सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(मागील भागात आपण पाहिले- माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल. आता इथून पुढे )            

मौजमजेच माहेरपण आठ-दहा दिवसाच छान असतं. पण अशा अवस्थेतलं माहेरपण त्यांना नकोसं वाटायला लागलं . सीताबाईंचे सासरे केशवराव, आपल्या सुनेच्या अंगातली हुशारी कर्तबगारी ओळखून होते. अंबू त्यांची लाडकी नात होती . एके दिवशी घरात तसे सांगून, सुनेला आणि नातींना  माहेरून आणायला  ते स्वतःच गेले. सीताबाईंना यावेळी सासरी आल्यावरच बरं वाटलं. सासूबाई सावत्र. त्यांना मनापासून ही जबाबदारी नको होती. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. सीताबाईंवर अनेक बंधन आली. काळच तसा होता तो. स्वयंपाक सोळ्यातला . तेथेही त्यांना मज्जव. पाणी हवं असलं तरी पाण्याला शिवायचं नाही. मुलींकडून मागून पाणी घ्यायचं. कोणी आलं तरी तिने पुढे जायचं नाही.  केर- वारे,  चूल ,पोतेरे, दळण, कांडण , निवडण हीच काम त्यांनी करायची. 19 –20 वर्षांची , ऐन तारुण्यातली विधवा असा डाग लागला होता तिला. कोणीही सीताबाईंना तिरकस बोललेलं सासऱ्यांना मात्र आवडायचं नाही.

मुली कधी मोठ्या होणार ? या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सीताबाईंना हळूहळू मिळायला लागलं. सगळेच दिवस सारखे नसतात. कोणी , कोणी मदतीसाठी, कोणाच्या बाळंतपणासाठी, कामासाठी सीताबाईंना बोलवायचे. पण सासरे स्पष्टपणे नकार द्यायचे. आता मुलीही थोड्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या लाडक्या होत्या त्या. आता झोका हळूहळू दुरुस्त झाला. त्याला ऊर्जा मिळायला लागली . वेळ मिळेल त्यातून सीताबाई मुलींचा अभ्यास घ्यायला लागल्या. शिकविण्यातली आत्मीयता आणि मुलींची हुशारी सासऱ्यांच्या नजरेतून  सुटली नाही. एके दिवशी त्यांनी सीताबाईंना सांगितलं, ” फक्त काम काम आणि घर अशा कुंपणात राहून, तू तुझं आयुष्य खर्ची घालू नको. शेजारची आणखी चार-पाच मुलं आली तर त्यांनाही शिकव. आणि तसंच झालं. आणखी चार-पाच मुलांना शिकवणं सुरू झालं. आता झोक्याला आणखी ऊर्जा मिळायला लागली . सीताबाई मुलांना, अभ्यासाबरोबर स्तोत्रं, नैतिकतेचे धडे, सणांच महत्व, त्या सणांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका अगदी रंगवून रंगवून सांगायच्या. मुलांबरोबर पालकही खुश होते. त्यांच्या शिकवण्याची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. मुलांची संख्या वाढायला लागली. सीताबाईंना शिकविताना हुरूप वाटायला लागला. शिकविताना त्या रंगून जायला लागल्या. दुःखातलं मन दुसरीकडे वळायला लागलं. सर्वजण त्यांना बाई ,बाई म्हणता म्हणता       ” शाळेच्या आई ” असंच म्हणायला लागले. आता त्या खऱ्या अर्थाने “शाळेच्या आई”, झाल्या. घरातल्या सोप्याचं  रुप पालटून त्याला शाळेत स्वरूप आलं. ” नूतन ज्ञानमंदिर “, अशी पाटी लागली. आता एक मदतनीसही त्यांनी घेतल्या. आता झोका उंच उंच जायला सुरुवात झाली . शिकवत असताना, सीताबाईंना नवनवीन कल्पना सुचायला लागल्या .संक्रांतीला मुलांना हातात तिळगुळ देण्यापेक्षा, अगदी दीड दोन इंचाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत रंगीत कापडी पिशव्या, कल्पकतेने शिवून, त्यातून मुलांना त्या पिशव्यातून तिळगुळ द्यावा, अशा कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या बघून मुलं ही खुष व्हायची. शाळेचं  गॅदरिंग म्हणजे पर्वणी असायची. पालक, विद्यार्थी उत्साहाने, आनंदाने भारून गेलेले असायचे. शिवणकाम , विणकाम , संगीत, काव्य लेखन,  नाट्य लेखन या सर्वांबरोबर कार्यक्रमाचे नियोजन, यात सीताबाईंचा हातखंडा होता. सीताबाई –शाळेच्या आई, स्वतः गाणी तयार करून, मुलांकडून बसवून घेत. स्वतःच्या गोड गळ्यातून म्हणत असत. मुलांना स्वतः सजवत असत. कृष्णाचा एक पोषाख तर त्यांनी कायमचा  शिवून ठेवला होता . ध्रुव बाळ, भरतभेट,  राधाकृष्ण,  हनुमान, राम सीता यांच्या नाटिका स्वतः लिहून, मुलांकडून उत्तम अभिनयासहित करून घ्यायच्या. “कृष्णा sss मजशी बोलू नको रे, घागर गेली फुटून”,असा नाच करताना  छान ठेका  धरला जायचा. ” बांधा उखळाला हो, बांधा उखळाला, या नंदाच्या कान्ह्याला बांधा उखळाला.” गाणं चालू झालं की मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पालक आणि प्रेक्षक यांनाही आनंद व्हायचा . सगळं झालं की मुलांना खाऊ दिला जायचा. छोटी छोटी बक्षीस दिली जायची. हसत हसत मुलं घरी जायची . गोड स्वप्न बघत झोपी जायची. दुसरे दिवशी पालक, शाळेच्या आईंचं कौतुक करून खूप छान छान अभिप्राय द्यायचे. ते ऐकून सीताबाईंना आनंद आणि स्वतः विषयी अभिमान वाटायचा. नवनवीन कल्पनांचा उदय व्हायला लागला. झोक्याला ऊर्जा मिळायला लागली .आणि झोका उंच उंच जायला लागला. सुट्टी सुरू झाली की  त्या माहेरी जात. तेथेही आलेल्या भाचरांचं नाटक, गाणी , नाच तयार करून ,अगदी पडदे लावून, शेजार  पाजार्‍यांना बोलावून गॅदरिंग घ्यायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस द्यायच्या . भाचरं आनंदात असायची. त्यांना आत्या हवीहवीशी वाटायची . कोणावरही येऊ नये असा प्रसंग सीताबाईंवर आला. आईचीच दोन बाळंतपणं त्यांना करावी लागली. एका तरुण विधवा मुलीला आईचे बाळंतपण करताना आणि आईला करून घेताना मनाला काय यातना झाल्या असतील त्या शब्दात सांगणे कठीण आहे.

बघता बघता सीताबाईंनी समाजकार्यालाही सुरुवात केली. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षणाची आता पहाट व्हायला लागली होती . अनेक स्त्रियांना साक्षरतेचा आनंद त्यांनी मिळवून दिला. स्वदेशीचा पुरस्कार आणि परकीय कपड्यांवर बहिष्कार म्हणून टकळीवर सुतकताई त्यांनी सुरू केली.

सासर्‍यांचा भक्कम आधार, धाकट्या जावेची मदत, शाळेतल्या गोड चिमुकल्यांच्या सहवासाचा विरंगुळा आणि आनंद, स्वतःची ध्येयनिष्ठा आणि कष्ट , श्री अंबाबाईचा वरदहस्त आणि अखेर नियती या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेने  झोक्याचे आंदोलन उंच उंच होत गेले . त्या उंच गेलेल्या झोक्याकडे सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. अरे वा ss वा, वा ss वा खूपच कौतुकास्पद ! सीताबाईंना आनंदाची आणि उत्साहाची ऊर्जा मिळाली. आणि त्या, ” घरात हसरे तारे असता sas, ”  या गाण्याचा चालीवर स्वतःच्या शब्दात  गाणे गुणगुणायला लागल्या.

मी पाहू कशाला कुणाकडे, मी पाहू कशाला जगाकडे.

घरात ज्ञान मंदिर असता, मी पाहू कशाला कुणाकडे.

    गोड चिमुकली गोजिरवाणी.

    हसती खेळती गाती गाणी.

     मला बिलगती आई म्हणुनी.

उंच माझा झोका पाहता, आनंदाचे उडती सडे.

मी पाहू कशाला कुणाकडे , मी पाहू कशाला जगाकडे.

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित कथा)

  ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments