श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : चंद्रनागरीचा शब्द (काव्यसंग्रह)

कवी : प्रा. अशोक दास

प्रकाशक : तेजश्री प्रकाशन

प्रथमावृत्ती: ११|१२|२०२३

मूल्य : रु. १५०

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द प्रा. अशोक दास यांच्या ‘ चंद्रनागरीचा शब्द ‘ या काव्यसंग्रहाची सुरूवातच ‘ वारीस जाऊ चला ‘ या भक्ती काव्याने होते. इथून पुढे शब्दांच्या सहवासात वाटचाल करताना या मार्गावरूनच आपल्याला जायचे आहे असेच जणू काही कवीला सुचवायचे आहे. कवीच्या घरातील धार्मिक वातावरण व त्यातून झालेली सांस्कृतिक जडणघडण यांच्या प्रभावामुळे कवीच्या अनेक रचना या सात्त्विकतेने ओथंबलेल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते. ‘संतांची अमृतवाणी’ आपले जीवन घडवण्यासाठी वाट दाखवत असते याची जाणीव कवीला आहे. तोच वारसा पुढे चालू रहावा म्हणून कवीही ज्ञानदेव माऊलींप्रमाणे खळजनांचे मन सुंदर व्हावे आणि पांडुरंगाने सर्वांना सुखी करावे एवढेच ‘ मागणे ‘ मागत आहे. वारक-यांच्या ‘दिंडी’ तून अभंग गात गात जाताना माय मराठी तर धन्य होतेच आहे पण वातावरणच असे भक्तीमय होऊन जाते की ‘ देव सर्वांच्याच मनात ‘ वास करू लागतो. अशा भक्तीप्रवाहात डुंबत असताना सुखदुःखे, अहंकार, काळाचे भान सारे काही विसरून जायला होते आणि नकळत मन ‘ अध्यात्मिक ‘ बनून जाते. विठ्ठलाचे ‘ दर्शन ‘ झाल्यावर नेत्र सुखावतात आणि जन्मोजन्मी हेच मुख दिसत राहो एवढी एकच आस मनाला लागून राहते. पण काही कारणाने वारी घडलीच नाही तर ? तरी काही हरकत नाही. कारण आतून भक्ती करणा-याचा देव पाठीराखा असतो.. चराचरी त्याचे दर्शन होते. आपली दृष्टी विशाल असेल तर ‘ सर्वांठायी पांडुरंग ‘ भेटतो. अशी दृष्टी लाभली की पांडुरंगाच्या ठायी दिसू लागतात  ‘रुपे श्रीरामाची’. त्याच्या विविध गुणांचे दर्शन होते. नकळतपणे सितापती ‘ रखुमापती ‘ बनतो आणि भक्तांच्या अंतःकरणात वास करतो. अशा भक्तांना सुखी करण्यासाठी ‘विठ्ठल आमुचा कैवारी’ आहे याची खात्री पटलेली असते. संतांच्या ‘ भक्तीचा मळा ‘ तर चंद्रभागेकाठी कायम फुललेला असतो. याच ‘ संतांचे स्मरण करावे ‘ आणि त्यांनी शिकवलेल्या धर्माचे पालन करावे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून अवघे ज्ञान साठवावे

अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अनेक कविता आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. कवीचा पिंड त्यातून दिसून येतो. डाॅ. वासमकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कवीचे व्यक्तीमत्व त्याच्या कवितेतून प्रतिबिंबित होत आहे यात शंकाच नाही.

या संग्रहातील भक्तीमय काव्य रचना जशा लक्ष वेधून घेतात तशाच निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दास सरही त्याला अपवाद नाहीत. पावसाच्या थेंबामुळेच बीज अंकुरत आहे आणि हिरवाई भराला येणार आहे. ‘समृद्धीचा सागर ‘ पावसाच्याच हाती आहे. अशा पावसाची फार वाट पाहणे शक्य नाही. जीवघेणी प्रतिक्षा सहन होत नसल्यामुळेच कवी बरसण्यासाठी ‘पावसास आवाहन’ करीत आहे. नंतर कोसळणा-या या पावसात आपल्याच तो-यात नाचताना कवी फुलांच्या गंधात न्हाऊन निघत आहे. पण नको तेव्हा पडणारा ‘ अवकाळी पाऊस’ शेतात राबणा-याला उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र कवीचे मन उद्विग्न होते. मग तो ‘ वरुणास आवाहन ‘ करतो आणि तांडव थांबवण्याची विनंती करतो.

याच पावसातून उगवलेल्या झाडांकडे जेव्हा कवीचे लक्ष जाते तेव्हा कवीच्या हे लक्षात येते की ‘ झाडे ‘ म्हणजे निसर्गातील संतच आहेत. निरपेक्षपणे देत राहणे, स्पर्धा न करता आपला ध्यास जपत राहणे, दुस-याच्या प्रगतीत आनंद मानणे असे सगळे सद्गुण कवीला झाडांच्या ठायी दिसतात. यातून कवीच्या दृष्टीचे वेगळेपण दिसून येते. जगाव कसं हे शिकवणा-या या झाडांतून मग कुठेतरी डवरलेला, बहरलेला पारिजात दिसतो. आभाळाचे दान लाभलेला हा पारिजात जेव्हा मातीस्तव फुलून येतो तेव्हा आपले मनही विरक्तपणे त्या सुगंधी सौंदर्याचा आस्वाद घेते. असा हा पारिजात श्रावणाशिवाय कसा डवरेल ? कवीला तर ‘ श्रावण म्हणजे अवघा उत्सव ‘ वाटतो. रंग गंधाच्या या मासाचे कवीने केलेले चित्रण त्यातील ध्वनीसह डोळ्यासमोर श्रावणमास उभे करते. ऊनपावसाच्या जरतारी सरी लेवून येणारा हा मांगल्याचा मास कवीचा ‘ लाडका श्रावण ‘ होऊन जातो. असा निसर्ग काव्यातून उभा करता करता कवीची शब्द फुलांची बागही फुलून येते आणि सा-या परिसरात शब्द गंध पसरुन राहतो.

असा निसर्ग डोळेभरून जो पाहतो आणि संतांची शिकवण मनात साठवून ठेवतो, त्या कवीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल ? ऋतूच्या रंगांनी निसर्ग बहरावा तसे कवीचे जीवनही सुखदुःखाच्या ‘ ‘ऋतरंगा’नी रंगून गेले आहे. आलेल्या सर्व ऋतूंना अंगावर झेलत कवी ‘ आयुष्य ‘ नावाच्या नव्या ऋतूलाही सामोरा जात आहे. ही ताकद कुठून येते. निसर्गच तर शिकवतो, फक्त शिकून घ्यायला पाहिजे. ‘श्रावण’सरीत न्हाऊन निघणारा प्राजक्त विरक्ती शिकवतो, मनाची निर्मळता शिकवतो. दुस-याच्या जीवनात सुगंध पेरायला शिकवतो. आपल्या दुःखाचा बाजार न मांडता दुःख खांद्यावर घेऊन चालण्याचा आणि इतरांना आधार देऊन त्यांच्यासाठी सावली बनण्याचा ‘ धडा ‘ आत्मसात ‘ केल्याशिवाय मनाची एवढी तयारी होऊ शकत नाही. ‘ कालचक्रा ‘ च्या फे-यामध्य गेलेल्याचा, सरलेल्याचा शोक न करता निसर्ग नियम समजून घेऊन कालक्रमण करत राहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. फुलांच उमलणं आणि कोमेजणं समजून घेऊन त्यांच्याप्रमाणं आपल जीवन सार्थकी लावावं. सुख दुःखाच्या लहरी येतील आणि जातील, आपणच आपल्या आयुष्याच गणित सोडवायचं असतं.

भक्तीच्या मार्गाने आणि निसर्गाच्या सहवासात जीवनाचा अर्थ शोधत असताना कवीचे भवताली घडणा-या घटनांकडेही लक्ष आहे. सत्ता, संपत्ती, स्वार्थ यांत गुरफटलेल्या समाजात संयम आणि सत्य यांना मात्र फारसे स्थान नाही. एकीकडे युगपुरुषांचा

जयजयकार करत दुसरीकडे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारे नेते पाहिले की कवीचे मन विषण्ण होऊन जाते. गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतक-याला मदत करण्याचे नाटक करतानाही एकमेकांशी स्पर्धा करणारे पुढारी केवळ खुर्चीसाठी पळापळ करत असतात हे जनतेने आता ओळखले आहे. मतांचा जोगवा मागायला झुंडीने येणारे पुढारी हे लोकांचे तारणहार होऊच शकत नाहीत. सत्ता ही उपभोगासाठी नसते तर ते सेवेचे फक्त साधन असते हे यांना कधी समजणार ? तरीही कवी आशा सोडत नाही. कृतीशून्य सत्तांधाना फेकून देऊन नवी नीती घडवणारे नवे नेते, नवे राष्ट्रपुरुष जन्माला येतील अशी कवीला खात्री आहे. समाजातील आपपरभाव नष्ट करुया आणि एकमेकांचे मैत्र बनून राहुया हे कवीचे स्वप्न आहे. सर्वांची ताकद एकवटली तर मानवतेचे मंदिर उभारणे अशक्य नाही. या संग्रहातील गारपीट, झुंडी, सारे सारे आपुले, मानवतेची मंदिरे, ठेकेदार, नवे नेते नवी नीती या कवितांतून कविच्या सामाजिक जाणीवा स्पष्ट होतात.

या संग्रहात ‘ मैत्री ‘ चा चंद्रमा आहे. ‘ गुरुजनांच्या’ आठवणी आहेत. ‘ संस्कारशील घरा ‘ चे चित्र आहे. अनंत काळ सर्वांचे हित होत राहो अशी प्रार्थना आहे. प्रत्येकाचे मन आभाळाचे झाले तर विश्व सुखी व्हायला वेळ लागणार नाही हा आशावाद आहे. शहिदांचे मनोगत आहे अन् दीपाचेही मनोगत आहे. कवी बादासाहेबांच्या कार्याचा गौरवही करतो आणि आईच्या आठवणी मनात बाळगत तिच्या नसण्याच्या दुःखाने हळवाही होत आहे. तो कधी जगाच्या पसा-यापासून दूर जाऊन आत्ममग्न होतो तर कधी बालकांच्या समवेत गीतांमध्ये रमून जातो. हे सगळे कशामुळे शक्य होते ? केवळ शब्दांनी इमानाने साथ दिली म्हणून. एकप्रकारे ‘ शब्दांतूनच आयुष्य कहाणी ‘ सांगण्याची किमया कवीला साधली आहे. कवी खुल्या दिलाने मान्य करतो

 “शब्दांनीच जगण्याचे बळ दिले

 शब्दांनीच रस्ता ही दाखविला

 शब्दांनीच, आतल्या आत 

 रडताना

 आपसूक डोळे पुसण्याची क्रिया

 केली “

कवितासंग्रहातील अनेक कविता मुक्तछंदातील असल्या तरीही काही कवितांमधून उत्तम लय साधली आहे. संतांची अमृतवाणी, पारिजात मी, पाऊस, मैत्री, शोध या कवितांचा त्यादृष्टीने उल्लेख करावा लागेल. काही काव्यपंक्तीही उल्लेखनीय वाटतात. उदाहरणार्थ —- समृद्धीचा सागर पावसाच्या हाती, आयुष्य नावाचा ऋतुरंग, सत्ता सेवेचे केवळ साधन असते, इत्यादी. काही शब्द कदाचित सदोष छपाईमुळे अशुद्ध स्वरुपात छापलेले दिसतात. परंतू निरभ्र मुखपृष्ठावरील पूर्णचंद्र आणि अंतरंगातील शब्दांचे चांदणे मनाला शीतल करते यात शंकाच नाही. पूर्णचंद्राच्या प्रकाशात शब्दाचे हे चांदणे जास्त जास्त पसरत राहो एवढीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments