श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

I am in control  एक व्यसनयात्रा ☆  श्री मकरंद पिंपुटकर

I am in control  एक व्यसनयात्रा

रमेश हा एक almost आदर्श नागरिक होता. त्याची जुनी बजाज चेतक चालवताना तो कधी गाडी बेफाम पळवायचा नाही, नेहमी स्पीड लिमिटचे पालन करायचा. लाल काय, नियमानुसार तो कधी पिवळा सिग्नलही तोडायचा नाही. कधीही wrong साईडने गाडी चालवायचा नाही. 

म्हणजे एकंदरीत इतक्या सज्जनपणे गाडी चालवायचा, की अगदी शुक्रवार – शनिवार रात्री किंवा सणासुदीलासुद्धा पोलीस त्याला संशयावरून बाजूला घ्यायचे नाहीत. 

आणि ते तसे त्याला बाजूला घ्यायचे नाहीत म्हणून बरं होतं, कारण रमेश हा नेहमीच तर्र अवस्थेत असायचा. “मला दारूचं व्यसन नाही रे. दारू काय आपण केव्हापण सोडू शकतो. आपण नेहमी full control मध्ये असतो.” हातातला देशी दारूचा ग्लास रिचवताना तो त्याचं तत्त्वज्ञान सांगायचा. 

त्याचं लग्न झालं होतं, दोन मुली होत्या. दिवसा तर त्या शाळेत गेलेल्या असायच्या. रात्री जेवताना रमेश, लेकी आणि रमेशची बायको एकत्र असायचे. टीचभर स्वयंपाकघरात बायकोची लगबग चाललेली असायची, मुली दोन घास पोटात ढकलत असायच्या आणि रमेश नेहमीप्रमाणे कोणाशी काही न बोलता, आपल्याच धुंदीत (आपल्याच नशेत, खरं तर) उन्मनी अवस्थेत बसलेला असायचा. 

मला तर वाटतं की खाण्यापेक्षा त्याचा जास्त भर पिण्यावरच होता.  दारूच्या नशेत बायकोला – मुलींना मारहाण करायचा नाही हेच काय ते नशीब. 

त्याला चांगली नोकरी होती. आम्ही दोघं एकाच कारखान्यात काम करायचो. पण या व्यसनापायी त्याला अनेकदा warning मिळाल्या आणि मग, नाईलाजाने, शेवटी एके दिवशी कामावरून डच्चूही मिळाला. 

रमेशला काहीच फरक पडला नाही. ना त्याने दारू सोडली, ना त्याने नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उलट आता त्याला दारू पिण्यासाठी आणखी वेळ आणि मोकळेपणा मिळाला.

याची नोकरी गेल्यावर बायकोने महिनाभर आस लावली, तिला वाटलं – नवरा नोकरीसाठी प्रयत्न करेल. महिन्याभरात पुन्हा एकदा भ्रमनिरास झाल्यावर त्या माऊलीने धुण्याभांड्याची चार कामं आणखी वाढवली. 

रमेश पूर्ण वेळ full time घरकोंबडा झाला. 

याचं दारू ढोसणं चालूच होतं. कर्जाचा आणि खर्चाचा डोंगर वाढतच होता. परिस्थिती खूपच हाताबाहेर गेल्यावर बायकोने शेवटी ज्या घरात ते रहात होते ते तिच्या वडिलांच्या मालकीचं घर विकलं, सर्व कर्जं बऱ्यापैकी फेडली. 

आता ते एका झोपडपट्टीवजा इलाख्यात भाड्याने राहत होते. रमेश अजूनही नोकरीसाठी प्रयत्नही करत नव्हता. “आपण दारूबाज नाही रे. आपण एकदम control मध्ये असतो.” हे त्याचं घोषवाक्य अजूनही कायम होतं. 

मुलींची शिक्षणं जेमतेम दहावी बारावीपर्यंत झाली, आलेल्या स्थळांबरोबर बायकोने मुलींची लग्नं लावून दिली, निदान त्या दोघींची तरी सुटका झाली. 

आयुष्य मागच्या पानावरून तसंच नीरसपणे पुढे सुरू होतं. 

आणि एका रात्री त्याच्या किंचाळ्यांनी बायकोला जाग आली. त्याच्या तोंडातून आणि शौचाद्वारे रक्त येत होतं. 

“ब्लड हॅमरेज,” सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे नेमकं काय हे त्या बिचाऱ्या बायकोला कळलं नाही. मग डॉक्टरच तिला समजावून सांगू लागले. 

हाताने यकृताची जागा दाखवत ते म्हणाले, “या इथे liver असते. किडन्यांप्रमाणे liver सुद्धा रक्तातील अशुद्ध भाग काढून टाकते. सारखी दारू पिण्याने तुमच्या नवऱ्याची liver निकामी झाली आहे. जेमतेम १०% काम करत आहे. 

दारूनं त्याची जठर, आतडी या सगळ्या सगळ्यांची आवरणं पार खराब झाली आहेत, त्यांत अल्सर झाले आहेत. त्यातला कुठलातरी एक अल्सर आज फुटला, म्हणून आज हे असं झालं.”

डॉक्टर कमालीच्या यांत्रिकपणे, कोणत्याही भावभावनेशिवाय हे सगळं सांगत होते. आणि त्यात आश्चर्य नव्हतं. जवळपास रोज एखादीतरी अशी केस यायचीच. काही महिन्यांनंतर तेही निर्ढावले होते. 

“आता आम्ही याचं नाव लिव्हर ट्रान्सप्लांट लिस्टमध्ये टाकू. ते ऑपरेशन महाग असतं,” डॉक्टरांनी खर्चाचा आकडा सांगितल्यावर बायको मटकन खालीच बसली. “पण लिव्हर कधी मिळेल काहीच सांगता येत नाही. शिवाय लिव्हर उपलब्ध झालीच तर एखाद्या दारुड्यापेक्षा दारू न पिणाऱ्या पेशंटला लिव्हर दिलेले जास्त चांगलं असतं, कारण व्यसनाधीन माणूस पथ्यपाणी करत नाही आणि मिळालेली नवी लिव्हरही नासवतो.

आज तुम्ही धावपळ करून त्याला वेळेवर हॉस्पिटलला आणलंत, आणि आज आम्ही त्याला वाचवू शकलो. कदाचित पुढच्या वेळी जर तुम्हाला उशीर झाला, किंवा आम्ही हा रक्तस्त्राव थांबवू शकलो नाही तर …”

निर्विकारपणे सांगताना अचानक डॉक्टरांचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं, त्यावरची प्रेतकळा पाहून तेही वरमले, चरकले, थांबले. 

पण त्यामुळे त्यांनी वर्तवलेला भविष्यात फरक पडला नाही. रमेश मृत्यू पावला – कणाकणाने, क्षणाक्षणाने, वेदनादायी मरण आलं त्याला. 

व्यसनापायी सर्व पैसा उधळवून टाकला होता त्याने, आयुष्यही उधळून टाकलं.

“आपल्याला व्यसन नाही रे दारूचं. I am in full control,” हे ध्रुपद घेऊन सुरू झालेली व्यसनयात्रा त्याचा प्राण घेऊनच संपली.

रमेशसारखेच एकदम full control मध्ये असणारे तुमच्या आजूबाजूलाही अनेक जण असतील. ते वेळीच सावरोत, ही सदिच्छा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments