सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ विनंती… – लेखिका  : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

मागच्या ‘वीक एन्ड’ ला

तुम्हा दोघींचा फोन आला

“आई,’मदर्स डे ‘चं तुला काय हवं?”

प्रश्न विचारलात मला,

“मायक्रोवेव्हचे डबे, सेंटची बाटली

की काॅर्निंगचा सेट,नॉनस्टिकची भांडी?”

*

संभ्रमात पडले मी

तुमचा प्रश्न ऐकून

त्याचवेळी तुमचं बालपण

गेलं डोळ्यांपुढे सरकून

सारं काही आठवताना

माझ्या मनात आलं

तुम्ही लहान असताना,

मी तुम्हाला काय बरं दिलं…?

इवल्या इवल्या माझ्या पिल्लांना

दिली भरभरून माया

उन्हाची झळ लागू नये

म्हणून पदराची केली छाया

तुमचं बोट धरून तुम्हाला

शिकवलं चालायला

कधी घातले चार धपाटे

तुम्हाला वळण लावायला

वादळवा-यापासून जपण्यासाठी

दिला प्रेमाचा निवारा

कठोर जगापासून वाचविण्यासाठी

सदैव जागता पहारा

तुमच्यावर ठेवली करडी नजर

बनून आभाळपक्षीण

तुमचं हितगुज ऐकण्यासाठी

बनले तुमची मैत्रीण

आज तुम्ही मला विचारताय

‘आई तुला काय हवं…?’

खरंच देणार आहात का तुम्ही

मला जे हवंय ते…?

म्हटलं तर अगदी सोपं आहे

पण पैशांनी नाही मिळणार ते

मला नकोत भेटवस्तू ,

नकोत उंची साड्या

या सा-यांनी भरलंय कपाट

बिनमोलाच्या गोष्टी सा-या

आज मला हवंय तुमच्यातलं आईपण

हळव्या झालेल्या मनाला हवंय

दोन घडीॅचं माहेरपण

दिलेली गोष्ट परत मागू नये

हे कळतंय माझंच मला

पण तुमच्या  मायेची गरज आहे

आज तुमच्या आईला

खळाळतं पाणी पुढेच वाहणार

हे पटतंय ग मनाला

फक्त कधीमधी मागे वळून पाहा

एवढीच विनंती तुम्हाला…!!!

कवयित्री : सुश्री मंगला खानोलकर

प्रस्तुती :सुश्री शशी नाडकर्णी- नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments