सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

(१) मिल्कपॉट आणि  (२) नुकसान – श्री सीताराम गुप्ता (३) अनोखी पद्धत – सुश्री मधूलिका सक्सेना ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

तीन अनुवादित लघुकथा……

☆ (१) मिल्कपॉट ☆

आज जवळ जवळ एक आठवड्यानंतर घरात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. अरुण प्रकाशाचा मुलगा अमोल, सून आभा आणि दोन वर्षाचा नातू प्रणव उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी थंड हवेच्या ठिकाणी गेले होते. ती नसल्यामुळे घर कसं उजाड वाटत होतं. मुलांशिवाय कसलं घर? मुले खोड्या करत नसतील, तर घर, घर वाटतच नाही मुळी. मुलं आपली ट्रीप संपवून घरी परत आली आणि छोटा नातू प्रणव घराला पुन्हा घर बनवण्याच्या मागे लागला. तो येताच त्याच्या खोड्या सुरू झाल्या. सूटकेस आणि बॅगेमधील समान काढून तो बाहेर टाकू लागला. सामान काढता काढता त्याच्या हाताला एक गोष्ट लागली आणि ती दाखवण्यासाठी तो आपल्या आजोबांच्याकडे पळत पळत निघाला. त्याच्या हातात सुरेख असा मिल्क पॉट होता. अरुण प्रकाशला समजायला वेळ लागला नाही. त्यांनी आपल्या मुलाला म्हंटलं, ‘हा हॉटेलचा वाटतोय. ‘

‘होय बाबा, हा हॉटेलचाच आहे. ‘

ते ऐकून अरुण प्रकाशला आतल्या आत भूकंप झाल्यासारखं वाटलं. ते काहीच बोलले नाहीत. शून्यात बघत बसले. त्यांना वाटलं, मुलाने येताना तो पॉट उचलून आणलाय. असं काही घडलं, की त्यांना वाटतं, आपण केलेल्या संस्कारात काही कमतरता राहिलीय आणि ते स्वत:ला दोषी मानू लागतात. त्यांना दु:ख होतं.

नातवाच्या हातात हॉटेलचा मिल्क पॉट बघून त्यांना अंगात जाळ उठल्यासारखं वाटू लागलं. त्यांचं मन तडफडू लागलं.

वडलांच्या मनातील भाव मुलाच्या लक्षात आला. तो म्हणाला, ‘बाबा, दहा हजार रुपये रोजचे खोली भाडे होते. ’

तशी अरुण प्रकाश स्पष्टपपणे म्हणाले, ‘ एवढा खर्च करूनही शेपन्नास रूपायासाठी तू आपलं स्वत्व घालवलंस?’

मुलगा अमोल थेटपणे वडलांकडे बघत म्हणाला, ‘तुम्हाला वाटतं, तसं नाही आहे बाबा! आम्ही हा मिल्क पॉट उचलून आणलेला नाही. ‘चेक आऊट’च्या वेळी आपला लाडका नातू प्रणव हातातला मिल्क पॉट सोडेना, तेव्हा मी त्याची किंमत हॉटेल मालकाला देऊ केली, पण त्यांनी पैसे घेतले नाहीत. हा पॉट, आमच्यातर्फे या छोट्याला भेट, ’ ते म्हणाले. गिफ्ट म्हणून त्यांनी हा पॉट प्रणवला दिलाय.

आपल्याला वाटतय, आम्ही हॉटेलमधून हा पॉट उचलून आणला, पण तसं नाही आहे बाबा!’

अरुण प्रकाशने सुटकेचा श्वास सोडला. ‘नाही… नाही… मी दोषी नाही. ’ते मनातल्या मनात म्हणाले. ‘मी माझ्या मुलांनावर योग्य संस्कार केले आहेत. माझी मुलं कधीच चुकीचं वागणार नाहीत. ‘ त्यांना इतकं समाधान वाटलं, वाटलं, कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळालीय.

मूळ कथा – ‘मिल्क पॉट’

मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता, दिल्ली

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

☆ (२) नुकसान ☆

डॉ. विश्वास यांचा आज या नव्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता. मागच्या आठवड्यातच त्याची एम. डी. पूर्ण झाली होती. एका आठवड्यातच त्याला सरकारी हॉस्पीटलमध्ये नोकरी मिळाली होती. हॉस्पिटलमधून परतल्यावर विश्वास मोठा खुशीत दिसत होता. त्याला खूश पाहून त्याचे आई-वडील, बहीण सगळ्यांनाच आनंद झाला. बहीण म्हणाली,

‘दादा, वाटतय, नवी नोकरी आणि हॉस्पिटलचे वातावरण तुला खूप आवडलेलं दिसतय. ‘

‘ते तर आहेच, पण माझ्या खुशीचं आणखीही एक कारण आहे. ’  विश्वास म्हणाला.

‘काय?’

आता तो काय सांगतोय, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती.

विश्वास म्हणाला, ’ आज पाहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान झालं!’

‘कसं?’ सगळेच एकदम म्हणाले. आई म्हणाली, ‘नुकसान झाल्यावर कुणी खूश होतं का? ‘

‘असं घुमवत फिरवत बोलण्याऐवजी सरळ सरळ सांग ना, काय झालं? मोबाईल हरवला. खिसा कापला गेला? नुकसान कसं झालं?’ वडलांनी प्रश्नांची फैर झाडली.

‘नाही… नाही… आपण घाबरू नका. असं काहीही झालेलं नाही. ‘ विश्वास सगळ्यांना आश्वस्त करत म्हणाला.

‘आज एनजीओने एका फॅक्टरीवर छापा मारला आणि तिथे काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना सोडवले. त्या मुलांच्या वयाची तपासणी करण्यासाठी पोलीस त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. त्याच वेळी एक माणूस माझ्या केबीनमध्ये आला आणि टेबलावर काही पैसे ठेवत म्हणाला, ‘हे दहा हजार रुपये आहेत. हे आपण आपल्याजवळ ठेवा आणि असा रिपोर्ट लिहा, की सगळी मुले पंध्रा वर्षाच्या वर आहेत. ’

पण त्या मुलांपैकी कुणीच चौदा वर्षाच्या वर वाटत नव्हता. अनेक जण दहा – बारा वर्षाचीच वाटत होती. त्यांची परिस्थिती बघून मला अतिशय वाईट वाटलं. मी नोटांचं बंडल उचलून त्याच्या हातात देत, त्याला ताबडतोब बाहेर निघून जायला सांगितलं. ’

तो म्हणाला, ‘ डॉक्टरसाहेब, तुम्ही म्हणाल तितके पैसे देतो. ‘ तो खिशात हात घालू लागला. मला राग आला. शेवटी शिपायाला सांगून त्याला धक्के मारून बाहेर काढलं.

‘जे खरं वय होतं, तोच रिपोर्ट मी लिहिला. नेमक्या वयाची खात्री करण्यासाठी, ऑसिफिकेशन टेस्टसाठी केसेस पुढे पाठवल्या. ’

सगळी घटना विस्तारपूर्वक सांगून  विश्वासने कृत्रीम गंभिरता धरण करत म्हंटलं, ’मग झालं ना पहिल्याच दिवशी दहा हजाराचं नुकसान. ‘

वडील म्हणाले, ‘बेटा, असं नुकसान रोज रोज करत जा आणि आम्हाला सांग. मी खरोखरच खूश आहे, की माझी मुले नुकसान करायला शिकताहेत. असं नुकसान, हाच आमचा सगळ्यात मोठा फायदा आहे. ’ असं म्हणत वडलांनी आपला हात विश्वासच्या डोक्यावर ठेवला आणि विश्वासने आपले डोके त्यांच्या खांद्यावर ठेवले.

मूळ कथा – ‘ नुकसान ‘  

मूळ लेखक -सीताराम गुप्ता, दिल्ली.

अनुवाद – उज्ज्वला केळकर

☆ (३) अनोखी पद्धत ☆

‘काय चाललाय काय तुझं अंकित?’

‘काही नाही ग… ’ त्याने रेवाचं बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला

‘सारखा सारखा मागे पडतोयस. ’ रेवाच्या बोलण्यात तक्रारीचा सूर होता.

‘येतोय ना!’ अंकित पुन्हा म्हणाला.

‘ओहो…. मोठ्या मुश्किलीने बरोबर फिरायला म्हणून बाहेर पडलो. माझ्याबरोबर चल ना!’ रेवा काही बोलणं सोडत नव्हती.

‘अग, येतोय ना!’

‘आता बागेची, रस्त्याची साफ-सफाई पण तुम्हीच करणार का?’

‘हं…. ’ अंकितने जमिनीवरचे कागदाचे तुकडे उचलत म्हंटलं.

‘आता चार तुकडे झाडीत पडून राहू देत नं! सफाईचा तर तुला जसा मॅनिया आहे. ’

रेवा वैतागली.

‘ही काही सफाई नाही. ’ अंकित म्हणाला.

‘मग काय आहे?’

‘सफाई नाही तर काय आहे अंकित? मी आत्ताच पाहीलं, जमिनीवरून उचललेले ते कागदाचे तुकडे तू आपल्या बॅगेत भरलेस….. कुणाचं प्रेमपत्र मिळालं की काय? मला तरी सांग. ‘ रेवाने चिडवले.

‘तसंच समज. ’ अंकितने संक्षिप्त उत्तर दिलं.

‘कसला विचार करतोयस?’

‘ये. स्कूटरवर बस. ’ यावेळी रेवा काही न बोलता स्कूटरवर मागे बसली.

दहा मिनीटानंतर अंकित एका घरापुढे थांबला आणि दारावरची बेल वाजवली. दोन-तीन वेळा बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला गेला.

‘बोला, कुणाला भेटायचय?’

‘रमेशजी… ’

मीच रमेश…. बोला. काय काम आहे?’

‘या १२ एप्रील २०१५ आणि १६ नोहेंबर २०१८च्या पावत्या आपल्याच आहेत?’

‘अं… हो. पण आपल्याकडे कशा आल्या?’

‘आणा. एक हजार रुपये आणा. ’

‘साहेब, हा माझ्यासाठी कचरा आहे. आपणच ठेवून घ्या. ‘ रमेश काहीशा बेफिकीरीने म्हणाला.

‘मग कचरा गाडीत टाकायचं सोडून आपण हा कचरा झाडीत का फेकलात?’

‘काय म्हणायचय आपल्याला?’ रमेश चिडून म्हणाला.

आपलं ओळखपत्र दाखवत अंकित म्हणाला, ‘मी नगर निगमाचा स्वच्छता अधिकारी अंकित राव!’

मूळ कथा- अनूठा तरीका   

मूळ लेखिका – सुश्री मधूलिका सक्सेना  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments