सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १४ ) – राग~जौनपूरी/जीवनपूरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगत~राग~जौनपूरी/जीवनपूरी

मागील आठवड्यांत आसावरी थाटांतील दरबारी कानडा रागाविषयीच्या विवेचनानंतर त्याच आसावरी थाटांतील राग जौनपूरी किंवा जीवनपूरी या रागाविषयी लिहावे असे मला वाटते.

आपल्याला माहीतच आहे की सर्वसाधारणपणे थाटातील स्वरांप्रमाणेच त्या त्या थाटोत्पन्न रागांतील स्वर रचना असतात. आसावरी  थाटात गंधार,धैवत व निषाद कोमल म्हणून दरबारी कानडा आणि जौनपूरी दोन्ही रागांत ग ध नी कोमल! हे सर्व स्वर सारखे असूनही दोन राग भिन्न का बरे वाटतात? त्याचे कारण रागांचे चलन!

षाडव ~ संपूर्ण जातीचा हा राग आरोही रचनेत सरळ मार्गी आहे तर अवरोही रचना मात्र वक्र स्वरूपाची असल्याचे आपल्या लक्षांत येते.

सा रे म प(ध)(नी) सां ~ आरोह

सां रें (नी)(ध)प (ध)म प (ग) रे सा.~असा वक्र स्वरूपी अवरोह.

असे असले तरी काही लोक सां (नी)(ध)प म (ग) रे सा असा सरळ अवरोहही घेतात.मात्र वक्रतेमुळे आणि गंधार व धैवताच्या आंदोलनामुळे रागाचे माधूर्य अधिक वाढते.तसेच तीच या रागाची ओळख आहे.

धैवत वादी व गंधार संवादी मानून हा राग सादर करायचा असतो. वादी धैवत हा उत्तरांगांतील स्वर असल्यामुळे याची बढत मध्य व तार सप्तकांतच केली जाते.रियाजासाठी मात्र मंद्र सप्तकांतही गाणे आवश्यक आहे.

आसावरी हा जनक राग प्राचीन आहे.जौनपूरी आणि आसावरी या दोहोत तसा फारसा फरक नाही.जौनपूरीत आरोही निषाद आहे तर आसावरीत आरोहात निषाद वर्ज्य आहे येवढाच काय तो फरक!हिंदुस्तानी संगीतातला आसावरी हा राग दक्षिणेकडे गायला जातो,पण ते जीवनपूरी व आसावरीचे मिश्रण असते.उत्तर हिंदुस्तानी संगीतातही हे दोन राग वेगळे ठेवणे बर्‍याचदां शक्य होत नाही.

मंगेश पाडगांवकरांच्या “दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी” ह्या कवितेला यशवंत देव यांनी जी संगीत रचना केली आहे ते आसावरी व जीवनपूरी यांच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण आहे.

दिवसा सादर होणारा हा राग मधूर तर आहेच,पण खेळकर वृत्तीचाही आहे.किशोरीताई अमोणकर यांची “छुम छननन बिछुवा बाजे”किंवा अश्विनी भिडे यांनी गायिलेली “अब पायल बाजन लागी रे” या बंदिशी ऐकल्या की जौनपूरीतला खेळकरपणा आपल्या डोळ्यासमोर साकार होतो, आणि मनाची सगळी मरगळ झटकून नवचैतन्य निर्माण झाल्याचा भास होतो.

मायकेल राॅबीन्सन या अमेरिकेतील संगीतप्रेमी माणसाने जौनपूरी ऐकल्यानंतर एखाद्या मादक आणि सुंदर स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते असे उद्गार काढले आहेत.

मानापमान नाटकांतील”प्रेमभावे जीव जगी या नटला”हे जौनपूरीतील पद असेच चेतना जागृत करणारे आहे.भक्तिरचनाही ह्या रागात गोड आणि भावपूर्ण वाटतात.याचे उदाहरण म्हणजे अभिषेकीबुवांनी गाजविलेला संत गोरा कुंभार या नाटकातील

“अवघे गरजे पंढरपूर/चालला नामाचा गजर”हा अभंग,तसेच “देवा तुझा मी सोनार”ही भक्तीरचना!सी रामचंद्र यांनी सरगम या चित्रपटांतील”छेड सखी सरगम”हे गाणे जीवनपूरी/आसावरी ह्या मिश्रणांतूनच संगीतबद्ध केले आहे.टॅक्सी ड्रायव्हरमधील”जाये तो जाये कहाॅं,मुघलेआझममधील”मुहब्बतकी झूठी कहानीपे रोये” ह्या गाण्यांवर जौनपूरीची छाप आहे असे जाणवते.

जौनपूर या गांवाच्या नावावरून जौनपूरी हे नाव आले असावे व नंतर त्याचे जीवनपूरी झाले असे काहींचे मत आहे.सुलतान शर्की या अमीर खुश्रोच्या शिष्याने हा राग बनविला असेही मानतात.

तानसेन वंशाचे गायक मात्र या रागाचे अस्तित्व नाकारतात.काहीही वाद असले तरी भारतीय संगीतात जौनपूरी अथवा जीवनपूरी या रागाला निश्चितपणे स्वतंत्र अस्तित्व आहे.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments