सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ परब्रम्ह… ☆ सुश्री शोभना आगाशे

न मी कधी जन्मतो

न कधी मृत्यू पावतो

मी असे चिरतरुण

मीच तो अपार करुण

मी नसे नाशवंत

अपूर्व मी अन् अनंत

आनंद मी, भयहीन मी

अढळ मी, अचल मी

नसे मजआधी कुणी

नसे मजसम ही कुणी

मी असे अप्रकट

तरीही भासे प्रकट

मी असे सर्वज्ञाता

मीच असे अन् त्राता

मज नसे सुरवात

आणि नसे मज अंत

साधार मी नच राही

आधार मीच परि देई

स्वामी मी सदोदित

स्वयंस्फूर्त अन् सतत

श्रेष्ठ मी, कनिष्ठ मी

विशाल मी, अणु मात्र मी

मी सर्वाभूती वसे

मी सर्वातीत असे

मी असे नवा सदैव 

मी जुना अन् नित्यैव

मी असे एक शून्य

संपूर्ण मी परि अनन्य

मी न करवितसे कांही

मी अलिप्त सर्वा देही

मी एकाकी, नसे लिप्त

हर्ष शोका परे, अलिप्त

व्यापित मी चराचरा

मज व्यापे भक्ती परा

आदिपुरुष, पुरुषोत्तम

पुरुष मी विराट, उत्तम

बोलत मी नच कांही

ऐकत मी नच कांही

अबोल बोल भक्तांचे

ऐकत मी परि साचे

विविध भक्त मज पुजती

विविध रूपे रेखाटती

मजला परी रूप नसे, 

भक्तांच्या हृदयी वसे

पूर्वज मज नच कोणी

वंशज मज नच कोणी

नाही मज एक गोत्र

समदर्शी मी स्वतंत्र

निर्गुण, निराकार, सतत

परब्रम्ह मी शाश्वत

या सर्वा जाणित जो

अद्वैता मानित जो

तो बोधी कोण असे

मजला ते ज्ञात असे

(ज्ञानेश्वरीतील अध्याय १८, ओवी ११९३ ते १२०० वर आधारित)

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments