मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालवी…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पालवी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

माझ्या रानात,रानात

तुझ्या झाडाची पालवी

गर्द सावल्या,सावल्या

माझ्या मनाला झुलवी

 

जस सपान, सपानं

एक असाव घरटं

दोन पाखरं,पाखरं

गुज प्रेमाच चावट.

 

गं तुझ हिरवं लेण

माझ्या काळजात ठाण

काळी पांघर हलते

तुला जल्माचीच आण.

 

वारा धावतो,धावतो

सुसाट पिसाट खुळा

वर आभाळ,आभाळ

चुंबते ओढ्याच्या जळा.

 

आता बांधात,बांधात

सळसळ चाल धुंद

झाली चाहुल-चाहुल

सांज येळची ही मंद.

 

पुन्हा भेटशी भेटशी

अशी दुपार वकत

तुझ्या पालवीत जीव

आयुष्य गेले थकत..

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈