?  वाचताना वेचलेले ? 

☆ सखी सासूबाई… – लेखिका – सुश्री यशश्री रहाळकर☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सासूबाईंनी सोडलाय केव्हाच, सासूपणाचा तोरा

त्यांच्यासाठी बांधीन म्हणते, आता वडाला मी दोरा – 

 

पार करायचंय आपल्याला, आपल्यातील एका पिढीचं अंतर

तुम्ही एक पाऊल मागं घ्या, मीही एक पुढे टाकीन नंतर –

 

माझा पिझ्झा पास्ता, तुम्ही कौतुकानं चाखायचा

तुमचा उपमा उप्पीट मी, आडव्या हातानं चापायचा –

 

माझ्यासोबत पहा कधीतरी, तुम्ही मुव्ही थ्री डी

तुमच्यासाठी नेसेन मीही, काठपदराची साडी –

 

सुनेची नसावी अरेरावी, सासूची नसावी सत्ता

नाहीतर मुलाची होते सुपारी, सासू खल सून बत्ता –

 

तुमच्या आजारपणाचा काळ, मी मायेनं सावरायचा

मी केला पसारा तर, तुम्ही प्रेमानं आवरायचा –

 

मतभेद होतीलही आपले कधीतरी, वादविवादही होणार

टोमण्यांचे तीर नको, आपण सामंजस्याची भूमिका घेणार –

 

आपल्याला आयुष्यभर बांधून ठेवते, नात्याची एक रेशमी दोरी

तुमचा जो बाळकृष्ण, तोच माझा सखा श्रीहरी – 

 

तलम उंची पैठणीसारखं, आपलं नातं विणू या

अनुभवाच्या सोनेरी तारांत, मायेचं रेशीम गुंफू या –

 

आई-मुलीचा खोटा मुलामा नको, दिखाव्याचे नसावे कारण

बनू जिवलग सखी एकमेकींच्या, नात्याला बांधू मैत्रीचं तोरण —–

 

कवयित्री :  सुश्री यशश्री रहाळकर

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments