सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३१ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ञ श्रीमती ताराबाई मोडक यांचा आज स्मृतीदिन. 

 (१९-४-१८९२ ते ३१-८-१९७३) 

यांचे आईवडील प्रार्थना समाजाचे अनुयायी असल्याने घरात आधुनिक – प्रगत वातावरण होते. पण पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना अनेकदा हेटाळणी सहन करावी लागली.  १९०२ साली त्यांनी पुण्याच्या हुजूरपागेत प्रवेश घेतला. पण शाळेच्या वसतीगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तरीही त्यांना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा नेहेमीच अभिमान वाटत असे. १९०६ साली वडील गेल्यावर, त्यांना मुंबईत यावे लागले, आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या ‘अलेक्झांडर गर्ल्स स्कूल’ मध्ये जायला लागल्या. लवकरच शाळेत रुजल्या. आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला तो बदल त्यांना खूप काही शिकवून गेला. पुढे फिलॉसॉफी विषयात  B.A. केले. 

प्रार्थनासमाजामुळे त्यांचे विचार आणि जीवनमानही प्रगत झाले. अशा अभिरूची संपन्न जीवनशैलीने त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याचे बळ मिळाले. त्यांना विविध छंद होते. त्या टेनिस, बॅडमिंटन उत्तम खेळत. विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यातही त्यांना विशेष रस होता. लग्नानंतर त्या अमरावतीला रहायला गेल्या. तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. १९१५ साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तिथे त्यांनी काही काळ नोकरी केली. 

संसारातून विभक्त झाल्यानंतर, १९२१ साली राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये ‘प्राचार्य’ म्हणून त्यांना बोलावण्यात आले. ही नोकरी उत्तम असली तरी आव्हानात्मक होती. त्यासाठी विशेष शिकवणी लावून त्यांनी गुजराती भाषा शिकून घेतली. त्यांच्या कामात व्यवस्थापनाचाही मोठा भाग होता. त्याचे तंत्रही त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. पण काही कारणाने दोन वर्षांनी त्यांनी ती नोकरी सोडली. 

याच दरम्यान श्री. गिजुभाई बथेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगांविषयी त्यांना माहिती मिळाली. आणि त्या भावनगरला गेल्या. हे गृहस्थ मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यासाठी  त्यांची  सहकारी म्हणून ताराबाईंनी काम करायला सुरूवात केली. त्या दोघांची ही भेट ‘ऐतिहासिक’ ठरली असेच म्हणायला हवे. कारण भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी ठरली; आणि त्यांनी बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या काळात शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते. त्यात बालशिक्षण ही कल्पना तर गौणच होती, आणि त्याचे महत्त्व पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. ताराबाईंना समाजाची ही मानसिकता माहिती होती. त्यामुळे त्यांच्या विचारांना शास्त्रीय बैठक असेल तरच लोकांना काहीतरी पटेल, या विचाराने त्या दोघांनी शास्त्राचा आधार असणा-या मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून, त्याला भारतीय रूप देण्याचा प्रयत्न सुरू केला… आणि आज बालशिक्षण हे एक शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. 

भावनगरच्या वास्तव्यातच त्यांच्यातली लेखिकाही त्यांना सापडली. १९२२ साली नूतन बालशिक्षण संघाची म्हणजे ‘मॉन्टेसरी’ संघाची स्थापना झाली… त्यांच्यातर्फे ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक प्रकाशित केले जाऊ लागले. आणि संपादकाचे काम अर्थातच् ताराबाईंकडे आले. हिन्दी आणि मराठी या दोन्ही आवृत्ती ताराबाईंमुळेच नियमित प्रकाशित होऊ लागल्या. तिथे ताराबाईंनी काही पुस्तकांचे लेखन केले. शंभरपेक्षाही जास्त पुस्तकांचे संपादन केले. मॉन्टेसरी संमेलने भरवली. आणि ‘बालशिक्षण’ हे त्यांचे कार्यक्षेत्रच होऊन गेले. 

शिक्षणाला पावित्र्याची किनार हवी हे जाणून त्यांनी बालघरांचे रूपांतर बालमंदिरांमध्ये केले. त्यात भारतीय नृत्ये, कला प्रकार, अभिजात संगीत, लोकगीते यांचा समावेश केला. बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला ही विशेष अर्थ आहे हे जाणून… या सर्व विचारांचा आणि संकल्पनांचा मेळ बालशिक्षणात साधला. एकीकडे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्या जोडीने पालक आणि शासन या दोन्हींच्या प्रबोधनाचे कामही केले. आता त्यांना खेड्यातील बालशिक्षणाचा ध्यास लागला होता. त्यासाठी अत्यावश्यक असणारी साधने बनवण्याची जबाबदारीही त्यांनी सहजपणे स्वीकारली.

पुढे मुंबईला आल्यावर, त्यांनी या सगळ्या कल्पनांवर आधारित अशी ‘शिशुविहार’ शाळेची १९३६ साली स्थापना केली; आणि भविष्यात जास्त बालशिक्षकांची गरज भासणार हे लक्षात घेऊन तिथेच ‘बाल अध्यापक विद्यालयांची’ स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही करून ठेवले. हळूहळू त्यांच्या या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे आणि आदिवासींच्या संदर्भाचे परिमाण मिळाले, कारण मुंबई नंतर बोर्डी, तसेच कोसबाड इथे त्यांनी हे काम सुरू केले. असा हा प्रवास पुढे हरिजनवाड्या, कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला. 

ताराबाईंचे हे फार मोठे योगदान लक्षात घेऊन, १९६२ साली केंद्रसरकारने ताराबाईंना ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्रदान केला. शिक्षणतज्ञ या नात्याने त्यांनी अनेक पदे भूषविली, अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले. १९४६ ते १९५१ त्या मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्ष होत्या. म.गांधींनी त्यांच्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे कम ताराबाईंना सोपवले होते. या विषयावर इटलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाषण केले होते.

विशेष म्हणजे ताराबाईंच्या ‘शिशुविहार’ मध्ये आता दोन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात – १) मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून ‘शिशु-बँकेची’ योजना, २) निरक्षर पालकांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवणे. 

ताराबाई मोडक यांचे प्रकाशित साहित्य : नदीची गोष्ट / बालकांचा हट्ट / बालविकास व शिस्त / बिचारी बालके / सवाई विक्रम . 

सौ. ललितकला शुल्क यांनी ताराबाई मोडक यांचे लिहिलेले चरित्र प्रसिद्ध आहे. 

बालशिक्षणासाठी पुरे आयुष्य झोकून देणा-या श्रीमती ताराबाई मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments