सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग : अहिंसा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर 

सर्व तयारी करून  आम्ही पार्टीसाठी निघण्याच्या बेतात होतो. स्वयंपाकघराची खिडकी बंद करायला  गेले, तेवढ्यात एक झुरळ उडतउडत आत शिरलं.

झाडू घेऊन मी त्याला झोडपलं. मेलं ते. ते मेल्याची खात्री करून घेतल्यावर त्याला कागदात बांधून  पुडी करताकरता माझ्या मनात आलं, ‘बिचारं घरात शिरलं, तेव्हा त्याला  कल्पनाही नसेल की दोन मिनिटात  मृत्यू त्याच्यावर  झडप घालणार आहे. शेवटी त्यालाही स्वतःच्या जीवाची किंमत असणारच ना !मला अधिकार आहे का त्याचा  जीव घेण्याचा?’ मला  अशा वेळी नेहमी वाटतं, तसंच खूप अपराधी वाटलं. पण माझाही नाईलाज होता. मी त्याला ‘सॉरी ‘म्हणून  पुडी कचऱ्याच्या डब्यात  टाकली.

पार्टीत यांनी, नुकतीच बदली होऊन आलेल्या एका सहकाऱ्याशी माझी ओळख करून दिली. तेवढ्यात यांना कोणीतरी हाक मारली, म्हणून  हे तिकडे गेले.

त्याचा पहिला प्रश्न :”तुमी  नॉनव्हेज खाता का?” त्याने सगळं सोडून  हे विचारणं, तेही ओळख झाल्याझाल्या, मला  विचित्र वाटलं.

पण मी त्याला उत्तर दिलं. माझं ‘नाही ‘हे उत्तर ऐकताच  त्याला एवढा प्रचंड आनंद झाला की त्याने मला, दुसऱ्या जिवंत प्राण्याला  खाणं  किती  क्रूरपणाचं, किती अमानुष आहे  वगैरे लेक्चर  द्यायला  सुरुवात केली.

“अहो, पण नॉनव्हेज  खाणारे लोक काय जिवंत प्राण्याला उचलून थोडंच  तोंडात टाकतात?”

पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता.

“आम्ही लोग ना मॅडम, जमीनच्या खाली  उगलेल्या भाज्यापण नाय खाते. म्हणजे बटाटा, रतालू…. काय हाय? तेच्याबरोबर जमीनच्या आतले  किडे येएल ना? ”

“पण त्या भाज्या तर आपण धुऊन  घेतो ना? मग किडे पोटात  कसे जाणार? ”

“पण पानीमध्ये ते मरून जाएल ना? ”

“आणि मला एक सांगा सर, जमिनीच्या वर  उगवणाऱ्या भाज्या  खाता तुम्ही? ”

“हो. ”

“पण मग त्यांच्यात पण जीव असतोच ना? सजीवच असतात त्या. भाज्या, फळं….. ”

“नाय म्हंजे…  तेंच्यातला  जीव दिसून येत नाय ना. किडे कसे हलतात!”

मग त्याने एकदम त्याच्या हायर ऍथॉरिटीला संभाषणात खेचलं.

“आमचे स्वामी हाय ना, ”  इथे त्याने हात जोडून नमस्कारही केला, “ते  चालताना पायामधे चप्पल, शूज कायपण नाय घालते. कारण तेच्याखाली किडे येएल, तर ते मरेल ना!”

तेवढ्यात पुन्हा  स्टार्टर्स आले. याने त्याला  सतरा प्रश्न विचारून त्यातल्या एका पदार्थाचे तीन -चार तुकडे घेऊन  चवीने खाल्ले.

आजूबाजूचे सगळे पापकर्म करताहेत आणि याच्या चेहऱ्याभोवती मात्र तेजोवलय आलंय, असा मला भास झाला.

“मी तुम्हाला एक विचारू, सर? ”

“विचारा ना, मॅडम. ”

“म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. ”

“नाय. बोला. ”

“तुम्ही तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल करून घेता? “माझ्या डोक्यात मघासपासून वळवळणारा किडा या निमित्ताने बाहेर पडला.

“पेsस्ट कंsट्रोल? ”

“हो. पेस्टकंट्रोल.तुम्ही घरात करून घेता? ”

“पेस्टकंट्रोssल….” त्याने आवंढा  गिळला आणि मग उत्तर दिलं, “पेस्ट कंट्रोल……. करतो ना.  ते तर करायलाच  लागतो. दुनियादारी हाय ना !”

माझ्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव बघितले आणि “बॉसला तर अजून  भेटलाच नाय, “असं काहीतरी पुटपुटत त्याने तिथून काढता पाय घेतला.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

अहिंसा….छान आरसा