सुश्री नीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मालती जोशी… आमच्या गुरू…’ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी सत्यनारायण पूजा, सप्तशतीचा पाठ, लघुरुद्र, हे सर्व  पुरुष करत असत. 1975 साली थत्ते मामांनी स्त्रियांनी हे शिकायला हरकत नाही असा विचार मांडला. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच तेव्हाच्या समाज रचनेनुसार हे स्वाभाविक होते. तरीसुद्धा मामांनी उद्यान प्रसाद पुणे येथे खास स्त्रियांसाठी हे वर्ग सुरू केले.

स्वाभाविकच स्त्रियांचा प्रतिसाद अल्प होता. स्त्रियांच्या मनातील भीती, घरातून विरोध, वेळ कसा काढायचा, शिवाय संस्कृत भाषा…. इत्यादी अनेक अडचणी समोर दिसत होत्या. मात्र काही स्त्रियांना घरातून परवानगी मिळाली आणि त्या वर्गाला आल्या.

पहिली बॅच सुरू झाली. त्यात आमच्या गुरु मालती जोशी होत्या. सदाशिव पेठेत अनाथ विद्यार्थी गृहासमोर असलेले नरसिंहाचे देऊळ बाईंचे आहे.  त्या तिथेच राहत आहेत. मुळातच हुशार असल्याने त्या भराभर शिकत गेल्या.

थत्ते मामांनी सर्वांना प्रार्थने पासून सर्व  शिकवले. संसाराची  जबाबदारी सांभाळून हे सर्व तोंड पाठ करायचे होते. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली .

आठ दहा बायका हे शिकल्या.थत्ते मामांना अतिशय आनंद झाला. जोशीबाई अनेक वर्ष  थत्तेमामांबरोबर   पुजा पाठ करायला जात होत्या.

काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचे वर्ग त्यांच्या घरी सुरू केले. अत्यंत अल्पशा फी मध्ये त्या  शिकवत असत.

बाईंचा एक अलिखित नियम होता..

की जे शिकवलं असेल ते पुढच्या वेळी म्हणून दाखवायचे .आम्ही 55 ते 60 वर्षाच्या होतो. खूप वर्षांनी पुस्तकं अभ्यासासाठी हातात घेतली होती. पाठ असलं तरी बाईंच्या समोर म्हणून  दाखवताना  चुका व्हायच्या.

बाई गप्पा मारायच्या, चहा करायच्या, लाडू खायला द्यायच्या पण पाठांतर केलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कडक शिस्त असायची.चुकलं तर परत म्हणावे लागे.

बाईंची आम्हाला भिती वाटायची. नंतर त्यात गोडी वाटायला लागली. पाठांतराची सवय झाली….प्रेरणा द्यायला बाई होत्याच…

अनेक जणी बाईंच्या कडे शिकून तयार झाल्या . बाईंच्या बरोबर आम्ही पुण्यात आणि बाहेरगावी कार्यक्रम केले.  त्यातल्या काहीजणी आता इतरांना शिकवत आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी  मृत्युंजयेश्वर मंदिरात आम्ही रुद्र म्हणायला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात एके दिवशी सारसबाग गणपती समोर ब्रह्मणस्पती म्हणायला जातो.  बाईंच्या बरोबर देवीच्या देवळात सप्तशतीचे पाठ  करायला जातो हे सर्व सेवा म्हणून करतो.हे  बाईंच्या मुळे शक्य झाले आहे.

आज शांतपणे घरी बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त ,त्रिसुपर्ण, विष्णुसहस्त्रनाम, शीव महिम्न  म्हणताना   अपार आनंद होतो … बाईंनी आम्हाला हा बहुमूल्य ठेवा दिलेला आहे.

पन्नास वर्षांपूर्वी थत्ते मामांनी बायकांच्यावर विश्वास ठेवला. आणि  त्या पण हे करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. आज त्यांची पण आठवण येत आहे. थत्ते मामांना माझा विनम्र नमस्कार.

त्यांनी लावलेले हे झाड आज बहरलेले आहे .आज अनेक स्त्रिया पौरोहित्य करत आहेत .

याचे श्रेय मामांना जाते.

खरं तर घरं संसार, मुलं बाळं, आला गेला ..हे सगळं सांभाळून बाईंनी हे शिकवायला सुरुवात केली हे किती विशेष वाटते.

शिवाय त्याचा कुठेही गर्व अभिमान नाही शांतपणे प्रेमाने त्या शिकवत  राहिल्या.

बाईंच्या 95 व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जानेवारीला आम्ही सर्वांनी परत एकदा बाईंचा घरी सगळ्यांनी जमुन  वर्ग भरवला .

स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हंटले. बाई आमच्याबरोबर म्हणत होत्या.

शेवटी बाईंनी आशीर्वाद मंत्र म्हटला तेव्हा डोळे भरून आले होते. ..

अशा गुरू लाभल्या हे आमचे परमभाग्य.

त्या माझ्या बाईंना माझा त्रिवार साष्टांग नमस्कार.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments