श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – अर्थात हे अनुभव जगावेगळे नाहीत. तुमच्यापैकी अनेकांना ते तसे आलेही असतील आणि त्यांना हे वाचायला आवडतीलही. जे नास्तिक असतील त्यांनी निदान हे लिहिण्यासाठी निमित्त झालेल्या माझ्या श्रद्धेमागची निखळ भावना समजून घ्यावी हीच माफक अपेक्षा!)

बालपणातल्या या ‘गोड’ आठवणींच्या दरम्यानच घडलेला एक प्रसंग इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात मी पुस्तकातल्या पिंपळपानासारखा अलगद जपून ठेवलाय!

नृसिंहवाडीला येऊन आम्हाला चार सहा महिने होऊन गेले होते. हे पोस्टिंग म्हणजे दत्तगुरूंवर अपार श्रद्धा असणाऱ्या माझ्या आई-बाबांसाठी न मागता मिळालेल्या वरदानासारखी एक पर्वणीच होती! सरकारी नियमानुसार इथला कमीतकमी तीन वर्षांचा कार्यकाळ अर्थातच त्या दोघांनीही गृहीतच धरला होता. नित्यनेमानं त्यांची दत्तसेवा निर्विघ्नपणे सुरू असताना एक दिवस अचानक सगळ्याच गृहितांना तडे जावेत तसं घडलं. त्यादिवशी बाबांची  कोल्हापूरच्या हेडपोस्ट ऑफिसमधे बदली झाल्याची ऑर्डर आली. इथे येऊन सहा महिनेही पूर्ण झालेले नसताना अचानक बदली झाल्याचं बाबांना खूप आश्चर्य वाटलं.पण त्याहीपेक्षा जास्त यापुढे आपण नित्य दत्तदर्शनाला पारखे होणार या कल्पनेने ते कासावीस होऊन गेले.आईची मनोवस्था यापेक्षा वेगळी नव्हतीच. ती ट्रान्स्फर ऑर्डर आली आणि अतिशय समाधानाने आणि प्रसन्न चित्ताने सुरू असणाऱ्या त्या दोघांच्याही रोजच्या कामातला ताल आणि वेग कुठेतरी हरवूनच गेला. एक-दोन दिवस याच अस्वस्थतेत गेले. त्या रात्री ऑफिसमधलं काम संपवून बाबा आत आले आणि घोटभर चहा घेऊन रोजच्यासारखे पालखीला जाण्यासाठी घराबाहेर पडले. आई आमच्या सोबतीसाठी अर्थातच घरीच थांबली होती. खूप उशीर झाला तरी बाबा परत आले नव्हते. बाबांची वाट पहात कंदीलाच्या मंद प्रकाशात आई आम्हाला थोपटत बराच वेळ बसून होती.

खूप उशिरा बाबा परत आले. न बोलता पाय धुवून त्यांनी कोट काढून खुंटीला अडकवला.

“झोपली नाहीस अजून?”

“नाही. तुमचीच वाट पहात होते.दोघांची पानं घेते. या लगेच.”

दोघं जेवायला बसले तरी त्यांचं मन जेवणात नव्हतंच.

“किती उशीर केलात? पालखी संपली तरी तिथेच थांबून  राहिला होतात ना?”

“तिथून उठावंसंच वाटेना. मनात खळबळ तर होतीच आणि समोर स्वच्छ वाटही दिसत नव्हती. अखेर शरणागती पत्करली. माझी पोस्टाची नोकरी. बदलीचं काय? कधीही,कुठेही झाली तरी जायला हवंच.पण ती अशी,इतक्या लौकर? अचानक?माझ्या दत्त सेवेत कांहीं कसूर तर झाली नसेल ना?आपला इथला अन्नाचा शेर संपला असं समजून निघून जावं म्हटलं तर पावलंच जड होऊन गेली अशी अवस्था! मग करायचं काय? महाराजांना साकडं घालण्यावाचून पर्यायच नव्हता.मग हात जोडून त्यांना प्रार्थना केली. म्हटलं, “महाराज,माझी नकळत कांही चूक झाली असली तर त्याची एवढी कठोर शिक्षा नका देऊ.माझी बदली झाल्याचं दुःख आहेच. पण आज नाहीतर उद्या कुठेतरी बदली होणारच हेही मला माहीत आहे.एकच कळकळीची विनंती आहे.कांही कारणानं आत्ताच बदली होणार असेल,तर ती कुठेही होऊ दे पण तुमचं नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे. कृपा करुन मला अंतर देऊ नका….’ असं विनवून आलोय.

”’हो  पण…आता  कोल्हापूरच्या बदलीची आॅर्डर तर आलीय ना? मग आता हे सगळं कसं शक्य आहे?”

“महाराजांनी मनात आणलं तर अशक्य काहीच नाही. त्यांची जी काही आज्ञा असेल ती आपण शिरसावंद्य मानायची. माझ्या हातात फक्त त्यांच्यापुढं गा-हाणं मांडणं एवढंच होतं. मी ते केलं. तुला खरं सांगू?मनोमन मी मघाशी त्यांच्याशी बोललो, मन मोकळं केलं आणि डोक्यावरचं सगळं ओझं उतरल्यासारखं हलकंच वाटलं एकदम “

ते हे बोलले खरे पण कुठल्याही क्षणी आता रिलीव्हर येईल की इथून लगेच चंबूगबाळं आवरून कोल्हापूरला चालू लागायचं या विचाराची बोच कांही केल्या मनातून जात नव्हती. पण आश्चर्य म्हणजे रिलीव्हर आलाच नाही. दोन दिवस उलटून गेल्यानंतर पत्र आलं ते बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याचं!आणि त्यासोबत दुसरी ऑर्डर होती ती बाबांची कोल्हापूर ऐवजी कुरूंदवाडला बदली झाल्याची! एखाद्या भीतीदायक स्वप्नातून जाग यावी आणि ती भीतीच नाहीशी व्हावी तशी बाबांची अवस्था झाली.

दत्तमहाराजांचा ‘कृपालोभ’ म्हणजे नेमकं काय याची ती प्रचितीच होती जशीकांही. हे सगळं कसं घडलं याचं उत्तर म्हणजे या मूर्तीमंत चमत्काराच्या आड दडलेलं एक रहस्य होतं! कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असणारे एक जी.एस् लिमये होते.माझे बाबाही जी.एस्.लिमयेच. नावातील या साधर्म्यामुळे त्यांची ऑर्डर चुकून बाबांसाठी काढली गेली होती! बाबांची बदली व्हायचा प्रश्नच नव्हता. पण ती  करणं मात्र आता क्रमप्राप्त झालं होतं. कारण मूळ ट्रान्स्फर चेनमधला बाबांचा रिलीव्हर नृसिंहवाडीला जॉईन होण्यासाठी आधीच रिलीव्ह झालेला होता.म्हणून मग बाबांची कोल्हापूरची बदली रद्द झाल्याच्या आॅर्डरसोबतच दुसरी ऑर्डर आली ती बाबांची कुरुंदवाडच्या पोस्टात बदली झाल्याची! ती संपूर्ण घटनाच अतर्क्य आणि अनाकलनीय होती! निव्वळ योगायोग म्हणून या घटनेची संभावना होऊच शकत नव्हती. या प्रसंगातल्या प्रत्येक घटनेच्या घटीतामागे नेमका काही एक

कार्यकारणभाव होता आणि बाबांनी तो मनोमन ओळखला होता आणि स्वीकारलाही होता!

“मी महाराजांना शब्द दिलाय. ‘माझी बदली कुठेही होऊ दे पण नित्यदर्शन चुकणार नाही अशा ठिकाणी होऊ दे’ असं मी महाराजांना सांगितलं होतं. त्यांनी माझं गाऱ्हाण ऐकलंय. आता या स्वतःच्या शब्दाला मी बांधील आहे. हे बंधन नाहीय तर मनापासून स्वीकारलेली ही माझी स्वतःचीच बांधिलकी आहे!”

ही बांधिलकी सोबत घेऊनच बाबांनी आपला कुटुंबकबिला कुरूंदवाडला हलवला.तेथून नृसिंहवाडीपर्यंतचं  अंतर म्हणाल तर फक्त एक मैलाचं. त्यामुळे रोज दत्तदर्शनाला वाडीला जाणं अशक्य किंवा अवघड तरी कां असावं? निदान तेव्हा बाबांना तरी ते तसं वाटलं नव्हतं.

पण ते वाटलं तेवढं सोपं नाहीय याचं प्रत्यंतर मात्र बाबांना रोज नव्याने येऊ लागलं. तेव्हापासूनचा प्रत्येक दिवस हा त्यांची कसोटी पहाणाराच ठरू लागला.कुरुंदवाड पोस्टातल्या कामाची वेळ डबल शिफ्टमधे होती. त्यानुसार सकाळी ७ ते ११ आणि दुपारी २ ते ६ अशी त्यांची ड्युटी असे. कामं जास्त असतील तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय उठता यायचं नाही. त्यामुळे पहिल्या शिफ्टनंतर जेवणासाठी घरी परत यायची वेळ नक्की नसे. तरीही रोज जमेल तेव्हा जमेल तसे ते दत्तदर्शनासाठी वाडीला जात राहिले.तेही केवळ शब्द पाळायचा म्हणून नव्हे तर जाणं राहून गेलं तर त्यांनाच चैन पडणार नव्हती म्हणून! त्यांचा दृढनिश्चय वादातीत होताच आणि आईचीही त्यांना मनापासून साथ होती.तिथल्या साडेतीन वर्षातले पावसाळ्याचे एकूण सोळा महिने तर त्यांची अतिशय कठोर परीक्षाच असे.सकाळची आॅफीसवेळ ७ ते११असली तरी  कामाचा ढीग उपसून पोस्टातून जेवायला घरी यायलाच त्यांना दुपारचा एक वाजून जायचा. कसंबसं जेवण उरकून आराम न करता दुपारी दोन वाजताची आॅफीसची वेळ गाठावीच लागे.त्यामुळे जेवण होताच ते घाईघाईने चपला पायात सरकवायचे. त्यामुळे दत्तदर्शन अर्थातच ऑफिस संपवून ते परत आल्यानंतरच. पूर्वी तोवर कोयना धरण नसल्याने पावसाळ्यात पूर ठरलेलाच. पुराचं पाणी घराच्या उंबऱ्याला लागलेलं असायचं. आम्हा मुलांची रात्रीची जेवणं आवरून आईने आम्हाला झोपवलं तरी बाबांचा पत्ता नसायचा.कंदील हातात घेऊन आई दाराजवळ अंधारातच त्यांची वाट पहात ताटकळत उभी रहायची. ते कधी आठ साडेआठला यायचे तर कधी त्याहीपेक्षा उशिरा.उशीर झाला तर ते घरात आत यायचेच नाहीत. बाहेरच्या बाहेरच आईच्या हातातला कंदील घेऊन , तो छत्रीच्या आड कसाबसा सावरत ते वाडीच्या दिशेने अंधारात अदृश्य व्हायचे आणि ते पाहून आईच्या काळजाचा ठोकाच चुकायचा. कारण त्याकाळी घरोघरी वीज आलेली नव्हती, तिथे रस्त्यात दिवे कुठून असायला?फक्त एक मैलाचंच अंतर पण ते पायी चालत जाताना दुतर्फा असणाऱ्या चिंचेच्या वृक्षांमुळे अधिकच काळोख्या भासणाऱ्या अंधारातून आणि रस्त्यावरच्या कमरेएवढ्या पुराच्या पाण्यातून ते अंतर कापावे लागे. असं मैलभर चालून गेल्यावर नदीकाठ यायचा. त्याकाळी आत्तासारखा मधे पूल नव्हता. त्यामुळे तिथून नावेनेच नदी पार करावी लागे. वाडीला जाणाऱ्या नावेच्या शेवटच्या फेरीची वेळ गाठता आली नाही तर वाडीला पोचणंच अशक्य.म्हणून ती वेळ चुकू नये यासाठी बाबा जीवाचा आटापिटा करायचे.

आईच्या हातातला कंदील घेऊन ते निघायचे तेव्हा “तू माझ्यासाठी ताटकळत थांबू नकोस.वेळेवर जेवून घे.आराम कर.” असं ते आईला बजावून जायचे.प्रत्येक वेळी आई ‘हो’ म्हणून होकारार्थी मान हलवायची, पण बाबा थकून परत येण्यापूर्वी तिने चूल पेटवून त्यांच्यासाठी हात पाय धुवायला पाणी तापवून ठेवलेलं असायचं. बाबा गरम पाण्याने हातपाय धुवून घ्यायचे  तेव्हा तिने जेवणाची दोन पानं वाढून घेतलेली असायची. दिवसभराच्या कामामुळे खूप थकून गेलेली असूनसुद्धा ती रोज बाबांसाठी जेवणासाठी थांबायची. केवळ सोय म्हणून एकटी कधीच जेवायची नाही!

या श्रद्धेच्या वाटेवर दत्तसेवेबरोबरच बाबांची अशी सोबत तिने नि:शब्दपणे आणि प्रसन्नचित्ताने केलेली पहातच आम्ही भावंडे लहानाची मोठी होत होतो. खरंतर ‘तो’ आणि मी यांच्यामधल्या अतूट धाग्यानेच माझ्या मनातलं श्रध्देचं भरजरी वस्त्र या अशा वातावरणातच  हळूहळू विणलं जात होतं पण मला त्या बालवयात त्याची कल्पना कुठून असायला?

मनात दत्तावरची श्रद्धा मूळ धरू लागल्यानंतरही त्यासोबत बाबांची कर्तव्यकठोरताही मनावर ठसत असायची.नित्यदर्शन विनासायास सहजसुलभ व्हावं,म्हणून पोस्टातल्या  कामाच्या ओझ्यापासून सुटका करून घ्यायला त्यांनी कधी खोट्या सबबी सांगून ती कामं टाळली नाहीतच आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे असणारी पुसटशी सीमारेषाही त्यांनी कधीच ओलांडली तर नाहीच आणि पुसलीही नाही!!

माझ्या मनात ‘तो’ दृढ झाला तो या साऱ्या पार्श्वभूमीवर! अर्थात ही फक्त सुरुवात होती. माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पना कुठून असायला? पण  ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास त्याचेच बोट धरुन अगदी निश्चितपणे सुरू झाला होता एवढं खरं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments