सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.) 

इथून पुढे —

बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्ष ही त्याच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. ह्या वेळेत त्याला योग्य चालना मिळाली तर बाळाचा मानसिक, बौद्धिक, आणि त्याच्या भाषेच्या वाढीचा आलेख उंचावतो.

IAP च्या guidelines अनुसार पाहिले दोन वर्ष बाळाला स्क्रीन टाइम अजिबात नको ! बाळ रडत आहे, लाव मोबाईल वर कार्टून, बाळ जेवत नाही लाव टीव्ही, आईला काम आहे तो एका जागी बसत नाही, दे लावून कॉम्प्युटर आणि बसू दे त्यासमोर! ह्या सवयी आपण लावत आहोत आणि त्यामुळे त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होतोय हे कुणाच्या गावीही नाही!

दोन ते पाच वर्षापर्यंत एक तास किंवा कमी स्क्रीन time असावा. स्क्रीन मोठी असावी, म्हणजे लॅपटॉप किंवा टीव्ही, त्याच्या बरोबर पालकांनी देखील बसावे. तो काय बघत आहे ह्याकडे लक्ष द्यावे. शक्यतो शैक्षणिक गोष्टींसाठी यांचा वापर व्हावा. 

मनोरंजनासाठी स्क्रीन time ठेवला की नकळत त्याचा वापर वाढतो. त्याच बरोबर मैदानी खेळ, पुस्तके, त्याच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळणे, गोष्टी सांगणे, गोष्ट सांगताना आपण हावभाव करत गोष्ट सांगणे, जेणेकरून मुले आपल्या चेहऱ्याकडे नीट निरखून बघत असतात, त्यांना मग emotions चेहरा बघून कळायला लागतात. 

मुलांचे घरातील इतर लोकांबरोबर मिसळणे ही व्हायला हवे. दोन ते पाच ह्या वयामध्ये मुलांचे सोशल स्किल्स देखील घडत असतात. इथे जर स्क्रीन time जास्त झाला तर ते अनेक गोष्टीत मागे पडतात. 

आणि सर्वात महत्वाचे हे की आधी पालकांनी आपला स्क्रीन time कमी करावा. मुले अनुकरणातून शिकतात. त्यांच्यापुढे आपण आदर्श घालून दिला तर ते लवकर शिकतील.

पाच सहा वर्षाचे मुल असेल तर त्याला आपण काही नियम घालून द्यावेत. ह्या वयात मुले नियम नीट पाळतात, त्यांना ते पाळल्यामुळे एक प्रकारे आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होते. आपण डिजिटल नियम घालावे ते वयानुरूप असावेत. वय वाढले की नवीन नियम आपण त्यात टाकावेत.

उदाहरणार्थ…

  1. स्क्रीन हे मुलांना शांत किंवा इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी वापरू नये.
  2. स्क्रीन time, मैदानी खेळ, अभ्यास, जेवण, कौंटुबिक वेळ आणि छंद ह्यांची योग्य सांगड घालावी. स्क्रीन झोपेच्या आधी किमान एक तास बंद असावा. त्यामधील नील प्रकाश झोप उडवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
  3. ह्याच वयात मुलांना कॉम्प्युटर समोर योग्य पद्धतीने कसे बसावे ते शिकवावे, पोक काढून किंवा मान वाकवून बसू नये. 
  4. स्क्रीन चालू ठेवून multy tasking करायचा प्रयत्न करू नये, म्हणजे शाळेचा अभ्यास किंवा गृहपाठ करत असताना कॉम्प्युटर किंवा मोबाईल बंद ठेवावा.
  5. मुले कॉम्प्युटर वर असताना आपण अधून मधून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, ते काय बघत आहेत ह्यावर बारीक लक्ष ठेवावे. कुठले ही गेम्स किंवा प्रोग्राम, ज्यात हिंसा आहे किंवा addiction लागण्या सारख्या गोष्टी आहेत ते टाळावे. Privacy setting, browser आणि app साठी safe search engine, आणि योग्य antivirus आहे ना ते खात्री करून घ्यावी.
  6. मुलांना शांतपणे चिडचिड न करता आणि ठामपणे, “आता स्क्रीन time ची वेळ संपली आहे” हे सांगणे महत्वाचे आहे. असे सांगितले तर मुले ऐकतात.

जरा मुले मोठी झाली, टीन एज जवळ यायला लागले की त्यांना insagram, ट्विटर, What’sapp, telegram ची भुरळ पडायला लागते. आपण घरी कितीही बंधने लादायचा प्रयत्न केला तरी शाळेत, क्लास मध्ये, मित्रांच्या मार्फत त्यांना ह्या गोष्टी कळणारच आहेत. अश्या सोशल साईटचा वापर कुठल्या वयात करू द्यावा हे त्या प्लॅटफॉर्मवरच लिहिलेले असते. मुले हे platforms वापरायला लागली की काही गोष्टी आपण त्यांना सांगायलाच हव्यात.

  1. सोशल मीडिया वर आपण दुसऱ्यांना तसेच वागवले पाहिजे, जसे त्यांनी आपल्याशी वागावे याची आपण अपेक्षा करतो.
  2. आपली भाषा सुसंस्कृत असायला हवी. 
  3. इथे लिहिलेले किंवा पोस्ट केलेले फोटो हे कायम स्वरुपी राहू शकतात ह्याची त्यांना कल्पना द्यावी. त्याचा वापर कोणी वाईट कामासाठी करू शकतो हे ही समजावून सांगावे.
  4. आपल्या घरचा पत्ता, फोटो, किंवा कुठले ही password आपण सोशल मीडिया वर टाकू नये.
  5. सोशल मीडिया फ्रेंड ला भेटायला एकटे कधी ही जाऊ नये, घरातील मोठ्यांना बरोबर घेऊन जाणे.
  6. येथे कोणी तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, bulling करत असेल तर तात्काळ घरातील जबाबदार व्यक्तीला सांगणे.

आणि इतके करून ही कोणी व्यक्ती तुमच्या मुलांना सोशल मीडिया वर त्रास देत असल्यास.. तुम्ही

  1. मुलाला कळू द्या की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि कायम त्याच्या बरोबर असणार आहात.
  2. मुलाला सोशल मीडिया पासून काही काळ ब्रेक घेऊ द्या.
  3. वाईट मेसेजला उत्तर देऊ नका.
  4. ते मेसेज save करून ठेवा, नंतर reporting साठी कामी येतात.
  5. हा bully माहीत असल्यास त्याच्या पालकांशी बोला.
  6. शाळेत शिक्षकांना कल्पना द्या, बऱ्याच शाळेत काही पॉलिसीज असतात अश्या bully साठी.
  7. तरीही हा त्रास थांबला नाही तर आपण सायबर पोलिसांकडे तक्रार करू शकता. हे आपण childline phone no 1098 वर रिपोर्ट करू शकतो

थोडक्यात आताच्या वातावरणात, म्हणजेच ह्या माहितीच्या अणुस्फोट झालेल्या सोशल मीडियाच्या जाळ्यात आपण अडकलो आहोत. आपली मुले तर पुरती गुरफटून गेली आहेत. त्यांना ह्या वेब च्या जाळ्यातून सही सलामत बाहेर काढून त्या जाळ्याचा चांगला वापर करायला आपल्याला शिकवायचे आहे. काट्याने काटा काढायचा हा प्रकार आहे.

प्रयत्न नक्कीच करूयात ! 

– समाप्त – 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments