श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ महाप्रतापी… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता.लंडनमध्ये रहायचा. असाच एकदा अमेरिकेत गेला होता. न्युयॉर्कमध्ये.

रस्ता ओलांडत होता..आणि त्याला एका गाडीची धडक बसली.

एका हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमीट केलं.ही बातमी सगळीकडे पसरली.वेगवेगळ्या दैनिकाचे..मॅगझिन्सचे रिपोर्टर हॉस्पिटल बाहेर जमले‌.

पण कोणाशीही बोलण्यास त्याने नकार दिला.आपल्या या अपघातामध्ये बाहेर किती औत्सुक्य आहे हे त्याला उमगलं.त्याने ठरवलं.यावर आपणच लिहायचं.मग त्यानं त्यावर एक लेख तयार केला.’कॉलिअर्स’ या दैनिकाने तो तिथल्या तिथे विकत घेतला.चक्क तीन हजार डॉलर्सला.

ही गोष्ट शंभर वर्षापुर्वीची.त्याचं सगळं आयुष्यच भन्नाट.सुरुवातीच्या काळात लष्करात सेवा बजावल्यानंतर त्यानं ठरवलं.. यापुढे आजन्म उपजीविका करायची ती फक्त लेखनावरच.

लेखनासाठी शांतता लाभावी म्हणून त्यानं चक्क पाचशे एकर जमीन खरेदी केली.त्यात एक गढी उभारली.एक सुसज्ज अभ्यासिका बनवली.

त्याचा दिनक्रम विलक्षणच.सकाळी आठ वाजता उठल्यावर तासभर तो दैनिकांचं वाचन करत असे.त्यानं एक उभं डेस्क बनवलं होतं.तिथे उभं राहून तो तोंडी मजकूर सांगायचा.तो जरी लेखक होता,तरी आयुष्यात त्याने हातात लेखणी धरली नाही.त्यानं सांगितलेला मजकुर दोन टायपिस्ट उतरुन घेत.सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात साधारण अडीच हजार शब्दांचं लेखन झालं पाहिजे हा त्यांचा दंडक.

दुपारी दोन ही त्याची स्नानाची वेळ.तो एक उत्तम वक्ता देखील होता.स्नानाच्या वेळी तो मोठ्या आवाजात भाषणाचा सराव करत असे.यावेळी कधी त्याला उत्तम वाक्य सुचायची.तो ती मोठ्या आवाजात उच्चारायचा.त्याच्या टायपिस्ट बाहेर उभ्याच असतं.लगेचच त्या ती वाक्ये टिपून घेत.

त्यानंतर मग भोजन.जेवणाच्या आधी आणि जेवण करताना उत्तम मद्याचे प्याले त्याच्या टेबलवर असत.व्यवस्थित तब्बेतीत मद्यपान..साग्रसंगीत भोजन..आणि मग वामकुक्षी.

वामकुक्षीबद्दल त्याचे विचार अफलातून होते. तो म्हणतो… 

“एक तासाच्या शांत वामकुक्षी मुळे आपण एका दिवसाचे दोन प्रसन्न दिवस करु शकतो.डुलकी काढल्यानंतर चित्त कसं टवटवीत होतं.ज्याला आयुष्यात वेळ वाचवुन मोठं काम करायचं आहे..त्यानं वामकुक्षीची सुखद सवय लावून घ्यावी “.

दुपारी चार ते रात्री दहापर्यंत तो लेखनाची संबंध नसलेलं राजकीय काम करत असे.रात्री दहा ते पहाटे तीन ही वेळ लिहीण्याची.. म्हणजे मजकूर सांगण्याची.दोन टायपिस्ट पुन्हा एकदा त्याच्या मुखातून येणारे शब्द टिपुन घेण्यासाठी सरसावुन बसत.

वयाच्या पन्नाशीत असतांना त्याला आपल्यातल्या एका वेगळ्या गुणांचा शोध लागला.आपल्या मुलाला चित्रकला शिकवत होता तो.त्याच्या लक्षात आलं..आपण चित्रही छान काढु शकतो.

मग त्यासाठी एक नवा स्टुडिओ उभा केला.त्याच्या कुंचल्यातून शेकडो रंगीत अप्रतिम चित्रे अवतरली.

साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणारा तो एकमेव राजकीय नेता होता.जगातील सत्तावीस विद्यापिठांनी त्याला सन्माननीय पदव्या अर्पण केल्या.त्याच्या भाषणांच्या रेकॉर्डस् निघाल्या.रॉयल ॲकेडमीचा चित्रकार म्हणून कलावंतांच्या जगातला सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला.उत्तमोत्तम मद्याचे महासागर त्याच्या घशाखाली उतरले.लाखो चिरुटांची त्यानं राख केली.

पुर्वायुष्यात त्यानं लष्करी शिक्षण घेतलं होतं.एक जिगरबाज योद्धा म्हणुनही त्याची ती कारकीर्द गाजली.सतत साठ वर्षे तो इंग्लंडच्या संसदेत होता.. आणि तरीही नीतीवान होता‌.. काठोकाठ चारित्र्य संपन्न होता.आजन्म त्याने सरस्वतीची साधना केली.

आपल्या कुटुंबावर अपार प्रेम करणारा..लखलखीत जीवन जगणारा तो म्हणजे …. 

इंग्लंडचे महाप्रतापी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments