सौ कुंदा कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ उंबरठा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆
रांगायला लागले तेव्हापासून
उंबरठा सारखा खुपत होता
ओलांडता येत नव्हता
म्हणून मुळीच आवडत नव्हता (१)
नंतर सारवून रांगोळी घातली
मग फारच आवडायला लागला
त्यालाच ठेचकाळत मोठी झाले
मर्यादेचे शिक्षण मिळाले(२)
माप ओलांडून सासरी आले
त्याला ओलांडताना भान जागले
सासुरवाशीण माहेरवाशीण
अदबीनेच वागू लागले (३)
फ्लॅटमध्ये मी आले आता
नवे रूप त्याचे मज दिसता
हळवा आठव मनी बागडता
सखाचा झाला प्रिय तो आता (४)
© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈