?  विविधा ?

☆ रस्ता सुरक्षा ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

प्रिय पालक बंधू-भगिनी,

आपण सध्या पाहतच आहोत की रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आहे. मुळात रस्ते जसे आणि जेवढे आहेत तेवढेच आहेत. मात्र वाहनांची संख्या मात्र भरमसाठ वाढतच आहे. त्यामुळे अपघातांचा आलेख चढत्या दिशेने नोंदवला जात आहे..

कदाचित जेवढे लोक एखादया देशात युद्धात मरण पावत असतील त्यापेक्षा जास्त आपल्या देशात रस्ते अपघातात  मरण पावतात. अपघातात अंशतः किंवा पूर्णतः अपंगत्व येणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे.  त्यामुळे अशा कुटुंबांवर फार मोठा आघात होतो.

एका वृत्तपत्रातील बातमीनुसार गेल्या वर्षभरात आपल्या देशात रस्ते अपघातामुळे 1,68,491 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये खूप विविधता आहे. पण मुख्य कारण अतिशय वेगाने व बेदरकार गाडी चालविणे यामुळे जास्तीत जास्त अपघात होत असतात. चुकीच्या दिशेने गाडी चालवल्यामुळे, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे, गाडी चालविताना मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. काहीजण  अचानक मुख्य रस्त्यावर येतात. वाहन वळवताना हाताने इशारा न करणे किंवा इंडिकेटरचा वापर न करणे,रस्त्यात वाहतुकीस अडथळा होईल अशी गाडी उभी करून ठेवणे वा  गप्पा मारत उभे राहणे.

रात्री गाडी चालवताना एक गोष्ट  लक्षात येते ती म्हणजे मोठ्या गाड्यांचे लाईट्स. एकतर आता नवीन गाड्यांना एल.ई.डी. लॅम्प आहेत. त्यात बऱ्याच वाहन चालकांकडून अप्पर आणि डिपर लाईटचा योग्य पद्धतीने वापर केला जात नाही.

आणि तीव्र प्रकाशझोत वाहन चालकाच्या डोळ्यावर पडून अपघात घडतात.

खरंतर अलीकडील काळात वाहतूकीचे नियम अधिक कडक करण्यात आलेआहेत. दंडाच्या रकमेत व शिक्षेच्या तरतुदीत वाढ करण्यात आली आहे.  मात्र अनेक पालक आपल्या अल्पवयीन पाल्यास गाडी चालवायला देतात. (काही हौस म्हणून, मोठेपणा मिरवण्यासाठी, तर काही गरज म्हणून) तेही अतिशय धोकादायक आहे.

अशी बरीच कारणे या अपघात आणि त्यातून घडणारे मृत्यू किंवा अपंगत्व  यामागे आहेत.

रस्त्यावरून जात असताना आपणच निरीक्षण केले तर आपणाला असे दिसून येईल की, बरेच टु व्हिलर वा फोर व्हीलर मधील गाडी चालवणारी  मंडळी सर्रास व सराईत पणे मोबाईल वर बोलत गाडी ड्राईव्ह करत असतात. काही तर असे महामानव आपणाला पहायला मिळतात की, जे मोबाईल वर टाईप करत करत चॅटिंग करत करत गाडी चालवतात. कळत नसेल का हो यांना? कळतंय पण वळत नाही. गांभीर्य नाही.

त्यात भरीस भर म्हणून आता सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे तर रहदारी मध्ये प्रचंड वाढ तर झाली आहेच पण या ऊसाच्या गाड्यांमुळे रस्ताच आक्रसून गेला आहे. त्यातही आपणाला व्हरायटी पाहायला मिळते. काही गाडीवान अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध गाडी चालवताना दिसतात. तर काही ऊस ओव्हरलोड घेऊन जाताना दिसतात, तर काही ऊस खच्चून भरुनही अतिशय वेगाने वाकडी तिकडी गाडी चालवत जाताना दिसतात. काही एवढा प्रचंड ऊस घेऊन जात असूनही दुसऱ्या ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करताना दिसतात.

त्यामुळे शक्य असल्यासच आपण जरा सावकाशीने यांना ओव्हरटेक करायला हवे अन्यथा सुरक्षित अंतर ठेवून मार्गक्रमण केलेले बरे. नाही का?

मुळात या लेखाचा उद्देश तुम्हा मंडळींना घाबरवण्याचा नाही. तर आपण सर्वच जण सजगतेने आणि सुरक्षिततेने  रस्त्यावर प्रवास करूया. तुमच्या कुटुंबीयांसाठी तर तुम्ही मौल्यवान आहातच तसेच भारतवर्षासाठीही तुम्ही मौल्यवान आहात.

चला तर मग रस्त्यावरचा प्रवास जागरूकपणे करूया.

© श्री ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments