श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

तुझी राख धुंडाळताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्यादिवशी रडता नाही आलं,राजा ! माझं बापाचं काळीज देहाच्या आत होतं… क्षत विक्षत. आणि माझा देह जबाबदारीच्या वस्त्रांनी पुरता झाकलेला होता. डोळ्यांवर कातडं नाही ओढून घेता येत. डोळ्यांना पहावंच लागलं तुझ्याकडे. आणि मी पहात राहिलोही एकटक…. आणखी काही क्षणानंतर हे पाहणंही थांबणार होतं.

तुझ्या पलटणीचा मी प्रमुख. पलटणीतील सारेच माझे बच्चे. माझ्या एका इशाऱ्यासरशी मरणावर झेप घेणारे सिंहाचे छावे… वाघाचे बछडे. तू तर माझ्या रक्ताचा अंश. माझ्याच पावलांवर हट्टाने पाऊल टाकीत टाकीत थेट माझ्याच पंखांखाली आला होतास. कोणतीही मोहिम असू देत… तुला कधी मागे रेंगाळताना पाहिलं नाही. उलट पलटणीच्या म्होरक्याचा पोरगा म्हणून तू पुढेच सरसावयचा सर्वांआधी… बापाला कुणी नावे ठेवू नये म्हणून. 

आतापर्यंत तू प्रत्येकवेळी परत आला होतास दुश्मनांना यमसदनी धाडून. एखाद्या मोहिमेत आपल्यातलं कुणी कामी आल्याची बातमी यायची तेंव्हा धस्स व्हायचं काळजात. गोळी काही नातं विचारून शिरत नाही शरीरात. असे अनेक प्रसंग आले आयुष्यात जेंव्हा सैनिकांच्या मृतदेहांवर पुष्पचक्र अर्पण करावे लागले…. पूर्ण गणवेशात ! तूही असायचास की मागच्या एखाद्या रांगेत. तुझ्याच एखाद्या साथीदाराच्या शवपेटीला तुलाही खांदा द्यावा लागायचा. 

मी समोर आलो की तू  मला अधिक त्वेषाने सॅल्यूट ठोकायचा…. आणि मला ‘सर’ म्हणायचा. तुझ्या तोंडून ‘पपा’ अशी हाक ऐकल्याला खूप वर्षे उलटून गेली होती. लहानपणी तुझा सहवास नाही मिळाला तसा… मी सतत सीमेवर असायचो आणि तू तुझ्या आईसोबत दूरच्या गावी. बढती झाली आणि पलटणीत कुटूंब आणायची मुभा मिळाली तर तू सैनिक व्हायला निघून गेलास. परत आलास ते रुबाबदार अधिकारी होऊनच. तुझ्याकडे पाहताना मी माझं मलाच आरशात न्याहाळतो आहे, असं वाटायचं. 

‘पपा, तुमच्याच पलटणीत पोस्टेड होतोय…’ तुझा निरोप आला आणि पाठोपाठ ” सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलरिया रिपोर्टींग सर ! ” म्हणत तू  पुढ्यात हजर झालास. वाटलं पुढं होऊन तुला घट्ट मिठी मारावी. पण तुझ्यात आणि माझ्यात गणवेश होता…. वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यास पाऊलभर दूर उभं राहायला लावणारा. मात्र घट्ट हस्तांदोलन मात्र केलं मी. तू जन्मलास तेंव्हा तुझा एवलासा हात हाती घेतला होता… ते आठवलं. तोच हात आता सामर्थ्यशाली झाला आहे, या हातात आता अधिकार आलेला आहे… हे जाणवलं. मी म्हटलं होतं, ” वेलकम ऑफिसर ! ” यावर तुझ्या डोळ्यांत चमक दिसली होती. आज तुझे डोळे मिटलेत… ती चमक आता या म्हाताऱ्या होत चाललेल्या डोळ्यांना दिसणार नाही…. आणि आयुष्याच्या सायंकाळी मी कुणाच्या नजरेनं पाहणार? 

त्या दिवशीही तू नेहमीप्रमाणे मोहिमेवर गेला होतास. माझं सगळं लक्ष असायचं. पलटणीतली सारी पोरं माझीच तर होती. आणि तू त्यांच्यासोबत होतास, त्यामुळे तर ही भावना अधिकच तीव्र व्हायची. खरं तर तुझी इथली पोस्टींग आता जवळजवळ संपत आली होती. दुसऱ्या एखाद्या शांत ठिकाणी गेला असतास कदचित फार लवकर… तू गेलास खरा… पण कायमच्या शांत ठिकाणी. 

निरोप आला ! निघायला पाहिजे. सर्व तयारी झाली आहे. गाडी उभी आहे. मला तयार व्हायला पाहिजे. पूर्ण लष्करी गणवेश परिधान करायलाच पाहिजे… सैनिकाला अंतिम निरोप द्यायचा आहे. 

पण आज स्वत:चा मुलगा गेल्याची बातमी स्वत:तल्या बापाला सांगावी तरी कशी? एक कमांडिंग ऑफिसर म्हणून मुलाच्या आईला कसं सांगावं की तुझा मुलगा शहीद झालाय? आणि नवरा म्हणून बायकोला काय सांगावं? एवढा मोठा हल्ला तर कोणत्याही लढाईत झाला नव्हता माझ्यावर.

नेहमीच्या सफाईने आवरलं सगळं. तू फुलांच्या गालिच्यात पहुडलेला होतास. देहावर तिरंगा लपेटून. खरं तर तुझ्या जागी मी असायला हवं होतं. मीही मोहिमा गाजवल्या तरूणपणी. पण माझ्या वाटची गोळी नव्हती दुश्मनाच्या बंदुकीत. आणि असलीच तर तू आता तुझं नाव माझ्या नावाच्या आधी जोडलं होतं… गोळीला आपलं काम माहित होतं… ज्याचं नाव त्याच्यात देहात सामावून जायचं. 

छातीवर गोळ्या झेलल्याचं समजलं तुझ्या सोबत्यांकडून.. जे बचावले होते दुश्मनांच्या हल्ल्यातून. त्याआधी तू कित्येक दुश्मन उडवले असंही म्हणताहेत ही पोरं. छातीवर गोळी म्हणजे मानाचं मरण आपल्यात. इथं होणारी जखम जीवघेणी खरी पण जास्त शोभून दिसणारी. 

दोघा जवानांनी तालबद्ध पावलं टाकीत पुष्पचक्र पुढे नेलं. मी ठरलेल्या सवयीनुसार पावलं टाकीत तुझ्या देहाजवळ पोहोचलो. सर्वत्र शांतता… दूरवरच्या झाडांवर पाखरं काहीतरी सांगत होती एकमेकांना. कदाचित मोठं पाखरू लहान पाखराला… दूर कुठं जाऊ नकोस फार ! असं सांगत असावं…  हे मला आता तुला सांगता येणार नव्हतं.. तू श्रवणाच्या पल्याड जाऊन पोहोचला होतास… बेटा ! 

खाली वाकून ते पुष्पचक्र मी तुला अर्पण केलं… काळजीपूर्वक. एक पाऊल मागे सरकलो आणि खाडकन तुला सॅल्यूट बजावला… अखेरचा ! तुझ्या शवाला खांदा दिला. किती जड होतं ओझं म्हणून सांगू… साऱ्या पृथ्वीचा भार एकाच खांद्यावर आलेला. आणि मला खांदा द्यायला तू नसणार याची दुखरी जाणीव तर आणखीनच जड. 

पुढचं काही आठवत नाही. तुझ्या चितेच्या भगव्या ज्वाळांनी डोळे दिपून गेले… अमर रहेच्या घोषणांनी कान तुडुंब भरून गेलेले होते. आसवांना आज किमान सर्वांसमोर प्रकट व्हायला मनाई होती…. आसवं सुद्धा हुकुमाची ताबेदार. त्यांना माहित होतं एकांतात मी त्यांना काही अडवणार नव्हतो ! 

सकाळी तुझ्या राखेपाशी गेलो. एवढा देह आणि एवढीशी राख. मरण सर्व गोष्टी अशा लहान करून टाकते. अलगद हात ठेवला तुझ्या राखेवर…. अजूनही धग होती थोडीशी. असं वाटलं तुझ्या छातीवर तळवा ठेवलाय मी. असं वाटलं माझ्या या तळव्यावर तुझा हात आहे….. त्या मऊ राखेत माझा हात खोलवर गेला आपसूक… आणि हाताला काहीतरी लागलं ! 

तुझं काळीज भेदून गेलेली गोळी…. काळी ठिक्कर पडलेली आणि अजूनही तिच्यातली आग शाबूत असलेली. जणू पुन्हा एखादं हृदय भेदून जाईल अशी. तशीच मूठ बंद केली…. गोळीसह. 

तुला वीरचक्र मिळणार होतंच… आणि ते स्विकारायला मलाच जावं लागणार होतं.. तसा मी गेलोही. तुझ्या पलटणीचा प्रमुख म्हणून नव्हे तर तुझा बाप म्हणून. तोवर भरपूर रडून झालं होतं एकांतात… तुझी आई होतीच सोबतीला. शौर्यचक्र स्विकारताना हात किचिंत थरथरले पण सावरावं लागलं स्वत:ला. अनेक डोळे माझ्याकडे लागलेले होते…. सेकंड लेफ्टनंट गुरदीप सिंग सलारिया यांचे वडील त्यांना मरणोत्तर दिले गेलेले शौर्यचक्र स्विकारताना रडले असते तर पुढे ज्यांना सैन्यात जाऊन मर्दुमकी गाजवायची आहे… त्यांची पावलं नाही का अडखळणार? आणि माझ्या गुरूदीपलाही हे रुचलं नसतं ! 

आजही ते शौर्यचक्र आणि ती गोळी मी जपून ठेवली आहे… त्याची आठवण म्हणून. माझ्या पोराने निधड्या छातीनं दुश्मनांचा मुकाबला केलेला होता…. ती गोळी म्हणजे त्याच्या पराक्रमाची गाथा सांगणारा एक दस्तऐवज… तो जपून ठेवलाच पाहिजे ! 

(दहा जानेवारी, १९९६. पंजाब रेजिमेंटच्या जम्मू कश्मिरमध्ये तैनात असलेल्या तेविसाव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्ट.कर्नल एस. एस. अर्थात सागर सिंग सलारिया साहेब आणि त्याच बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते त्यांचे सुपुत्र गुरदीप सिंग सलारिया साहेब….. एकविसाव्या वर्षी सेनेत आले आणि तेविसाव्या वर्षी देशाच्या कामी आले. एका धाड्सी अतिरेकीविरोधी कारवाईत गुरदीप साहेबांनी प्राणपणाने लढून तीन अतिरेक्यांना टिपले परंतू दुसऱ्या एका अतिरेक्याने अगदी नेम धरून झाडलेली गोळी छातीत घुसून गुरदीपसिंग साहेब कोसळले आणि अमर झाले. त्यांना मरणोत्त्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. या शौर्यचक्रालाच ही गोळी बांधून ठेवलेली आहे साहेबांनी…..   सेनेतून निवृत्त झालेले लेफ़्ट. कर्नल सागर सिंग सलारिया आता मुलाच्या आठवणीत जीवन जगत आहेत. गुरदीप सिंग साहेबांच्या मातोश्री तृप्ता २०२१ मध्ये स्वर्गवासी झाल्या. त्यांची ही कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपणासाठी जमेल तशी मांडली. इतरांना सांगावीशी वाटली तर जरूर सांगा.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments