डॉ. शैलजा करोडे

? मनमंजुषेतून ?

☆ डिटॅचमेंट… भाग – 2 ☆ डॉ. शैलजा करोडे 

‘तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं चंद्रबलं तदेव ।’ ……. म्हटल्याबरोबर माझं घर दुरावलं . मी परकी झाले . पाहुणी झाले . आयुष्याच्या या वळणावरील ही डिटॅचमेंट मला खूप हळवी करणारी होती .पण दुरावलेल्या या माया बंधनांची हुरहुर मनी असली तरी नवीन नात्यांची गुंफणही मनाला दिलासा देत होती .सून , वहिनी , जाऊ , पत्नी या नात्यांनी तर समृद्ध  केलंच होतं  पण एक सर्वोच्च नातं माझ्या कुशीत आलं होतं .मला मातृत्व पद बहाल केलं होतं.माझी छकुली , माझी सावली , माझा काळीज तुकडा , त्रिभुवनाचं सुख मला यापुढे थिटं वाटू लागलं आणि मुली माहेर सोडून सासरी का येतात या प्रश्नाचं गमक मला कळालं.

निसर्गकन्या बहिणाबाईंनी आपल्या योगी आणि सासुरवाशीण कवितेत हेच तर मांडलं.

” देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते “

या डिटॅममेंटला अशी ही गोड अँटॅचमेंट होती .

पुढे आयुष्यात असेही वळण आले आणि एकएक करत आई बाबांनी इहलोकीची यात्रा संपविली . हा माझ्यावर कुठाराघात होता .माझी मायेची माणसं , माझं हळवंपण जाणणारी आई , माझ्यावर अतोनात प्रेम करणारे बाबा निघून गेले , मला पोरकं करुन गेले . उत्तरकार्य संपल्यावर मी माझ्या घरी निघाले तेव्हा माझा भाऊ गळ्यात पडून रडला होता . ” ताई , आई बाबा गेले म्हणजे माहेर संपलं असं समजू नकोस . हा तुझा भाऊ आहे अजून , केव्हाही हक्काने येऊन राहात जा .मला भेटत जा . आईनंतर आता तूच माझी आई आहेस ग . तुझ्या मायेची पखरण होऊ देत जा माझ्यावरही .आणि लाभू दे तुझ्या प्रेमाची श्रीमंती मलाही .” या डिॅचमेंटलाही किती सुंदर अँटॅचमेंट होती . ” आई , तू रडत आहेस ” माझी छकुली मला विचारत होती , ” नाही बाळा “, मी तिला कुशीत घेतलं . आई गेल्याचं दुःख तर होतंच पण मी सुद्धा कोणाची आई आहे हे विसरुन चालणारं नव्हतं .

छकुली आणि तिच्यानंतर आलेला चिंटू . चौकोनी कुटुंबात विसावलेली मी . मुलांचं संगोपन शाळा , शिक्षण , काळ द्रुतगतीनं कधी पुढे सरकला कळलेही नाही . मुलांना पंख फुटले , भरारी घेण्यास सज्ज झाले ,आणि माझे मन कातर झाले .छकुलीचं कन्यादान करतांना मला माझं लग्न आठवलं आणि आयुष्यातलं एक वर्तुळ आज पूर्ण झालं होतं .

चिंटूने खूप प्रगती केली व एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या द्वारे अमेरिकेला गेला आणि पुढे तिथलाच झाला . ” चिंटूसाठी मी स्थळं शोधू लागले . निदान मुलगी भारतीय असावी , आपले संस्कार येणार्‍या पिढीवर व्हावे ही  माझी भोळी आशा . मी चिंटूला म्हणाले पुढच्या महिन्यात येतोच आहेस तर मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम उरकवून टाकू या “.

” आई तुला हा त्रास कशाला , मी शोधलीय तुझी सून . नॅन्सी खूप गुणी मुलगी आहे .” 

माझं स्वप्न भंगलं , पण मुलाच्या स्वप्नाला महत्व देणं गरजेचं असल्यानं मी हा दुःखावेगही सोसला .

मुलं घरट्यात विसावली , उरलो आम्ही दोघेच.सुधीरची साथ असल्याने मला जीवन जगणं सोप झालं .

” अगं , सुनीता जेवायचं नाही काय आज ?. चल मलाही वाढून दे आणि तुझंही वाढून घे . चल लवकर , जाम भूक लागलीय मला ” ” होय चला , जेवण करून घेऊ या . “

सुनीता रिलॅक्स , अगं वाटेल दोन चार दिवस मनाला रुखरुख  , रोजचं जीवनचक्र बदललं कि होतो हा त्रास. सेवानिवृत्त झालं म्हणजे आपण निकामी झालो असं नाही . उलट आता आपला हा वेळ स्वतः साठी ठेवायचा .स्वतःसाठी जगायचं .आपल्या इच्छा पूर्ण करायच्या , आपले छंद जोपासायचे “Life begins at sixty my dear “.

दुपारच्या वामकुक्षीसाठी मी विसावले . झोप येत नव्हती म्हणून टी. व्ही . लावला . कोणत्यातरी चॅनेलवर आध्यात्मिक प्रवचन सुरू होते ” हा संसार मोह मायेने व्यापलेला आहे .या मायाजालातच माणूस फसत जातो व हे माझं , हे माझं ची वीण घट्ट होत जाते . माणसानं प्रेम करावं किंबहुना हे जग प्रेमानंच जिंकता येतं पण प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात . जवळकीतूनच दुरावा निर्माण होतो . म्हणून कोठे थांबायचं हा निर्णय घेता आला पाहिजे . साधं पक्ष्यांचंच उदाहरण बघा ना , पिल्लं मोठी झाली , भरारी घेतली कि स्वतंत्र होतात .तसंच माणसांचंही आहे . वानप्रस्थाश्रम ही संकल्पना हेच तर सुचविते .

नवीन पिढीला त्यांचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं . वृद्धांनीही आपली मते त्यांना द्यावीत पण लादू नयेत.नवीन बदल , नवीन विचारांना संमती आनंदाने द्यावी.निसर्गाचं चक्रही हेच सांगतं . शिशिरात पानगळ होणारचं . जर पानगळ झालीच नाही तर नवपल्लवी फुटणार कशी ? माणूसही यापेक्षा वेगळा नाही .वृद्ध , जर्जर शरीर जीर्ण पानासारखं गळून पडणारचं. पंच तत्वानं भरलेलं हे शरीर शेवटी पंचतत्वात सामावून मोक्षाला जाणारचं .वेळीच ही अलिप्तता ज्याला कळली तो भाग्यवानच ,.कारण मायेच्या , मोहाच्या जाळ्याला त्यानं भेदलेलं असतं .सर्व येथे सोडून वैकुंठागमन करणं सोपं होतं मग “

“होय आता आपणही अलिप्त झालं पाहिजे .निरोगी तनाबरोबरच निरोगी मनासाठी हलकासा व्यायाम , निसर्गात रमणं , आपले छंद जोपासणं आणि संवाद साधत माणसं जोडणं कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या या जगात .” नकळत माझ्या ओठांवर हास्य आलं होतं . आरशात डोकावले तर चेहरा प्रफुल्लित झाला होता . चित्तवृत्ती फुलल्या होत्या .

— समाप्त — 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments