डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

“लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी ! तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं.. खोलीत मी एकटा व भवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती ! चार बाय दोनची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. तीन चार गोण्या तर खास, आंघोळीला व सैंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे चार वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व दोन खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आता आताशा तर धूराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला ! खरंतर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली, मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी, आई कावली जायची. व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या.  कोणीतरी रागावून घरी येतंय आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं, मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगरग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची. कशाला एवढी मस्ती करतोस? आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अपमान गिळावा लागतो.  त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब, मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्टं काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला बंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. ” त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. 

सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्यावाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं, दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत रहायचे. आजचा तिसरा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत असलेलं सारखं. 

धडामधाडधाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले तसा परतीचा मार्गच बंद झाल्याचे लक्षात आले. अरे देवा !! जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला. सगळं अंधूक अंधूक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही, मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनिअरसाहेब बरोबर होते  ते ओरडले, “ लॅण्ड स्लाईड झालीय बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या, अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण चाळीसच्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत मोजून घ्या, कुणाला खरचटलं, लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाहीत ना? बांका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येतंय ते. ” धूरळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धूळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतंय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली हळुहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. 

अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल दोन चार फूट लांब पण इंजिनिअर साहेब म्हणाले शंभर दोनशे तीनशे मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसजसं दिसायला लागलं थोडंफार तसं  ‘आहे रे ‘चा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून एक्केचाळीस डोकी गणली गेली. इंजिनीयरसाहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन् खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले. खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. “ माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येठ, कनिष्ठ, लहानमोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, पण आतमधे एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. तो जगन्नियंता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपापल्या चीजवस्तू कमीत कमी वापरा. विशेषतः मोबाईल व त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचेच चालू ठेवा, बाकीचे स्वीचऑफ करा, किमान तीन चार दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान  वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमधे जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे दोन किलोमीटरचा पट्टा आहे. त्यात हिंडू फिरू शकतो. कमीतकमी हालचाल करूयात , म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात.  विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल, आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला.  तेव्हा जय हो !! “

साहेबांच्या शब्दा शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments