सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजब कोकणातील गजब चालीरीती…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

कोकणातील काही चमत्कारिक चालीरीतींचा हा अद्भुत मागोवा……

मालवण-कुडाळ रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ कासार टाका नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे नवस बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नवस फेडायचा असेल तर कोंबडा, दारू व सिगारेट यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला  देण्याची प्रथा आहे. कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडया विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यात दाभील नावाचे एक गाव आहे. या गावात एकही विहीर नाही. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही. परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडात सात (बावी) विहिरी आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणीच साऱ्या गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

मातोंड हे एकही चहाचे दुकान नसलेले गाव. येथील जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात दारू प्यायला बंदी. पण डोंगरात भरणारी घोडेमुखची जत्रा हा देव ब्राह्मण असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र कोंबडय़ाचा नैवेद्य द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला कोंब्याची जत्रा म्हणतात.

देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावात कोणीही कोंबडी पाळीत नाहीत. अगर बाहेरून आणून खाऊ शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर म्हापण गावात येसू आकाच्या देवळात नवस फेडायचा असेल तर सुक्या बांगडयाची चटणी आणि नाचण्याची भाकरी असा अस्सल मालवणी बेत करावा लागतो.

उभादांडा येथे मानसीचा चाळा नावाचे एक जागृत स्थळ आहे. तिथे नवस फेडायचा असेल तर खेकड्यांची माळ आणि गॅसची बत्ती देतात. या चाळ्याच्या जत्रेला बत्तेची जत्रा म्हणतात.

परुळे गावच्या येतोबाच्या देवळात म्हणे, भिंतीला लोखंडी खंजीर चिकटतो. या उत्सवाला बाक उत्सव म्हणतात तर आरवली गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा नवस फेडण्यासाठी सोनकेळीचा घड आणि चामडयाची चप्पल भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली ही चप्पले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चप्पले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील पेंडुर गावचे मसणे-परब लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या बोहल्यावर उभे राहतात. याच तालुक्यातील कोईल गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेवर गणपती प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर गणपतीचे कॅलेंडरसुद्धा लावीत नाहीत.

कणकवली तालुक्यातील कुर्ली गावचे पाटील घराण्यातले लोक तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ घालतात. तर वालावल गावातील एकही माणूस  पंढरपूरला जात नाही.

फोंडाघाट येथील वाघोबाचे मंदिर हे समस्त अनिष्ट शक्तींना रोखून धरणारे शक्तिस्थळ आहे असे मानतात. इथले मंदिर कोंबडा आरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा एकचक्रानगरी म्हणून उल्लेख आहे ते गाव वैभववाडी तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आहे. इथे मोठमोठ्या गुहा असून त्यात गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. दगडात कोरलेला महाल आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त पलंग आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात प्रशस्त गुहा आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर पाण्याचे साठेही आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला राकसमाळ असेही म्हणतात.

* कोकणातील अशा असंख्य ठिकाणच्या चालीरीती व गूढता समजून घेवून अश्या अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments