांनी जसाच्या तसा अनुभवलाच, शिवाय, कुमारजींच्या वेगळ्या ढंगाच्या गायनशैलीनं त्यावर अनुपम सौंदर्याचा वेगळाच ठसा उमटला.

कुमारजींच्या एका मैफिलीत गायलेला तराणा ऐकून कविवर्य वसंत बापट त्यांना म्हणाले, ‘तुमचा तराणा ऐकत असताना मला मंदिरातल्या घंटानादाची आठवण झाली!’ त्यावर कुमारजी उत्तरले, ‘मूळ तराण्याच्या शब्दांना साहित्यिक दृष्ट्या काही अर्थ नसतो. पण गायक ते शब्द कसे गातो त्यानुसार त्याला अर्थप्राप्ती होते.’ निरर्थक शब्दांना अर्थ प्राप्त करून देण्याची कलाकाराची कुवत आणि जबाबदारी ह्याबाबत केवढा महत्वाचा विचार आहे हा!

‘गीत वर्षा’ सारख्या संकल्पना घेऊन कुमारजींनी अभिनव प्रयोग केले ज्यात वर्षा ऋतूशी संबंधित असलेल्या लोकसंगीत व रागसंगीत दोन्ही प्रकारांतील रचनांचा समावेश होता. ‘मला उमजलेले बालगंधर्व’ ह्या कार्यक्रमातून कुमारजींनी बालगंधर्वांच्या गायकीच्या सूक्ष्म अभ्यासातून त्यांना उमजलेली त्यांच्या गायकीची मर्मस्थळं, सौंदर्यस्थळं उलगडून दाखवली. अंगभूत चिंतनशीलता आणि सातत्यानं ध्यास घेऊन संगीताच्या अभ्यासात रममाण होण्याच्या वृत्तीमुळं असे अनेक देखणे प्रयोग कुमारजींनी रसिकांना सादर केले. असे अनेक अभ्यासपूर्ण प्रयोगांची, त्यांच्या सवच रागांची, रागसंगीतातही कल्याणप्रकार, मल्हारप्रकार इ. वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची त्यांची रेकॉर्डिंग्ज म्हणजे संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल साहित्य आहे. 

कुठल्याही प्रकारचं संगीत निषिद्ध तर नाहीच, उलट प्रत्येक प्रकारच्या संगीतातलं सौंदर्य आपण शोषून घ्यायचं हे कुमारजींचं संगीताकडं पाहाण्याचं तत्व म्हणायला हरकत नाही. असा चतुरस्त्र विचारांचा, संगीताला जीवन समर्पित केलेला, सृजनशील, सौंदर्यासक्त कलाकार म्हणजे भारतभूचं भूषण! 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments