? जीवनरंग ❤️

☆ पैठणी ☆ सुश्री अपर्णा देशपांडे ☆

काशीनाथ  ला आज कशाचच भान नव्हतं.  संतोष ने दोनदा हाक मारली, पण काशीनाथ भान हरपुन  कामात गढला होता. हे त्याचं नेहमीचंच होतं. एकदा का कटला चालवायला सुरुवात केली की धाग्याशी नाते  विठ्ठल साधी झालो एकरूप  घेतली समाधी ।।

असं होई.  संतोष ला किमान जेवणाचं भान असे, पण काशिनाथ म्हणजे…

 “ए काशी s, फोन आहे तुझा.” कुणीतरी ओरडलं, तसा काशी सगळं टाकून पळाला.  क्वचित कधी नर्मदा  फोन करत असे. 

“हॅलो, बोल”

“तुम्हाला  कसं कळलं की मीच हाय म्हणून ?”

“येडा बाई, मला दुसरं कोण फोन करणार ?  जेवण झालं माझं. काळजी करू नको “

” इतकं खोटं ?  जातांना डबा ओसरीवर विसरून गेलात, आन जेवलो म्हणे. घ्या माझी आन…घ्या न !……म्हाईतेय मला उपाशी हाय म्हणून. डबा पाठवलाय  सदाभाऊ संग. खा आता !  ठेवू फोन?”

इकडं तिकडं बघत काशी म्हणाला,

“कशी माझी गुणी बायको ती, येतांना गजरा आणतो काय..”

“नको बाई, उगा चार रुपये डोक्यात माळायचे ते! तुम्ही या वेळेत बस!

ठेवा आता फोन. पोरगी ऐकल. मनल, बा येडा झाला का काय. “

गालातल्या गालात हसत फोन ठेवून काशी वापस फिरला.

काटकसरीने कसा बसा एक मोबाईल घेतला होता, तो काशी ने नर्मदा कडेच ठेवला होता. तिला जमेल तेव्हा तीच  फोन करत असे.

उत्तमोत्तम रेशमाच्या  एक्सलुझिव्ह साड्या विणायचे  अत्यंत कुशलतेचं काम काशी आणि संतोष कडेच येत असे.  मोठ्या शहरातील शाही मंडळींसाठी, नेत्यांसाठी, सिनेमातील लोकांसाठी काशीच्या शेठ कडे पैठण्याची  मागणी होत असे.

इतर काम कारागीर करत, पण काठ आणि पदराचे खास काम मात्र ह्या जोडीकडेच यायचे.

कलश, कमळ, मोर, पोपट ह्या नेहमीच्या नक्षीकामा पेक्षा काहीतरी वेगळं आणि मनमोहक  डिझाईन  तयार करण्याचं एक अजब कसब होतं काशिकडे. ह्या त्याच्या कौशल्यावर नमू फिदा असे. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान होता. ज्याला त्याला नवऱ्याचं कौतूक सांगत फिरायची ती.

काशीचं  मन मात्र आतल्या आत फार जळत राही.  लाख लाख रुपयांच्या पैठण्या विणतो आपण, पण घरच्या लक्ष्मीला शंभर रुपयाची नायलॉनची साडी नसावी लागते…ती कधी म्हणत नाही, पण….

फार वाईट वाटे त्याला.

आज काशी घरी आला तोच अतिशय  हरवल्या सारखा.

हात पाय धुवून आत आल्या बरोबर नमूने ओळखलं. तो मान खाली घालून जाजमावर जेवायला बसला.

“तू पण जेव न.”

“तुमच्या मनातील खळबळ भाईर काढा आधी. मग मी जेवते.”

तिने खूप हट्ट केल्यावर काशीने आपल्या मनातील सल  उघड केली.

नमू  हसायला लागली.

” आता हसायला काय झालं तुला ?”

” हसू नको तर काय करू ? काल शारदा सांगत होती, ती जयश्री नटी हाय न ? ती हो, कायम हातभर जरीच्या काठाची साडी नेसुन फिरते ती, नवऱ्यानं विष घालून मारला म्हणे तिला. सांगा आता. ती दोन लाखाची साडी जीव वाचवती का तिचा ?

मला काय कमी हाय ? जीव ओवाळणारा नवरा दिलाय देवानं, उगी त्या जीवाला जाळू नका,सांगून ठेवते!..जेवा आता मुकाट.”

“आय लव्ह यु नमु.” तो म्हणाला,अन

कसली लाजली नमू .  म्हणाली,

“आत्ता !!  इंग्रजीत प्रेम ?  जेवा गुमान”

मुंबई च्या कुणा धनाढ्य आसामी च्या मुलाचं लग्न होतं. त्यांची साठ पैठण्याची मागणी होती. त्यासाठी शेठ ने बरेच नवीन कामगार आणले होते. प्रत्येक पैठणी दुसरी पेक्षा वेगळी दिसावी आणि त्यातही दोन तर अप्रतिम

कारागिरीचा नमुना असाव्यात हे शेठ ने

नमूद केलं होतं. सगळे नवीन नवीन डिझाइन्स काशी ने तयार करवून दिले.

 साहेबांच्या पत्नी आणि सूनबाईंची पैठणी विणायचं काम खास काशी संतोष ने आपल्याकडे घेतलं होतं. 

आता रात्रंदिवस  एक करून

युद्धपातळीवर कामं सुरू होती. नमू पण  केंद्रावर यायला लागली. काशी च्या जेवणाची काळजी घेणे, शटल लावून देणे, बॉबीन भरून देणे, सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था बघणे हे काम तिने स्वतः कडे घेतलं.

तिच्या समर्पणा कडे बघून काशी ला गलबलून येई.

म्हणायचा, 

“तू काहीही  म्हण नमे, एक दिवस तुला भारी पैठणी नेसवेलच मी.बघ तू. “

“येड लागलं का वो तुम्हाला ? कसं सांगू आता  या खुळ्या नवऱ्याला ?”  ती हसून म्हणे.

तीन चार महिन्या नंतर एक दिवस काशी रात्री उशिरा घरी आला.

नमू वाटच बघत होती. त्याने हळूच मागे लपवलेला गजरा पुढ्यात ठेवला.

“आता ग माय ! मोगरा ? कशाला वो पैसा घालता ह्याच्यात?”

काशी च्या डोळ्यात पाणी आलं.

“ह्या डोळ्यातल्या पाण्या परिस तो घालून द्या तुमच्याच हातानं डोक्यात.”

तिने  पाठ फिरवली.  त्याने  गजरा माळला, आणि हातातील पुडकं समोर केलं.

तिने उघडून बघितलं. ती एक हिरव्या रागाची अप्रतिम पैठणी होती.

या आधी तिने नेसणं  तर दूर, कधी हात पण लावला नव्हता पैठणीला. डोळ्यातील पाणी त्यावर पडू नये म्हणून चटकन तिने आपल्या साडीचा पदर त्यावर पसरवला.

“डाग पडला, तर शेठ रागावतील हो तुम्हाला. उद्या वापस द्यायची असंल न ?”

“काय करू तुझं, येडा बाई, तुला आणलीये ही !”

तिच्या चेहऱ्यावर चे भाव बघून म्हणाला,

” मुंबई च्या मॅडम आल्या होत्या.  त्यांनी निवांत सगळ्या साठ पैठण्या  बघितल्या. इतक्या म्हणजे इतक्या खूष झाल्या, की एक मला अन एक संतोष ला आपल्या हातानं  भेट दिली…..आहेस कुठं?”

भरल्या डोळ्यानं  नमु नं दृष्ट काढली त्याची.

पैठणी नेसून समोर उभी ठाकलेली नमू त्याला रखुमाई चं रूपच वाटली.

त्याने आत्यंतिक प्रेमाने तिला जवळ घेतले. कसली लाजत होती ती ! मग अचानक म्हणाली,

“एक बोलू ? रागावनार न्हाई न ?”

“बोल की ! “

“आज नेसून मग ठेऊन देऊ का पेटीत ? “

त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली,

“पाच सात वर्षात लगीन करू पोरीचं, मग लग्नात नेसवू की तिला, तुम्ही बनवलेली पैठणी!”

तो फक्त डोळे भरून तिच्या ह्या लोभस रुपाकडे बघत राहला.

© अपर्णा देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments