सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जगणे व्हावे सोपे… – कवयित्री : सौ. मधुर कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

वाटतं कधीतरी एकांत असावा..

आपला श्वास आपणच ऐकावा..

त्या श्वासाचीच नादमधुर लय व्हावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

मन अचानक लाटांवर हेलकावतं..

आयुष्य इथेच थांबावं असंही वाटतं..

त्या लाटा पार करण्याची तयारी हवी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

वाटतं जेव्हा सगळं सोडून दूर जावं..

प्रियजनांचं प्रेम त्याक्षणी आठवावं..

त्यांच्यासाठी जगण्याची उर्मी यावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

सूर्य, चंद्र, तारे, निसर्गाला गुरू करावं..

आत दडलेल्या आनंदाला आपणचं शोधावं..

दुःख, आनंद, आशा, निराशेची पायरी चढावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

मन उदास होता, दुसऱ्याचं दुःख स्मरावं..

सर्वसुखी कुणी नाही हे सत्य समजावं..

संतांनाही ना चुकली ही प्रारब्धाची ठेवी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

आयुष्य एकदाच मिळतं, भरभरून जगावं..

शक्य असेल ते ओंजळीने देत रहावं..

देण्यातल्या आनंदाची तृप्ती मिळावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

कवयित्री : सौ मधुर कुलकर्णी

पुणे

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments