श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

आमच्या मित्राने रस्त्यावरच्या पिक्चरच्या पडद्याचा फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्षं मागे भूतकाळात गेलं. असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला. साले काय दिवस होते. माझे जे अनुभव आहेत, तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील!  त्यांच्यासाठी खास हा लेख.

आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रोत्सव  हे रस्त्यावरच्या पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नसत. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो त्याच्या. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. मुख्य म्हणजे फुकट असायचे. खर्च मंडळातर्फे केला जायचा. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे, फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो. कधी विसरलो की हळहळ वाटायची. एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असली, तर मग चांगला सिनेमा जिथे असेल तिथे जायचे. तो संपला की दुसरीकडे जायच। तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा. सिनेमा बघतांना मधेच पाऊस यायचा. मग आडोशाला पळायचं. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरली जायची. त्याकाळी गणपतीत फार पाऊस असायचा. पण एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 

आम्ही कुठे कुठे जायचो, कसेही कुठेही बसायचो, रस्त्यावर बसायचो गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून. अगदीच काही मिळालं नाही तर वर्तमानपत्र टाकून. किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो! त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे ही खूप मजेशीर गोष्ट असायची! गंमत म्हणजे पडद्याच्या  एका  बाजूला लेडीज बसायच्या. तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि सगळे  जेन्टस नेहमी अपोझिट साईडला!  त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसल्यासारखी वाटायची. सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळं नको असेल, तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभं राहून बघायचं. नाहीतर कडेला रेतीवर नाही तर खडीवर बसून बघावं लागायचं. ती खडी खाली टोचायची. जेवढं लांब बसू, तेवढा सिनेमा छोटा दिसायचा. म्हणून पुढे बसायचं सिनेमा बघतांना भरपूर डास चावायचे, मुंग्या चावायच्या. तरी सुद्धा नेटानं बसायचं. प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवावी लागायची. त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायच्या. त्यांना  टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा!

त्यावेळी सिनेमा चालू असतांना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे.  मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस घुसायची, नाहीतर कुत्रे घुसायचे. मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या मारामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करतांना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे आकडे स्क्रीनवर यायचे. तेव्हा ते आकडे मोजत ओरडायचो. एक रीळ संपलं की दुसरं लावायचं… काही वेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र यांचा मेळ जमत नसे. तेव्हा विचित्रच वाटायचं  ऍक्शन आधी आणि आवाज नंतर! तरी तसाच सिनेमा बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या! मग परत रिवाइंड करून वन्स मोअर! इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे. तेवढ्या वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत … सोड सोड म्हणून ओरडत!!

केश्तो, असित सेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव,  ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर, दीवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, वो कौन थी, कालीचरण — किती नांवं घेऊ! हे सिनेमे थिएटरमध्ये एक-दोनदा आणि रस्त्यावर  असंख्य वेळा बघितले!

मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे. दामुअण्णा, शरद तळवलकर, राजा गोसावी, निळू फुले, सूर्यकांत, रमेश देव, अशोक सराफ, दादा कोंडके, रवींद्र महाजनी, सीमा, चित्रा, रेखा, जयश्री गडकर, रंजना, उमा  यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघतांना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ती दोघं तिथे आली असती तर त्यांनी नक्कीच मार खाल्ला असता, अशी परिस्थिती असायची.

आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.

गेले ते दिन गेले — !!

रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ्रेंच फ्राईजला, बर्गर आणि पॉप कॉर्नला सुद्धा येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवायला कधीच मिळणार नाही.

गेले ते दिवस. राहिल्या फक्त आठवणी !!

लेखक – अनामिक

संग्राहक – सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments