डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

।। आंधळी माया ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(सावनीचे सगळे लाड आजीने पुरवले ! किती attached होती सावनी आजीला !) इथून पुढे — 

सावनी आजीला दर आठवड्याला फोन करायची गप्पा मारायची.कधी एकटं वाटू दिलं नाही तिनं आजीला! सावनी चं एम एस झालं आणि तिला खूप सुंदर जॉब मिळाला.   दरम्यान आजीही अचानकच कालवश झाल्या!आता अमितवर कोणतीही जबाबदारी उरली नाही. सावनीने बोलावले म्हणून तो अमेरिकेला जाणार होता. अरुंधतीला त्याने हे अगदी कॅज्युअली सांगितले.ती म्हणाली,’ मला आणि आनंदला इथे टाकून तुम्ही लाडक्या लेकीकडे जाणार हो?आम्हाला पण सांगा तिला तिकडे न्यायला!’अमित संतापाने बघतच राहिला.’अरुंधती,शरम वाटते का काही बोलायला?ती तुझीही मुलगी होती ना?काय केलंस ग तिच्यासाठी?सतत हा मतिमंद मुलगा बसलीस सांभाळत आणि आमची आयुष्य उध्वस्त केलीस. बिचारी माझी गुणी मुलगी आजी आजोबांच्या छायेत वाढली!माझे आईवडील नसते तर कठीण होतं बरं तिचं!रहा इथेच,तूआणि तुझा हा लाडका लेक.

मी सावनीकडे जाणारच.कोणत्या तोंडाने म्हणतेस ग आम्ही येतो?शी!स्वार्थीपणाचीही हद्द झाली तुझ्या. आता बोलतोच!पत्नी म्हणून काय सुख दिलंस ग मला हा झाल्यापासून?माझं तरुण शरीर तळमळत असायचं  रात्रंदिवस! सतत हा  मुलगा घेऊन बसत होतीस,मी पण कमी नाही केलंय याच्यासाठी! प्रत्येक गोष्टीला लिमिटअसतेअरुंधती!तुझ्यातली फक्त आईतीही या आनंदची, सावनीची नाहीच ! शिल्लक राहिली आणि माझ्या आयुष्याचे वाळवंट झाले. दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने अमित निघून गेला.

 एअरपोर्ट वर सावनी आणि एक उमदा तरुण आले होते. बाबा,हा शिशिर!माझा कलिग आहे.आम्ही एकत्रच  एम एस केलं.शिशिरला आईवडील नाहीत.तो आत्याकडे इथेच usa मध्ये वाढला. एवढी ओळख पुरे सध्या!’सगळे सावनीच्या फ्लॅट मध्ये आले.किती सुंदर ठेवला होता तिनं फ्लॅट!अमितसाठी सुंदर स्वयंपाक करून ठेवला होता.

जेवल्यावर शिशिर त्याच्या घरी गेला. सावनी  बाबांजवळ बसली’.बाबा,बरे आहात ना?किती  वर्षांनी असे घराबाहेर पडत असाल ना?सगळं होतं हो तुमच्याकडे!हौसपैसा सगळं. पण एकेकाळी हौशी असलेली आई किती बदलली ना! सतत आनंद हेच दैवत झालं तिचं! बरोबर होतं तेही पण तिने  ढोर मेहनत करून तो सुधारणार होता का? ती सगळ्या लोकांपासून तुटत गेली.कधीही तिनं मान्य केलं नाही की हा मुलगा गतिमंद आहे.काय  मेहनत  घ्यायची ती हो बाबा!एकेक अक्षर तिने  शंभर शंभर वेळा शिकवलंय त्याला.पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याची पाटी कोरीच. पण निदान त्या स्पेशल स्कूल मध्ये घातल्याने तिथे सगळी मुलं अशीच असल्याने तो  इतका तरी शिकू शकला. आईने त्याला धडपड करून छोटासा का होईना जॉब मिळवून दिला.  बाबा,या सगळ्यात तुम्हाला फार सोसावं लागलं हो.आणि मलाही.मला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही.तुम्ही आजीनं ती उणीव भरून काढलीत नाहीतर माझं काय झालं असतं बाबा? बाबा,अनेक घरात असं  मूल येतं की जन्माला पण त्याचा कोणी इतका बाऊ करत नाही.शक्य तेवढं  सगळं करतात आईवडील आणि आपलं आयुष्यही सुखात जगतात.आपल्या आई सारखं स्वतःचं आयुष्य गहाण नाही हो टाकत. आईला हे असं मूल म्हणजे तिचा अपमान, कमीपणा वाटायचा.आणि मग मलाही तिने कधीच  न्याय दिला नाही हो. बाबा,मी शिशिरशी लग्न करायचं म्हणतेय.तुम्ही इथे आहात तर आमचं लग्न लावूनच जाल का?मला फार आनंद होईल हो बाबा.आता तर आजीआजोबा ही नाहीत माझं हे कौतुक बघायला. ‘बोलताना पाणी आलं सावनीच्या डोळ्यात.’ अग वेडे,रडतेस कशाला?तुझा बाबा भक्कम उभा आहे तुझ्या पाठीशी.मला खूप आवडलाय शिशिर.उत्तम जोडीदार निवडलास ग बाळा!

तू आता लग्नाची झाली आहेस,हेही अरुंधतीने लक्षात घेतलं नाहीये.पण देव असतो बघ पाठीशी उभा.मी आनंदाने लग्न लावून देईन ग पोरी.आधी बोलली असतीस तर आजीने तुला दिलेले सगळे दागिने घेऊन आलो असतो सावनी! ‘नको हो बाबा,मला काही नको .फक्त तुमचे आशीर्वाद द्या,तेच खूप मोलाचे आहेत आमच्यासाठी!लग्न झाल्यावर मग आईला मी तुम्ही,सावकाश कळवूया.तिला त्याचं काहीच सुखदुःख नसणार बाबा.जाऊ दे.माझे वडील हेच माझ्यासाठी आई बाबा दोन्हीही आहेत असं मी समजत आलेय.’ ठरलेल्या मुहूर्तावर सावनी आणि शिशिरचं लग्न खूप छान थोडक्यात करून दिलं अमितने! शिशिरच्या आत्याबाईही हजर होत्या. लग्न झाल्यावर सावनी  सासरी शिशिरच्या फ्लॅट मध्ये गेली.दुसऱ्या दिवशी सावनी पुन्हा आपल्या घरी आली आणि म्हणाली,’बाबा तुम्ही आता सहा महिने इकडे रहात जा.मी तुमचं ग्रीन कार्ड प्रोसेस करीन.तुम्ही इथेच छानसा जॉब बघा आणि रहा इथेच.तुम्हाला नक्की मिळेल जॉब हो बाबा,आणि पैशासाठी नाही पण मन गुंतावे म्हणून करा तुम्ही जॉब!बघा कसं वाटतंय ते!’ मी आग्रह नाही करत हं पण मला वाटतं तुमच्या बुद्धीचंही इथे चीज होईल आणि खरं तर तुम्हाला त्या घरापासून सुटका मिळेल हो बाबा. सावकाश विचार करा. आत्ता ठरवलंय तुम्ही तसे परत जा आणि मग पुढच्या वेळी याल तेव्हा मला निर्णय सांगा नक्की बाबा!’जड अंतःकरणाने तिचा निरोप घेऊन अमित परत आला पण मनात अतिशय समाधान होते,की सावनीचं भलं झालं.आपल्यालाशोधूनही असा उमदा मुलगा मिळाला नसता तिच्यासाठी!’  अरुंधतीला त्याने लग्नाचे फोटो पाठवले होतेच. चार दिवसांनी अमितने तिला  सांगून टाकलं  अरुंधती, मी सध्यातरी ग्रीन कार्ड होई पर्यंत सहा महिने सावनी कडे राहणार आहे आणि ग्रीन कार्ड नंतर मी तिकडेच राहीन.तुला भरपूर पेन्शन मिळेल आणि मीही तुला  इतके इतके पैसे फिक्स मध्ये टाकून जाणार आहे. याच घरात तुम्ही दोघेही रहा,तू आणि आनंद! मला मात्र आता इथे राहायचं नाही.बस झाला संसाराचा  फार्स.  आणि आता मला  अडवू नकोस.मी जायचा निर्णय घेतला आहे, त्यात बदल होणार नाही.  तू तुझा मुलगा सुखाने रहा इथे’. निर्विकार पणे अरुंधतीने हे ऐकून घेतलं आणि एक शब्दही न बोलता, ती आत निघून गेली. अमित थक्क झाला.निदान, असे जाऊ नका, माझं चुकलं असेलही,हे तिने म्हणावे ही अपेक्षाही चुकीचीच ठरली अरुंधतीच्या बाबतीत!तिने सावनीच्या लग्नाबद्दल अवाक्षर ही काढले नाही.   अमितला अतिशय वाईट वाटले.काय विचित्र योग असतील आपल्या गुणी मुलीचे तिच्या सख्ख्या आईशी,याचं त्याला नेहमीच आश्चर्य वाटलं आलं होतं.ठरलेल्या वेळी अमित  अमेरिकेला निघून गेला.

राहिली ती अरुंधती आणि ज्या मुलासाठी रक्ताचं पाणी केलं तो आनंद.ज्याला तेवढंसमजण्याचीही कुवत नव्हती की आई आपल्यासाठी सगळी नाती तोडून  झिजत राहिली. जन्मभर तोडलेली नाती उतारवयात अरुंधती समोर फेर धरू लागली.आणि सोन्यासारखी मुलगी आपण गमावली तिच्या लग्नालाही तिने   आपल्याला बोलावलं नाही,याचं वाईट  वाटून तरी उपयोग नव्हताच.जसं तिनं पेरलं तसंच उगवलं. या एका मुलापायी नवरा, मुलगी सगळं सगळं गमावून बसली अरुंधती!वेळ निघून गेली होती आणि  आपली  असणारी माणसं तिने स्वतःहूनच परकी केली. अरुंधतीला ही पुढची अत्यंत अवघड वाट एकटीने चालायची होती.आता पश्चाताप करून काय फायदा होता?

तिच्या आईवडिलांनीही तिला किती तरी वेळा सांगितलं होतं,की अग बाई,तू या एका मुलापायी संसार उध्वस्त करतेआहेस.अमित सारखा नवरा आणि सावनीसारखी मुलगी भाग्यानेच मिळते बरं!काय तो आनंद घेऊन बसतेस जवळ सारखी ग!

करायचे ते सगळे प्रयत्न झालेत करून!त्याच्या पायी तू अतिशय अन्याय करते आहेस सगळ्यामाणसांवर.’त्याहीवेळी तिला आईवडिलांचेही पटले नाहीच. आता एवढ्या मोठ्या घरात उरली एकटी अरुंधती आणि हा  खुळा आनंद.वेळ निघून गेली आणि आता परतीचे दोरही स्वतःच कापून टाकलेली अरुंधती त्या भकास घरात एकटी उरली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments