सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

ग्लोबल व्हिलेज आणि डेझर्ट सफारी या दोन दुबईतील स्थळांना भेटी दिल्या त्या अगदी उल्लेख करण्याजोग्या ! ग्लोबल व्हिलेज म्हणजे सर्व जग जणू एका मोठ्या मैदानावर पसरलेले…… चीन, येमेन, मलेशिया, पाकिस्तान, भारत अशा विविध देशांच्या स्टाॅल्सनी भरलेली रंगीबेरंगी दुनिया ! सगळ्या आसपासच्या छोट्या देशातील लोक या ग्लोबल व्हिलेज मध्ये खरेदीसाठी येतात. इथे जाण्यासाठी रेंटवर गाड्या मिळतात. आम्हीही ग्लोबल व्हिलेजला भेट दिली. खरेदी झाली ती येमेनच्या मसाल्याच्या पदार्थांची ! एवढे मोठे दालचिनीचे भारे आणि लवंगा – मिऱ्याचे  डोंगर प्रथमच पाहिले ! इराण मधील सुंदर वस्तूंचे तसेच गालिचांचे स्टॉल बघायला मिळाले. बऱ्याच प्रकारच्या करमणुकीच्या गोष्टीही तिथे होत्या. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ग्लोबल विलेजला खूप गर्दी असते.

‘डेझर्ट सफारी’ हे दुबईतील आणखी एक अट्रॅक्शन ! दुबईच्या एका ट्रिपमध्ये आम्ही डेझर्ट सफारीची ट्रीप केली. फक्त चार-पाच तासांची ट्रिप ! पण खूपच वेगळी ! डेझर्ट सफारी बुक केल्यानंतर ठराविक वेळी पिकप् साठी गाडी येते. दुबईपासून काही अंतरावर पोहोचले की या गाडीतून आपण उतरतो. तिथून वाळूत जाणाऱ्या स्पेशल गाड्या असतात, त्यामध्ये आपल्याला बसवून देतात. वाळूचे डोंगर धडाधड  चढत उतरत या गाड्या जातात तेव्हा आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो ! तरुण लोक मात्र आरडाओरडा  करून या गाडीत एन्जॉय करत असतात ! नंतर या गाड्या ग्राउंड लेव्हलवर असलेल्या मोठ्या तंबूसारख्या दिसणाऱ्या ठिकाणाजवळ आपल्याला घेऊन जातात. आम्ही तिथे गेलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. डिसेंबर २००८ मध्ये आम्ही गेलो होतो. हवेत खूप गारवा होता. वातावरण छान होते. प्रथम कॅमल राईड करून आम्ही आत गेलो. तेथे तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल्स होते. सिनेमात पाहतो तसे खास अरबी वातावरण ! बसायला गाद्या, लोड तक्के, हुक्क्याचे स्टॅन्ड शेजारी ! मेहेंदी स्टाॅल, खास अरबी ड्रेस घालून फोटो काढायची सोय, विविध सरबते, जादूचे प्रयोग करणारे लोक, काचेच्या फ्लाॅवरपाॅटमध्ये वाळू घालून त्यात डिझाईन काढणारे, असे भरपूर काही बघायला मिळत होते. जेवणाची सोय तिथेच होती. जेवणानंतर तिथे वैशिष्ट्यपूर्ण असा ‘ बेली डान्स ‘ बघायला मिळाला.बऱ्याच जणांनी तिथे नाचून घेतले. दोन-तीन तास अशी जत्रा अनुभवताना वाटलं, जगाच्या पाठीवर कुठेही जा,  माणूस स्वतःच मनोरंजन कोणत्या ना  कोणत्या तरी पद्धतीने करत असतोच ! 

अशी ही अनोखी डेझर्ट सफारीची ट्रिप केल्यानंतर आम्ही ‘धाऊ’ ट्रीप केली. ही खाडीवरची सफर होती. ‘धाऊ’ क्रूजवर नातवाचा  वाढदिवस साजरा केला ! संध्याकाळची क्रूज बुक केली होती. ठरल्याप्रमाणे सात वाजता

आम्ही खाडीवर गेलो. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट आणि लोकांचा कलकलाट होता. खाडीवर सजवलेल्या, छान छान नाव दिलेल्या बोटी निघण्यासाठी सज्ज होत्या. आमच्या बोटीचं नाव होतं “चांदनी”! बोटीतून एक दीड तासाची खाडीवरची सफर होती ती ! आम्ही बोटीत बसल्यावर प्रथम वेलकम ड्रिंक दिले गेले. बोट चालू झाली. बोटीतून बाहेरचा परिसर खूपच छान दिसत होता. आकाशातील चांदण्यांबरोबर स्पर्धा करणारे दुबईच्या खाडी तीरावरचे लायटिंग पहात आम्ही सफरीचा आनंद घेतला. काही करमणुकीचे कार्यक्रम  क्रूझवर चालू होते. नातवाच्या वाढदिवसासाठी तिथे केकही सांगितला होता आम्ही !  त्यामुळे केक कटिंग करून  बोटीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गाण्याच्या तालावर तिथे नाचही सुरू होता. जेवणाचा बेत छान होता. मस्तपैकी जेवण करून आम्ही धाऊ ट्रिप एन्जॉय केली.

 ग्लोबल व्हिलेज डेझर्ट सफारी, धाऊ, या सर्व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेटी देत दोन-तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही. ९ सप्टेंबर २००९ साली दुबई मेट्रो सुरु झाली. मेट्रोत बसून आम्ही दुबई मॉल, बुर्ज खलिफा पहायला गेलो होतो. दुबई मॉल बघत बघत आत गेले की बुर्ज खलिफापर्यंत जाता येते. ‘ बुर्ज खलिफा ‘ ही जगातील उंच इमारतींपैकी 

एक ! बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यापर्यंत जाता येते. पूर्ण दुबईची माहिती एका छोट्या थेटरमध्ये स्क्रीनवर दिली जाते आणि मग लिफ्ट इतकी झुमकन्  जाते की १२३ वा मजला कधी आला ते कळतच नाही. तिथे साधारणपणे अर्धा पाऊण तास ३६० अंशाच्या गोलाकार भागातील खिडक्यातून, दुर्बिणीतून संपूर्ण दुबई पाहता येते.

—अशाप्रकारे दुबई फिरता फिरता आम्ही आता 2014 सालापर्यंत आलो होतो.

— भाग दुसरा 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments