सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 4 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
७.
माझ्या गीतानं सर्व अलंकार उतरवलेत
सुशोभित वस्त्रांचा अभिमान त्याला उरला नाही
आपल्या मीलनात त्याचा अडथळाच आहे.
त्यांच्या किणकिणाटात
आपल्या कानगोष्टी बुडून जातील
केवळ तुझ्या दर्शनानेच माझ्या
कवित्वाचा अहंकार गळून गेला आहे.
हे कविश्रेष्ठा, मी तुझ्या पायाशी आलो आहे.
या बांबूच्या बासरीप्रमाणं माझं जीवन
साधं, सरळ बनवू दे.
आता तुझ्या स्वर्गीय संगीतातच
ते भरुन जाऊ दे.
८.
ज्याच्या अंगाखांद्यावर राजपुत्राप्रमाणं
उंची वस्त्रं घातली आहेत,
ज्याची मान रत्नजडित दागिन्यांनी
जखडली आहे,
त्या बालकाच्या खेळातला
आनंद हिरावला जातो.
त्याचं प्रत्येक पाऊल त्याच्या
कपड्यात अडकून पडतं.
धुळीनं ती राजवस्त्रं मिळतील,
त्यांना डाग पडतील,
या भयानं ते बालक जगापासून दूर राहतं.
त्याला हालचालीची पण भिती वाटते.
धरणीमातेच्या जीवनदायी धुळीपासून कप्पाबंद
करणारे आणि अंगाला जखडून ठेवणारे
हे अलंकार, हे माते, निरुपयोगी आहेत कारण,
ते साधारण मानवी जीवन यात्रेच्या प्रवेशद्वारातून
जायचा हक्क हिरावून घेतात.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈