सुश्री सुलभा तेरणीकर
☆ “कालाय तस्मै नमः…” – लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नेहाचा फोन आला.
“आई, veg माखनवला ची रेसिपी सांगा ना पटकन. मिहीरचा बंगलोर वाला मित्र फॅमिलीला घेऊन जेवायला येतोय. “”
“इतकं आयत्यावेळी कसे कळवतात.? “
हा विचार मनात दाबून नेहाला म्हटलं, “अगं सगळ्या भाज्या, पनीर वगैरे आहे का तुझ्याकडे. “?
“आई, मी भाज्या, पनीर, दही आणि श्रीखंड आत्ता online order केलंय. येईल अर्ध्या तासात””
बरं, म्हणून मी तिला रेसिपि सांगितली.
फोन ठेवल्यावर माझ्या मनात विचार आला, वस्तूंची मुबलकता, “सेवेसी तत्पर agencies, आणि या सगळ्याचा मनसोक्त उपभोग घेताना न कचरणारी आजची पिढी..
यामुळे कोणावर अवलंबून रहायला लागणं, किंवा दुसऱ्यांकडून कसली गरज भासणं हे आता जवळ जवळ संपुष्टात आलंय.
…. हेच कारण असेल का आजची पिढी आपल्या माणसांपासून दुरावत चाललीय त्याचं..? ? ?
मगाशी आला माझ्या मनात विचार की आयत्या वेळेला कसे कळवतात. पण आता हसूच आलं.
चाळीस वर्षापूर्वी आमच्या कडे असेच आयत्या वेळी पाहुणे, मित्र यायचे, किंवा आम्हीही जायचो.
त्यावेळी संपर्काची काही साधनं नव्हतीच. मोबाईल तर सोडाच, landline पण अभावाने आढळायची.
त्यामुळे त्याचं काही वाटायचंही नाही. फरक इतकाच की त्या काळी 24/7 किराणा, वस्तू, देणारी दुकानं नव्हती.. की रोख पैशाशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.
त्यामुळे असे अचानक कोणी आले तर आम्हाला शेजाऱ पाजाऱ्यांवर अवलंबून रहायला लागायचंच.
क्रेडिट डेबिट कार्ड्स नव्हती. की on line बँकिंग नव्हतं. Bank बंद झाली आणि काही पैशाची अडचण अचानक उभी राहिली तर जवळ राहणाऱ्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून शेजाऱ पाजाऱ्यांकडून चक्क पैसे मागायला लागायचे.. तो काळच तसा होता. त्यामुळे एकमेकांची मदत लागायचीच. म्हणून तर इतकं मिळून मिसळून, एकमेकांना धरून राहणारे आहोत का आपण….? ?
तेव्हा निदान वस्तूंची टंचाई नव्हती. आर्थिक स्तर उंचावला होता. म्हणून अवलंबित असणं थोडं मर्यादेत होतं.
पण माझा बालपणीचा काळ तर त्याहून निराळा होता. शिवाजी पार्कसारख्या विभागात चाळीत माझं बालपण गेलं. सगळेच मध्यमवर्गीय. बेताची कमाई आणि वस्तूंची टंचाई.
मला आठवतंय, त्यावेळी शिवाजी पार्कसारख्या परिसरात एकही डेअरी नव्हती. आरेच्या सेन्टरवर फक्त सकाळी दूध मिळायचं ते ही कार्डवर आणि अर्धा लिटर. कुठे गावाला गेलो, दुपारी, संध्याकाळी परतलो तर दुसऱ्या दिवशीपर्यंत दूध नाही मिळायचं.
रात्री पाणी यायचं.. तोपर्यंत पाणी नाही… पण चाळीचा मामला, एकदम खुल्लमखुल्ला… चाळभर सगळ्यांना सगळ्यांची खबर असायची. कुठे गेलेत कधी येणार, सगळं.. घराच्या किल्ल्या दोन जणांकडे तरी असायच्याच. कोणीतरी घर उघडून पाणी भरून ठेवलेलं असायचं. कोणी तरी सकाळी आमच्या कार्डवर दूध आणून ठेवायचं. (कोणीही दोन चार दिवसासाठी कुठे जाणार असेल तर दुधाचं कार्ड शेजारी जमा करण्याचा अलिखित कायदाच होता जणू.. तेवढे दिवस जरा त्यांच्याकडे दुधाचा सुकाळ)
फ्रीझ कुठे होते? म्हणजे ओघाने दोन तीन वेळेला दूध तापवणं आलंच.. दुधाची इतकी टंचाई, तर दही कुठून मिळणार हो. मग आई पिटाळायची छोटीशी वाटी देऊन शेजारच्या काकूंकडे.. “विरजण” मागायला.
इतक्या कठीण परिस्थितीशी सामना करताना एकमेकांना धरून राहणं, प्रेमाने गुण्यागोविंदाने राहणं ओघाने यायचंच. एकोपा होता, माणुसकी होती, माझं तुझं असा भेदभाव नव्हता. आम्हा लहान मुलांमध्ये ही नव्हता. चार आणे तासावर घेतलेली सायकल, दोघात चालवायचो. एखाद्याकडे बॅट असायची, ball वर्गणी काढून आणायचा. रांगोळीचे रंग, ठिपक्यांचा कागद मजल्यावर एक असायचा. देण्याघेण्याचा, वाटून घ्यायचा संस्कार नकळत रुजला..
एवढं कशाला? आमच्या मजल्यावर थर्मामीटर फक्त काळेकाकूंकडे होता.
ताप आला की कोणीही कोणत्याही वेळी त्यांच्याकडे थर्मामीटर मागायला जायचे. पण काकूंचा “पारा” कधीही चढलेला पहिला नाही…
तात्पर्य काय…
गरज आणि परस्परांवर अवलंबून रहायला लागत असल्यामुळे माणसं कायम जोडलेली राहिली.
आज परिस्थिती खूपच निराळी आहे. आजच्या पिढीला सगळं सहज उपलब्ध आहे. सुखसोयी, सुविधा, पायाशी लोळण घेतायत. माझं कुणावाचून काहीही अडत नाही हा अटीट्युड आपोआप बनत चाललाय.
स्वतः च्या वर्तुळापलीकडे त्यांना कोणाशी खास संपर्क ठेवावा असं वाटत नाही. हेच पुढे पुढे जात नात्यातही दुरावा आणू पाहतय.
…. म्हणूनच बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची तक्रार असते, मुलांना आमच्यासाठी वेळ नसतो, एखाद्या फोनची पण आम्हाला वाट पाहावी लागते, आमच्या मदतीची आता त्यांना गरज नाही, ते आमच्यावर अवलंबून नाहीत म्हणून आटला का ओलावा,? संबंधात आला का दुरावा..?
– – – काय वाटतं तुम्हाला.??
*
लेखिका : सुश्री नीलिमा जोशी
प्रस्तुती : सुलभा तेरणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈