श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ श्रावण झुला… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
श्रावणाचा मासाचा झुला
झाडांनीच गं बांधियला
हिरव्या कच्च फांद्यांनी
पानाफुलांनीच त्याला
सुंदर सजविला !
राघू मैना अन् चिमण्या
झुल्यावर झोके घेती
आकाशातील पक्षीही
झुल्याकडे झेपावती !
असा श्रावणाचा झुला
पावसाने चिंब केला
झाडावरचे पक्षी त्याला
दाखविती वाकुल्या !
झुला खुणवितो सर्वांना
आकाशातील इंद्रधनूला
त्याच्या सप्तरंगांचे वाटे
आकर्षण झुल्याला !
अनोखीसा श्रावणझुला
झेपावतो उंच आकाशी
गुज बोलतो त्याच्याशी
आपुल्या धरतीचे !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈