श्री सुजित कदम
साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #96
☆ माझी कविता ☆
मात्रावत्त- वनहरीणी (८+८+८+८ =३२)
हातामधल्या कलागुणांची सुंदर मुर्ती माझी कविता
कथा सांगते मने जोडते मला घडविते माझी कविता
व्यासंगाची अजोड माया आठवणींचा ठेवा जपते
एखादी तर मनात ठसते दैवत माझे माझी कविता
कधी वाचते आयुष्याला धडा अनुभवी कधी गिरवते
कविता माझी मी कवितेचा नवी नवी बघ वाट गवसते
नातेबंधन दृढ करीते कविता ठरते जीवन दात्री
लेखणीतुनी येते धावत कविता माझी मला बिलगते
बदलत जाते जीवन माझे नदीपरी ही येते धावत
संजीवन ती जाते देउन पहा राहते उरी खळाळत
कविता भासे कधी लेक तर कधी भासते आई माझी
जीवन छाया माझी कविता सखी परी त्या येते सोबत
लळा लाविते रसिक जनांना कविता माझी आहे तळमळ
विचार मंची खुलते कविता सरून जाई सारी मरगळ
ओढ लाविते मना मोहवी कविता माझी आहे जीवन
माझी कविता फुले सुगंधी पहा पसरला त्यांचा दरवळ
© सुजित कदम
संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈