मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #181 ☆ यादवी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 181 ?

☆ यादवी… ☆

नको झोपताना उगा यादवी

इथे श्वास गातात रे भैरवी

 

पतीदेव मानून भजते तुला

तुझे वागणे का असे दानवी

 

प्रशंसा करावी अशा या कळ्या

स्वतःची न गातात त्या थोरवी

 

जरी रुक्ष आहे इथे खोड हे

जपे ओल शेंड्यावरी पालवी

 

किती विरह रात्री धरा सोसते

सकाळी धरेला रवी चाळवी

 

प्रकाशा तुझा चेहरा देखणा

हवा तीव्र होता दिवा मालवी

 

पहाटे पडावा सडा अंगणी

अपेक्षा इथे मातिची वाजवी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈