मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #173 ☆ मौनाचे हत्यार… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 173 ?

☆ मौनाचे हत्यार… ☆

हाती माझ्या हे मौनाचे हत्यार आहे

त्या मौनाला सहिष्णुतेची किनार आहे

 

रणात केवळ मृत्यूचे या तांडव घडते

युद्धासाठी कायम माझा नकार आहे

 

दोन वेळच्या अन्नासाठी भीक मागती

तरिही म्हणती युद्धासाठी तयार आहे

 

प्रज्ञा समृद्धीच्यासोबत इथे नांदते

घरात माझ्या प्रतिभेची बघ वखार आहे

 

प्रतिभेची या चोरी करता आली नाही

तिच्यासमोरच सुटली माझी इजार आहे

 

कुणी शिव्या द्या ऐकुन घेइन नेता म्हणतो

संस्कारातच उच्च प्रतीचा विचार आहे

 

डीजे ऐकुन कान फाटले होते माझे

म्हणून बसलो हाती घेउन सतार आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈