सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘कुणी घर देता का घर?’ इथं पासून ‘कुणी घर आवरुन देता का घर’ इथपर्यंत आयुष्याची गाडी घरंगळत आली खरी, पण कशी कधी ते कळलंच नाही. पैसा – नोकरी – घर – पद – प्रतिष्ठा ही स्टेशनं बघता बघता मागे पडली आणि ‘निवृत्ती’ या शेवटच्या स्टेशनवर ती सुसाट धावणारी गाडी कधी ना कधी येऊन थांबणार हे कळत असूनही वळत मात्र नव्हतं… तोपर्यंत सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणं, स्वत: सर्वात पुढे रहाण्याच्या अट्टाहासापायी ठेचकाळणं… धडपडणं… आज हे हवं… उद्या ते हवं… हवं म्हणजे हवंच हा हट्ट… (की हवरटपणा) कधी घट्ट मित्र झाला ते कळलंही नाही.

अखेर त्या शेवटच्या स्टेशनवर येऊन थांबलेल्या गाडीतून बाहेर पडल्यानंतर, आता नेमक्या कुठल्या रस्त्याने जावं हे ठरवण्यातच काही वर्षं सरली… त्यात शरीरही थकलं आणि मनही.  

‘ घरात त्या शेजारच्यांसारखं फर्निचर हवं… अमकी सारखी क्रोकरी हवी… तमकीसारखा फ्रीज हवा… घरातल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज खोली हवी… आणि ओघानेच ती ‘डेकोरेटिव्ह’ हवी…’ या सगळ्या हव्यासापायी किती सामान साठवलं होतं घरात ते आता प्रकर्षाने जाणवायला लागलं… पिल्लं आकाशाचा वेध घेत घरातून उडून गेलेली… आणि आता आम्हीही त्या सामानासारखीच एक अडगळ बनायला लागलेलो…

काय करावं… कितीतरी गोष्टी आता अनावश्यक वाटायला लागल्या होत्या. म्हणजे त्यांची अडगळच वाटायला लागली होती… कमी करायला हवी ती अडगळ. पण कशी?…एकट्याला झेपणारं कामच नव्हतं ते…

किती ठिकाणी… किती जणांना विचारलं… मदत करता का म्हणून… जाहिरातही दिली… पण खात्रीशीर कुणी भेटलंच नाही. मग काय… हे सगळं स्वत:च आवरायला लागणार या विचारानेच हतबल झाल्यासारखं वाटलं… कुठून सुरुवात करावी या विचारात एक दिवस नुसतीच बसून राहिले होते… आणि…

आणि अचानक आणखी एक घर मला कळवळून हाका मारतंय्… माझ्यातलीही अडगळ काढून टाक म्हणून विनवण्या करतंय् असं जाणवायला लागलं… आणि क्षणभरात लख्खकन् ते घर डोळ्यासमोर आलं… हो… ते दुसरं घर… माझ्या मनाचं घर… आणि माझ्याही नकळत क्षणार्धात मी त्या घरात पोहोचले सुध्दा… स्थळकाळाचं भान हरपून गेल्यासारखी… आणि ते घर पहातांना आपोआप डोळे विस्फारले…

बापरे… या मनातल्या मूळच्या सुंदर-नितळ घराला ना भिंती… ना छप्पर… ना दार… ना कड्या कुलुपं…आणि आपोआपच अडगळ साठवायला जागाच जागा… आणि खरोखरच साठलेली प्रचंड अडगळ… नुसती अडगळ नाही… त्यावर घट्ट चिकटलेली गडद जळमटं… कधी कशी साठत गेली ही एवढी अडगळ? आठवायचा प्रयत्न करायला लागले. खरं तर कितीतरी गोड-सुखद आठवणींची प्रसन्न हिरवाईही होतीच की त्या जोडीने. पण या दाट जळमटांनी ती पूर्ण झाकून टाकली होती. एक एक जळमट प्रयत्नपूर्वक झटकायला लागले… आणि… हळूहळू सगळं दिसायला लागलं…

‘‘बाबांनी ताईला मात्र झालरी झालरींचा सुंदर फ्रॉक आणला… आणि मला मात्र हा असा… फुलंबिलं आहेत यावरही… पण रंग कसला? काय तर म्हणे मी कपडे खूप मळवते…” इथूनच सुरूवात… हा विचार एका कोप-यात दडून गेलेला… पण नेमकाच आठवला… आणि झाली सुरूवात… किती-किती गोष्टींची अडगळ होती त्या घरात…

‘ माझी काहीही चूक नसतांना बाईंनी मला शिक्षा केली… आणि चूक करणारी ती दुष्ट मुलगी माझ्याकडे पाहून कुत्सित हसली ’… तिचं हसणं विसरूच शकत नव्हते मी… ते आत्ता असं इथे पुन्हा दिसलं. 

‘ तो मला असं म्हणाला ’… ‘ ती मला विनाकारण असं बोलली ’… ‘ आणि तो काय समजतो स्वत:ला… जगातला काही एकमेव मुलगा नाहीये तो ’… अश्रूंनी माखलेला हा विचार… अश्रू सुकले तरी अजून आहेच की एका कोप-यात…

‘ सासूबाई किती भेदभाव करतात माझ्यात आणि माझ्या जाऊबाईंमध्ये… नणंदेमध्ये ’…. ‘ ‘ यांना ना काही कौतुकच नाहीये माझं… त्या तिच्यासारखी बायको मिळायला हवी होती यांना, मग कळलं असतं…’

…हे असले विचार निरर्थक आहेत हे समजेपर्यंत त्यांची अडगळ फारच साठते आहे मनात हे लक्षातच कसं नाही आलं आपल्या?…’ पण हा विचारही नकळत बारगळला प्रत्येक वेळी… आणि तितक्याच नकळत या अडगळीत दिसेनासा झाला.

… ‘ यांना कशी बाई अशी पटकन् छान नोकरी मिळते?’

… ‘ त्या काल बदलून आलेल्या क्लार्कवर साहेबांचा जास्त भरवसा… आणि आम्ही इथे मरमर काम करतोय्… त्याची दखली नाही?…’

…‘ तिला कसा इतका छान फ्लॅट मिळाला?… आमच्या मेलं नशिबातच नाही…’

…‘ यांना ब-या हव्या तिथे बदल्या मिळतात… आम्ही आपली गाठतोय वर्षानुवर्ष… दोन दोन तास खर्च करायला लावणारी लोकल… सकाळ… संध्याकाळ…’

… बापरे बापरे… आता आपोआप दिसायला लागले अनेक वेगवेगळे स्टँड आणि त्यावर दाटीवाटीने अडकवलेली ही इतकी प्रचंड अडगळ… किती भक्कम असतील हे स्टँड… असूया – मत्सर -द्वेष – हेवेदावे – हाव – असंतुष्टपणा – राग – संताप – गढुळलेले विचार… अस्वस्थता.. अशांतता… अशी आणि आणखी कितीतरी लेबलं लावलेले स्टँड आणि त्यांना लटकलेल्या असंख्य आठवणींची… वेळोवेळी मनात आलेल्या अविचारांची अक्षरश: ‘अडगळ’.

… आणि जाणवलं… रहात्या घरातली अडगळ तशीच ठेवून निरोप घेणं फारसं अवघड नसावं… पण ही मनातल्या घरातली अडगळ स्वच्छ न करता निरोप घेणं, म्हणजे ती तशीच सोबत घेऊन जाणं भाग पडणं… नको नको… रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने आलो होतो… तसंच अगदी तसंच… परत जायला हवं… तेव्हा हात तर रिकामेच असतील आपोआप… पण मन मात्र जाण्याआधी स्वत:च प्रयत्नपूर्वक रिकामं करायला हवं… त्यासाठी कितीही पैसे मोजले तरीही कुणी येणार नाही मदतीला हे प्रकर्षाने जाणवलं, आणि नकळत मनानेच निर्धार केला… त्याहीपेक्षा हिंमत बांधली… कंबरच कसली म्हणा ना… आणि केली तर आहे आता सुरुवात… बघू… प्रयत्न तर चालू आहे मार्ग शोधण्याचा… पण ही मनातली अगम्य आणि मनाइतकीच अथांग पसरलेली अडगळ किती आणि कशी आवरता येणार आहे हे तो परमात्माच जाणे… पण त्याच्या चरणी एकच प्रार्थना आहे… ही अडगळ मनातून पूर्ण काढून टाकून अगदी स्वच्छ-निर्मळ आणि निरपेक्ष मनाने त्याच्याकडे पोहोचेपर्यंत पुरतील एवढे दमदार श्वास मात्र त्याने पुरवावेत… त्याच्याकडून आता एवढीच अपेक्षा आहे.      

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments