सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-1 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुशांत घरी आला तो रडतच. आधीच त्याला उशीर झाला म्हणून सुधा काळजीत होती. त्यात आणखी हा अवतार.

‘‘अरे, काय झालं? पडलाबिडलास का कुठे?’’

सुशांतनं मानेनंच ‘नाही’ म्हटलं.

मग सुधाने खाली बसून एका हातानं त्याला जवळ घेतलं आणि दुस-या हातानं त्याचे बूट काढले.

‘‘भूक लागली असेन ना? हातपाय धू आणि कपडे बदलून ये पटकन. मी वाढते तोपर्यंत जेवता जेवता सांग काय झालं ते.’’

सुशांत जराही न हलता तसाच रडत उभा राहिला.

मग सुधाच त्याला बाथरुममध्ये घेऊन गेली.

‘‘सांग ना बाळा, काय झालं ते.’’

‘‘आई, आज ना बाईंनी वर्गात प्रयोगाच्या वह्या वाटल्या. त्यात माझी वहीच नव्हती.”

‘‘असं कसं? गेल्याच आठवड्यात तू दिली होतीस ना?”

‘‘हो, पण आज बघितलं तर त्या गठ्ठ्यात माझी वही नव्हतीच. आज तुंगारेबाईंनी सगळ्या वह्या तपासल्या आणि घरी न्यायला दिल्या, त्यांचे रिमार्क बघून काही राहिलं असेल तर पुरं करायचं, कव्हर फाटलं असेल तर नवीन घालायचं आणि उद्या वही शाळेत न्यायची. उद्या दुस-या आणि तिस-या तासाला प्रयोगाची परीक्षा आहे. तेव्हा कोल्हटकरबाई आहेत ना त्या वह्या तपासणार. त्या एवढ्या कडक आहेत नां आई, माझी वही नसली तर वहीचे शून्य मार्क मिळणारच शिवाय प्रयोगाच्या परीक्षेलाही घेणार नाहीत. तुंगारेबाईंनी सगळीकडे शोधलं, पण वही मिळालीच नाही.” सुशांत पुन्हा रडायला लागला.

‘‘आता रे काय करायचं?” सुधाला काही सुचेचना – ‘‘थांब मी बाबांनाच विचारते.”

सुरेशच्या ऑफिसात फोन लागेचना.

‘‘तू अजिबात काळजी करू नकोस, राजा. बाबा नक्की काहीतरी मार्ग काढतील. आपण जेवून घेऊया. मग मी पुन्हा फोन लावते.”

जेवता जेवता मध्येच उठूनही सुधानं दोन-तीनदा फोन लावला; पण प्रत्येक वेळी एंजेगच येत होता.

‘‘बरं झालं बाबा इकडेच आहेत ते,” सुधा परत परत सुशांतला समजावत सांगत होती- ‘‘त्यांना लगेच सुचेल काय करायचं ते. तू गडबडून जाऊ नकोस. बाबा सांगतील तसं करुया आपण.”

लहानपणापासून सुधा तिच्या आज्ञाधारकपणाबद्दल सगळ्यांच्या कौतुकाचा विषय होती. बारीक सारीक गोष्टीसुध्दा मोठ्यांना विचारल्याशिवाय करत नसे ती. आताही ती सगळं सुरेशला विचारुनच करत असे.

पण एकदोनदा पंचाईतच झाली. सुरेश बाहेरगावी गेला होता. आणि अडीच वर्षांचा सुशांत तापानं फणफणला. सुधा घाबरुनच गेली. एवढ्या रात्री काय करायचं? सुरेशही घरात नाही. मग सुधा त्याच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालत बसली. थोड्या वेळानं ताप उतरला. दुस-या दिवशी सकाळी ती त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली.

दोन दिवसांनी सुरेश घरी आल्यावर तिनं सांगितलं, तर तो चिडलाच. ‘‘ताप आलाच कसा? तो भिजला असणार नाहीतर फ्रीजमधलं पाणी प्याला असेल. तुझं लक्ष कुठे असतं? जरा दोन दिवस मी घरात नसलो तर-”

सुधाला खूपच अपराधी वाटलं. त्यानंतर तर ती त्याला डोळ्यात तेल घालून जपू लागली.

नंतर एकदा…

जेवण झाल्यावर पुन्हा सुशांतनं रडायला सुरवात केली. सुधानं पुन्हा एकदा फोन फिरवून पाहिला.

‘‘हे बघ सुशांत, बाबांचा फोन लागत नाहीय. मला काय सुचतं ते सांगू?’’

‘‘सांग.”

‘‘तू आणि जय प्रयोगाचे पार्टनर आहात ना?”

‘‘हो.”

‘‘मग त्याची आणि तुझी रीडिंग सारखीच असणार.”

‘‘हो.”

‘‘तू समोरच्या दुकानातून नवीन वही घेऊन ये. येताना जयची वही आण. त्याचं बघून सगळं परत उतरवून काढ.”

‘पण जयला वही लागेल ना उद्याच्या परीक्षेचा अभ्यास करायला.”

‘‘मग आपण झेरॉक्स काढू या. तू असं कर. सुरवातीची थोडी पानं येतानाच झेरॉक्स करून आण आणि लिहायला सुरवात कर. उरलेल्या वहीची झेरॉक्स मी करून आणते. येताना जयची वही देऊन टाकीन. अर्ध्या तासात वही परत करु म्हणून सांग जयला.”

‘‘अख्खी वही पुन्हा लिहून काढू?”

‘‘तू लिहायला सुरवात तर कर. काय रे? तुंगारेबाई म्हणजे आपल्याला सोमवार बाजाराकडे भेटलेल्या त्याच ना? तिकडेच कुठेतरी राहतात म्हणाल्या होत्या. मी त्यांना जाऊन भेटते.”

‘‘पण त्यांचं घर नक्की कुठंय ते…”

‘‘ते मी शोधून काढीन. पण तू लिहायला सुरवात कर. त्यांनी ‘नाहीच जमणार’ म्हणून सांगितलं तर आपली दुसरी वही तयार पाहिजे. हो की नाही?”

‘‘पण एवढं सगळं कसं लिहून होणार? शिवाय आकृत्यापण आहेत.”

‘‘तू आज खेळायला जाऊ नकोस. आत्ताच वह्या घेऊन ये आणि लिहायला सुरवात कर. एक प्रयोग लिहून झाला, की पेन बाजूला ठेवून हाताचा आणि बोटांचा व्यायाम कर. मागे मी शिकवला होता ना तसा. सहा तासांत नक्की लिहून होईल. लक्षपूर्वक आणि शांतपने लिही. म्हणजे खाडाखोड होणार नाही. शिवाय उद्याच्या परीक्षेसाठी उजळणीही होईल. सुरवात करायच्या आधी डोळे मिटून स्तोत्र म्हण हं.”

झेरॉक्स काढून झाल्यावर जयची वही परत करुन सुधा घरी आली.

‘‘ही बघ उरलेल्या वहीची झेरॉक्स. तू उतरवून काढ. मी तुंगारेबाईंना भेटून येते. जाताना बाहेरून कुलुपच लावते म्हणजे मध्येमध्ये व्यत्यय नको यायला.”

‘‘आई, प्रयोगाचे मार्क आणि बाईंच्या सह्या.”

‘‘मी बोलते त्यांच्याशी.”

पंधरावीस मिनिटं विचारपूस करत फिरल्यावर तुंगारेबाईंचं घर एकदाचं सापडलं; पण बाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. अर्धा तास तरी लागणार होता परत यायला.

मग सुधाने इकडे तिकडे फिरून वेळ काढायचं ठरवलं. वाटेत पीसीओवरुन सुरेशला फोन केला. लगेच फोन लागला; पण सुरेश ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. परत केव्हा येणार माहीत नव्हतं.

‘ठीक आहे. परत आले, की लगेचच त्यांना घरी फोन करायला सांगा.”

थोडीफार खरेदी करत असतानाच तुंगारेबाई येताना दिसल्या. सुधा धावतच गेली.

‘‘तुम्ही तुंगारेबाई ना? मी सुशांतची आई.”

‘‘सुशांत म्हणजे प्रयोगाची वही…”

‘‘हो, हो, बाई, सुशांतने त्याची वही तुमच्याकडे दिली होती.”

‘‘अहो, पण आज मिळाली नाही ना.”

‘‘पण त्याने दिली होती ते तुम्हाला आठवतंय ना?”

‘‘तसं दिल्याचं आठवत नाही; पण ज्या दिवशी मी वह्या गोळा केल्या त्या दिवशी सुशांत शाळेत आला होता आणि वह्या न दिलेल्या मुलांच्या यादीत त्याचं नाव नाही. म्हणजे त्याने वही दिली असणार. पण मला मिळालीच नाही ना आज. त्याला शाळा सुटल्यानंतर थांबवून मी माझे ड्रॉवरपण तपासले. उद्या मीच वह्या तपासणार असते तर गोष्ट वेगळी होती.”

‘‘तुम्ही हे कोल्हटकरबाईंना सांगू शकत नाही का?”

‘‘मी सांगून बघीन. पण त्या ऐकतील की नाही ते मी कसं सांगू?”

‘‘मी आता जाऊन भेटू का त्यांना?”

‘‘नको नको. त्या आणखी वैतागतील.”

‘‘बरं, मी एक विनंती करते तुम्हाला. जय त्याचा पार्टनर आहे प्रयोगातला. मी त्याची वही बघून सुशांतला नवीन वही बनवायला सांगितलंय.”

‘‘एवढं सगळं एका दिवसात लिहून काढायला जमेल त्याला?”

‘‘ते माझ्याकडे लागलं. तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक प्रयोगाला सही आणि मार्क…”

‘‘चालेल. उद्या त्याला दहा मिनिटं लवकरच पाठवा शाळेत.”

‘चला. ‘हे’ येऊन या संकटातून मार्ग काढेपर्यंत तात्पुरती व्यवस्था तर छान झाली…’ सुधाचा जीव भांड्यात पडला.

सुशांत आतल्या खोलीत बसून शांतपणे लिहीत होता. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

— क्रमशः भाग पहिला 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments