सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “पैशाची रोख देवघेव करणारे स्वयंचलित यंत्र ”  – मूळ लेखक:  अज्ञात ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

   

(ATM – Automated Teller Machine) — हे आता आपल्या आयुष्याचा एक अपरिहार्य भाग झालेले आहे.                                                             

स्नानपात्रात (टबमध्ये) बसून स्वतःच्याच आळशीपणावर वैतागलेल्या जॉन शेफर्ड-बॅरॉनला (हा शिलाँगमध्ये जन्मलेला स्कॉटिश इसम) अकस्मात स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली. १९६०च्या मध्यास, एके दिवशी बँकेतून पैसे काढायला म्हणून हा गेला आणि नेमका बँक बंद झाल्यावर एक मिनिट उशीरा पोहोचला. त्यामुळे झालं काय की, सप्ताहाची अखेर त्याला पैशांविना घालवावी लागली.  तो चडफडला, विचारात पडला की, ‘बँकेच्या कामकाजाच्या वेळाव्यतिरिक्त पैसे काढता यायला हवेत. काय करावं बरं?’  

दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही वेळी पैसे टाकल्यावर चॉकलेट देणारे स्वयंचलित विक्रीयंत्र त्याच्या मनःचक्षूंसमोर चमकून गेले. अशा त-हेने, एका मुद्रणसंस्थेत काम करणा-या शेफर्ड-बॅरॉनने एक स्वयंचलित रोख पैसे देणारी पद्धती शोधून काढली.  

१९६०च्या अखेरीस अकस्मात एक दिवस जेवणाच्या सुट्टीत त्याची गाठ बार्कलेज बँकेच्या महाव्यवस्थापकांशी पडली आणि त्यांच्याकडे केवळ ९० सेकंदांचा वेळ मागून, छानशा गुलाबी वाईनचे घुटके घेत शेफर्ड-बॅरॉनने आपल्या अभिनव स्वयंचलित रोखीच्या यंत्राची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. “तुम्ही तुमच्या बँकेशेजारी एक खाच बसवली, की ज्यात तुमचा अधिकृत धनादेश टाकला, तर तिथून कोणत्याही वेळेला प्रमाणित रोकड मिळू शकेल, अशा कार्यपद्धतीची कल्पना माझ्याकडे आहे.”  त्यावर बँकेचे महाव्यवस्थापक म्हणाले, “तू सोमवारी सकाळी मला येऊन भेट.”  

बार्कलेज बँकेने शेफर्ड-बॅरॉनला सहा स्वयंचलित रोखीची यंत्रे कार्यान्वित करण्याचे काम दिले. त्यापैकी पहिले यंत्र लंडनच्या उत्तर भागातील एन्फिल्ड उपनगरात दि.२७ जून १९६७ रोजी बसविण्यात आले.                                                                       

शेफर्ड-बॅरॉनचा जन्म १९२५ साली, भारतात शिलाँग येथे झाला. पुढे त्याने भारतीय सैन्याच्या हवाई दलाच्या दुस-या तुकडीत नोकरी केली आणि गुरखा सैनिकांना हवाई छत्रीचे प्रशिक्षण दिले.                                                                  

तसाच त्याने अजून एक अभिनव शोध लावला – भारतीय सैन्यातील परिचय क्रमांकाप्रमाणे PIN चा (Personal Identification Number) शोध ! सुरूवातीला त्याने हा क्रमांक सहा अंकी करण्याचे ठरवले. पण त्याच्या पत्नीने – कॅरोलिनने तक्रार केली की सहा अंकी क्रमांक फार लांबलचक होतो, म्हणून त्याने तो चार अंकी केला. त्याची आठवण सांगतांना त्याने म्हटले की, “स्वयंपाकाच्या मेजावर चर्चा करतांना ती म्हणाली की, चार अंक सहजपणे तिच्या लक्षात रहातात. मग काय? चार अंकी क्रमांकाला मिळून गेला जागतिक दर्जा.”   

ही गोष्ट शक्य होण्याचे कारण म्हणजे भारतीय प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन — अपारंपारिक प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन् यांनी गणिताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतले नव्हते आणि मद्रास विद्यापीठातही त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नव्हते. परंतु त्यांचे मद्रास पोर्ट ट्रस्टमधील कार्यालयीन वरिष्ठ, जे इंग्लिश होते, त्यांनी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधील प्राध्यापक हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यास त्यांना उद्युक्त केले. श्रीनिवास रामानुजन् यांनी आपली गणितीय समीकरणे मांडून एक भले मोठे पत्र लिहिले, ज्यामुळे प्रा. हार्डी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी कुठल्याही पूर्वपरीक्षेशिवाय, इतकेच काय, अत्यंत कठीण समजली जाणारी ‘ट्रायपॉस परीक्षा’ पास होण्याच्या अटीशिवाय श्रीनिवास रामानुजन् यांचा कॉलेज-प्रवेश नक्की करून टाकला. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजने सर्व नियम मोडून टाकून त्यांना कॉलेज-प्रवेश दिला नसता, तर त्यांना आपल्या ‘विभाजन सिद्धांता’ने प्राप्त झालेल्या जागतिक ख्यातीला वंचित व्हावे लागले असते, यात शंकाच नाही. 

जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यंत्रामध्ये सरकवता आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम यंत्राने द्यावी, असे फर्मावता – तेव्हा यंत्र तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचे विभाजन – रामानुजन् ‘विभाजन सिद्धांता’नुसार करून ती तुमच्या हाती पडेल, असे बघते. जसे की पुढीलप्रमाणे :-                           

अंकगणितात सकारात्मक पूर्णांकांचे विभाजन (n), जे पूर्णांक विभाजन म्हटले जाते, ती ‘n’ ही सकारात्मक पूर्णांकांची बेरीज पद्धति आहे. दोन बेरजा ज्या दोन किंवा अधिक प्रमाणात वेगवेगळ्या निर्दिष्टांमध्ये दर्शविल्या असतील, त्याही समान विभाजन मानल्या जातील.                                                                                                                     

उदा. “४” ह्या संख्येचे विभाजन पाच प्रकारे करता येईल :-                                              

४  =   ३ + १                                                             

         २ + २                                                                   

         २ + १ + १                                                              

         १ + १ + १  + १                                                                                                   

 हे स्वयंचलित रोखीचे यंत्र ह्या श्रीनिवास रामानुजन् यांच्या ‘विभाजन सिद्धांता’नुसार बरोबर रकम रोख अदा करते.

(एक छानशी टिप :- श्रीनिवास रामानुजन नावाच्या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञांच्या नावाने ‘रामानुजन समेशन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मालिकेबद्दल तुमच्यापैकी जे अपरिचित आहेत त्यांच्यासाठी: – त्यात असे नमूद केले आहे की तुम्ही सर्व नैसर्गिक संख्या जोडल्यास, म्हणजे 1, 2, 3, 4, आणि असेच, अनंतापर्यंत सर्व मार्ग, तुम्हाला ते  -1/12 च्या बरोबरीचे आढळेल.) 

तर, दोन अत्यंत आदर्श सद्गृहस्थ, जे कधीही एकमेकांना भेटले नाहीत आणि ज्यांनी आपल्या संशोधनाच्या/कल्पनेच्या स्वामित्वहक्काबद्दल जराही फिकीर केली नाही, त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार म्हणजे स्वयंचलित रोखीच्या यंत्राकडून तुमच्या हातात पडणारी रोकड !  

आता जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंचलित रोखीच्या यंत्रासमोर उभे रहाल, तेव्हा या दोन प्रतिभावंतांची जरूर आठवण करा – एक, ज्याला कल्पना सुचली आणि दुसरा, ज्याला स्वयंचलित रोखीचे यंत्र अवतरण्यापूर्वी त्याच्यासाठी वापरायची गणिती कार्यपद्धती सुचली.   

(मूळ इंग्लिश लघुलेखाचे हे रूपांतर आहे.)

मूळ लेखक:  अज्ञात

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments