सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मोबाईलचे व्यसन – भाग – 1 … अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“एक कोटी रुपये देतो, वर्षभर स्मार्टफोन वापरायचा नाही,” असं कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का?

– कुणीही म्हणेल की ‘ एक कोटी रुपये मिळणार असतील तर वर्षभर राहू की सुखानं फोनशिवाय, त्यात काय अवघड आहे.’

-खरं तर अवघड काही नाही, पण वाटतं तितकं सोपं ते आता उरलेलं नाही. आपण सारेच स्मार्टफोनला इतके सरावलो आहोत की फोन हा फक्त एकेकाळी कॉल करणं, घेणं, बोलणं यासाठीच होता हे आता आपण विसरून गेलेलो आहोत. सतत स्क्रोल करत राहण्याचं हे व्यसन इतकं वाढलं आहे की, एक दिवस मोबाइल बिघडला किंवा हरवला, एवढंच काय पण काही वेळ त्याची बॅटरी संपली तरी जीव कासावीस होतो. फोनशिवाय जगणंच अशक्य व्हावं इतका फोन जवळ बाळगूनच अनेकजण जगतात. झोपताना आणि शौचालयातही फोन जवळच असतो.

अशा अवस्थेत फोनशिवाय जगणं कसं शक्य व्हावं?

पण एलिना मुगडन या तरुणीनं हे आव्हान स्वीकारलं. न्यू यॉर्कच्या क्वीन्स परिसरात राहणारी ही तरुणी. वय वर्षे 29. गेल्या वर्षी फेब्रुवारीतली ही गोष्ट. व्हिटॅमिन वॉटर या फिटनेस ब्रॅण्ड कंपनीने अमेरिकेत एक स्पर्धा आयोजित केली. ‘स्क्रोल फ्री इयर’ असं त्या स्पर्धेचं नाव. वर्षभर स्मार्टफोन न  वापरता राहिलं तर एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं. 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले व्हिडिओ पाठवले होते. त्यातून एलिनाच्या व्हिडिओची निवड झाली, आणि वर्षभर तिचा आयफोन एका डब्यात बंद करण्यात आला. पुढचे बारा महिने स्मार्टफोन नाही, त्यावर स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिकटॉक असं काहीही नाही. ओला-उबेर- खाण्याचे पदार्थ ऑनलाइन मागवण्याचे अ‍ॅप्स, हे काहीही वापरता येणार नाही.

कंपनीने एलिनाचा आयफोन काढून घेतला आणि तिला एक फ्लिपचा साधासा फोन दिला. त्या फोनवरून फक्त कॉल करता येतील आणि आलेले कॉल स्वीकारता येतील. यापेक्षा जास्त त्या फोनवरून काहीही करता येणार नाही. तशी सोयच नाही. एवढंच नाही तर लॅपटॉप, टॅब यांचा वापरही अत्यंत मर्यादित करण्याची परवानगी देण्यात आली.

आणि एवढं करूनही ती खरंच स्मार्टफोनपासून वर्षभर लांब राहिली का, हे तपासण्यासाठी तिची येत्या फेब्रुवारीत शिस्तशीर लाय डिटेक्टर टेस्ट होणार आहे. त्यावरून कळेलच की खरंच तिनं हा सेलफोन उपवास तंतोतंत पाळला की नाही.

पैसे मिळतील तेव्हा मिळतील, पण वर्षभर सेलफोनपासून दूर राहण्याचा एलिनाचा अनुभव खूप रंजक आणि डोळ्यात अंजन घालणाराही आहे.

एलिना सांगते, ‘खूपदा वाटलं की हा स्मार्टफोन उपवास सोडावा. फोनशिवाय जगणं मला जमतच नव्हतं. सोशल मीडिया नाही, कुणाशी संपर्कच नाही या भावनेनं मग तगमगायला लागले. कुठं जायचं तर गाडी बुक करता येत नाही. मित्र-मैत्रिणींशी चटकन बोलता येत नाही, त्यांचं काय चाललंय हे कळत नाही. जसं काही मी जगापासून लांब फेकले गेले असं मला वाटायला लागलं होतं; पण तरी गेले आठ महिने मी हा उपवास सुरू ठेवला आहे आणि आता यापुढेही स्मार्टफोन फ्री आयुष्य जगण्याचा निर्धार केला आहे.’

क्रमशः…..

लेखक:-   अनामिक हितचिंतक

संग्राहिका : – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments