श्री संभाजी बबन गायके

 

? जीवनरंग ?

☆ “तुझ्या चितेच्या साक्षीने !” — श्री संभाजी बबन गायके 

तू मला पहायला आला होतास…तेव्हाच काय ते तुला पाहता आलं चार-दोन मिनिटं…ते सुद्धा सर्व बुजुर्गांच्या गर्दीत. तुझ्या हाती चहाचा कप देताना तुला थोडंसं जवळून पाहता आलं एवढंच. चहाचा कप माझ्या हातून घेताना तू तुझ्या हाताचा स्पर्शही होऊ दिला नाहीस माझ्या बोटांना….एवढा सभ्य माणूस तू ….राजबिंडा…देखणा ! तुझा आणि तुझ्या घरच्यांनी दिलेला होकार मला पडद्याआडून ऐकू आला आणि मी तुझी झाले !  

मला लग्नाआधीच एक सवत होती….तुझं आधीच एक लग्न लागलेलं मला ठाऊक होतं…तुझ्या फौजी नोकरीशी ! आधी तुझा फोटो दाखवला होता मला आई-बाबांनी. तू  मला कधी, कसं, कुठे पाहिलं होतं कुणास ठाऊक… पण तुझ्या घरच्यांनी तुझ्या विवाहासाठी माझा प्रस्ताव ठेवला तेंव्हा तु होकार देण्यात एक क्षणाचाही उशीर लावला नाहीस…..माझा तर तुझं छायाचित्र पाहूनच होकार होता….तोंडाने शब्दही न बोलता ! माझाही फोटो तुझ्या खिशातल्या डायरीतल्या एका कप्प्यात तू ठेवलेला असशीलच…मी ही हृदयाच्या कप्प्यात तुझं चित्र जपून ठेवलं !

चार दोन दिवसांतच तुझी सुट्टी संपली आणि तो सीमेवर रुजू झालास. आणखी बरोबर तीनच महिन्यांनी आपण अग्निला सात प्रदक्षिणा घालून एकमेकांचे होणार होतो…कायमचे ! लग्नाआधी तुला एकदा तरी भेटावं, मनमोकळं बोलून घ्यावा, समजून घ्यावं…असं वाटून गेलं होतं… पण ते राहून गेलं ! आणि आमच्या घरात काय किंवा तुझ्या घरात काय…हे लग्नाआधी भेटणं मंजूर नसतं झालं! तुझा आणि माझाही आईवडिलांवर पूर्ण विश्वास. ते करतील ते अंतिमत: आपल्या चांगल्यासाठीच असणार अशी खात्रीच होती माझी.

सीमेवरून तू फोन तरी कसा करू शकणार होतास…एवढ्या नाजूक स्थितीत. सतत अतिरेकीविरोधी कारवाया, सतत डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. तुझ्याशी लग्न ठरल्यावर मी सीमेवरील बातम्या आवर्जून पहायला लागले. कुठे कुणी शहीद झाले की माझ्याही काळजाचा थरकाप उडायचा. आईच्या चेह-यावर काळजीचे ढग जमा झालेले दिसायचे. ती म्हणायची…कशाला गं पाहतेस अशा बातम्या? 

माझे होणारे थोरले दीर सुद्धा सैन्यातच आहेत, असं समजलं तेंव्हा मी त्यांच्या पत्नीशी एकदा बोलले होते. त्या म्हणाल्या होत्या…सैनिकांशी लग्न म्हणजे आपणही सैन्याची वर्दी अंगावर चढवणं. त्यांची तिथे तर आपली इथे…घरात. शेती, घरदार, मुलं, सासू-सासरे, दीर, नणंदा, दीर…मोठं खटलं असतं खेड्यांत. जवानांच्या सुट्ट्या निश्चित नसतात. ..कधी काही तातडीचं काम निघालं तर मंजूर झालेल्या सुट्ट्या रद्द होतात कधी कधी…..आपण आपलं वाट पहात रहायचं! हल्ली मोबाईलची सोय आहे पण प्रत्येकवेळी बोलणं होईलच असं नाही.तसंच झालं. तु फोन करू शकला नाहीस. म्हटलं तु सुट्टीवर येशील लग्नाआधी…तेव्हा बोलूच की फोनवर….प्रत्यक्ष भेटण्याचा विषय नव्हताच ! 

आणि आज तू आलास…..तो हा असा ! मला बघू न शकणारा, माझ्याशी बोलू न शकणार ! माझ्याशीच काय…अन्य कुणाशीही ! लग्नाच्या मुंडावळ्यांऐवजी तू आधी तिरंगा सजवला तुझ्या माथ्यावर. फुलांची उधळण होणार होती आपल्या लग्नात आपल्या दोघांवरही…त्याआधीच तू फुलांमध्ये स्वत:ला बुडवून घेतलंस. वाजत-गाजत वरात निघाली असती आपली….आज अंत्ययात्रा निघणार आहे! फुलांच्या माळांनी सजवलेली सेज असली असती आपली…तु आज चंदनाच्या काष्ठ्सेजेवर निजणार आहेस…तु एकट्याने अग्निला प्रदक्षिणा घालशील आज…मला नाही मिळणार हा हक्क! मी तुझ्या निष्प्राण देहाच्या गळ्यात पुष्पहार घालू शकेन….तुझ्या गळ्यात मला वरमाला घालायची होती ! 

लग्नात फटाक्यांची आतषबाजी व्हायची होती…ती तू लढाईत आधीच करून आलास ! 

मला तुझं नाव नाही लावता येणार कागदांवर…पण काळजातलं नाव कसं मिटवू, कसं पुसून टाकू मनाच्या कपाळावर रेखलेलं तुझ्या नावाचं कुंकू ! तुझ्यासोबत अग्निकुंडाला सात प्रदक्षिणा नाही घालता येणार…पण तुझ्या चितेला एक प्रदक्षिणा घालण्याचा हक्का आहेच मला…तुझी विधवा म्हणवून घ्यायलाही अभिमान वाटला असता. सैनिकाची विधवा असणं हे सैनिकाच्या बलिदानाएवढंच मोठं ! पण माझ्या ललाटावर या भाग्यरेषा नाही लिहिलेल्या नियतीने ! 

तुझ्याशी न बोलल्याची,न भेटल्याची खंत आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील….मला डागण्या देत. तुला तुझे आई-बाबा खूप प्यार होते ना…तू त्यांचा सर्वांत लाडका लेक. तुझ्या विवाहाची खूप आस लावून बसले होते ते. त्यांच्या जीवनात तुझ्या जाण्याने केवढा मोठा अंधार पसरलाय…तुला कल्पना नसेल…कारण तु डोळे मिटून घेतले आहेस ! 

एक निर्णय घेतलाय मी…मी तुझी नाही होऊ शकले…पण तुझ्या आई-बाबांची तरी होऊच शकते ना? मी नाही एकटं सोडून जाणार तुझ्या आई-बाबांना. तु मला वाड.निश्चयाची अंगठी दिलीयेस….आणि त्याचबरोबर काही आठवणीही….त्याच जपत जगेन मी. कॅप्टन विक्रम बत्रा साहेबांचंही लग्न ठरलं होतं…पण ते कारगिलमध्ये शहीद झाले…त्यांच्या वाग्दत्त वधूनेही अविवाहित राहण्याचा निर्णय घेतल्याचं वाचलंय मी. व्यवहाराच्या दृष्टीने असले निर्णय वेडेपणाचे असतीलही…पण तुझ्या आठवणींना ओलांडून पुढचं आयुष्य नाही जगू शकणार मी ! स्वप्नांचा चुराडा पायांखाली पसरलेला असताना जीवनाच्या वाटेवर पावलं कशी टाकू मी? 

— तू नसलास तरी कायम तुझीच …. 

(कश्मिरात नुकत्याच झालेल्या चकमकीत ६३,राष्ट्रीय रायफल्सचे रायफलमॅन रविकुमार राणा यांनी अतिरेक्यांशी लढताना प्राणांची आहुती दिली. आणखी केवळ तीनच महिन्यांनी त्यांचा विवाह व्हायचा होता. हे कारण सांगून रविकुमार कर्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकत होते. पण त्यांनी मायभूमीच्या रक्षणास सर्वोच्च प्राधान्य दिले… मरणाचा विचार केला नाही… शत्रूला यमसदनी धाडण्याचा विचार केला! त्यांच्या वाग्दत्त वधूशी त्यांची भेट, संवाद झालाच नव्हता… शक्य असूनही. सामाजिक बंधनांमुळे एकतर हे शक्य नव्हते आणि त्यांची सुट्टी संपल्याने त्यांना तातडीने परतावे लागले सैन्य तुकडीत. त्यांच्या या होणार असलेल्या पत्नीने त्यांच्या घरी,त्यांच्या पालकांच्या सेवेसाठी राहण्याचा विचार बोलून दाखवला आहे. असा निर्णय कदाचित घाईचा आणि चुकीचा असेलही. परंतू सैनिकांच्या कुटुंबियांना आपल्या कौटुंबिक सुखाचीही आहुती द्यावी लागते. अनेक नाती उसवतात…भावनांचे बंध फाटून जातात. रायफलमॅन रविकुमर राणा यांच्या या न होऊ शकलेल्या पत्नीच्या भावना खूप वरच्या दर्जाच्या आहेत, परंतू कोमल हृदयाच्या कुणालाही न झेपणा-या आहेत. शेवटी प्रश्न एखाद्याच्या भावनेचा आहे..त्याचा आदर आहेच. पण रविकुमार यांच्या बलिदानाला वंदन करताना, नियतीने दिलेला कौल मान्य करून या युवतीला आयुष्यात पुढे चालायला लागण्याची प्रेरणा द्या, अशी प्रार्थना आपण काल माहेरी आलेल्या आणि उद्या सासरी निघालेल्या गौरींना करू शकतो. जय हिंद…जय भारत !🇮🇳)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments